महाराष्ट्राच्या मातीशी आणि माणसांशी रक्ताचं नातं सांगणारी आपली एसटी आता फक्त गाव-खेड्यांना जोडणारं साधन राहिलेली नसून ती आता भक्तांना थेट देवाच्या दारापर्यंत नेणारी पुण्यवाहिनी झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाची ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन’ योजना हे राज्यातील भाविकांच्या श्रद्धेला एसटीच्या व्यापक वाहतूक जाळ्याची आणि व्यावसायिक आधुनिकतेची जोड देणारा एक क्रांतिकारी निर्णय आहे.
प्रवाशांची सोय, देवाचा ध्यास
पूर्वी कसं असायचं, घरातल्या ज्येष्ठ माणसांना तीर्थयात्रेला जायचं असल्यास महिन्याभरापासून प्लॅनिंग सुरू व्हायचं. गाडीचं बुकिंग झालं का?, तिथे गेल्यावर राहायचं कुठे?, जेवणाची सोय काय? अशा हजार प्रश्नांची उत्तरे शोधतानाच अर्धी वारी निघून जायची. पण आता काळजी करायचं कारण नाही. आपल्या हक्काच्या एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. भक्तांची हीच अडचण ओळखून एसटीने थेट ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजना सुरू केली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या इतिहासात प्रथमच आणलेली सार्वजनिक-खाजगी भागीदारीची (PPP Model) संकल्पना हे या तीर्थाटन योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. या नव्या रचनेमुळे शासकीय यंत्रणेवरील नियोजनाचा ताण कमी होवून खाजगी क्षेत्रातील व्यावसायिकतेचा लाभ थेट सामान्य भाविकांना मिळेल. या योजनेनुसार, एसटी भाविकांना तीर्थाटनासाठी विशेष बस सेवा पुरवेल आणि सहलींचे चोख नियोजन, उत्तम दर्जाचे भोजन, तसेच राहण्याची सुरक्षित व्यवस्था खाजगी संस्था करतील.
परवडेबल..
गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळ विविध आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. अशा काळात ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजना महामंडळासाठी आवश्यक ठरणार आहे. प्रवास भाड्याचे १०० टक्के उत्पन्न एसटीकडे राहणार असल्याने आणि त्यातही खाजगी संस्थांच्या एकूण उत्पन्नातील काही वाटा एसटीला मिळणार असल्याने महामंडळाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. या योजनेत शासनाच्या विविध सामाजिक घटकांना (उदा. महिलांना ५०% सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास) लागू असलेल्या सवलती कायम राहतील. त्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या तुलनेत या योजनेअंतर्गत तीर्थाटनाचा खर्च अत्यंत वाजवी आणि परवडणारा असेल. परिणामतः जास्तीत जास्त प्रवासी लालपरीकडे आकर्षित होणे अपेक्षित आहे.
रोजगाराची सुवर्णसंधी
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन’ योजना ही राज्यातील तरुण-तरुणींसाठी रोजगार व उद्योजकतेचे नवे दालन खुलं करणारी योजना आहे. कोणतीही मोठी भांडवली गुंतवणूक न करता, केवळ नियोजन, व्यवस्थापन कौशल्य आणि पर्यटना विषयीची आवड यांच्या जोरावर या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करता येऊ शकते.
महाराष्ट्राच्या समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन वारशाला चालना देतानाच स्थानिक युवक-युवतींना स्वावलंबी बनण्याची ही मोठी संधी आहे. राज्यातील अधिकाधिक तरुण-तरुणींनी या योजनेत सहभागी होऊन पर्यटन उद्योगात आपले स्थान निर्माण करावे, रोजगार निर्मितीत योगदान द्यावे आणि महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाचे भागीदार व्हावे असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
या सर्व वैशिष्ठ्यांसह ‘एसटी संगे तीर्थाटन’ हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला जोडणारा दुवा ठरेल अशी अपेक्षा आहे. सर्वसामान्य प्रवासी, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या गरजा ओळखून केवळ घोषणा न करता सामान्यांच्या प्रवासाची व श्रद्धेची काळजी वाहणारे हे लोकाभिमुख सरकार असल्याचे यातून सिद्ध होते.
– हिमांशू शुक्ला