Wednesday, August 12, 2026

लेहमध्ये उभारले गेले भव्य ‘त्रिशूल युद्ध संग्रहालय’!

Share

१५ जून २०२० ची ती काळरात्र… पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील पीपी-१४. उणे अंश तापमान, गोठवून टाकणाऱ्या श्योक आणि गलवान नद्यांचा प्रवाह आणि समोर शत्रूचे आव्हान! बंदुकांचा वापर न करता केवळ काठ्या, लोखंडी गज आणि दगडांनी झालेल्या या धुमश्चक्रीत भारतीय जवानांनी शत्रूला असा परतीचा पाठ दाखवला, जो इतिहास कधीही विसरणार नाही.

भारतीय सैनिकांच्या याच अतुलनीय शौर्याला, साहसाला आणि बलिदानाला वंदन करण्यासाठी लेहमधील कारू भागात ‘त्रिशूल युद्ध संग्रहालय’ (Trishul War Museum) उभारण्यात आले आहे.

संग्रहालयाचे लोकार्पण आणि भावूक क्षण

नुकताच या संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. गलवानच्या संघर्षात देशसेवा करताना अमर झालेले कर्नल संतोष बाबू यांच्या वीरपत्नी बिकुमाला संतोषी यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित शहीद सैनिकांच्या वीरपत्नी आणि कुटुंबीयांच्या डोळ्यांत आपल्या वीरांच्या छायाचित्रांना आणि शौर्यगाथेला पाहून अश्रू अनावर झाले.

संग्रहालयाचे वैशिष्ट्य

या संग्रहालयाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लष्कराच्या अशा उपक्रमात एखाद्या राज्याने सहभाग नोंदवण्याची ही पहिलीच वेळ आहे! सप्टेंबर २०२३ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संग्रहालयाचे भूमिपूजन झाले होते. पुण्याच्या वास्तुविशारद प्राजक्ता कळमकर आणि नाशिकच्या अक्षय लुणावत यांनी या वास्तूचे डिझाइन तयार केले आहे. जे त्यांनी विनामोबदला केले आहे.

काय पाहायला मिळेल या संग्रहालयात?

त्रिशूलच्या आकारात रचलेल्या या संग्रहालयात पाऊल ठेवताच सीमेवर तैनात सैनिकांच्या धैर्याचा अनुभव येतो. चीनशी झालेल्या पहिल्या युद्धापासून आजवर शहीद झालेल्या सर्व अधिकारी व जवानांची नावे झाडाच्या पानांवर कोरण्यात आली आहेत. संघर्षाच्या वेळी चिनी सैनिकांकडून हस्तगत केलेली शस्त्रास्त्रे, दारुगोळा, त्यांची ओळखपत्रे, शत्रूच्या सैनिकांची पत्रे आणि संपर्क साधने येथे प्रदर्शनात ठेवली आहेत. विविध युद्धांत भारतीय लष्कराने वापरलेली वाहने, तोफा आणि दारुगोळा पर्यटकांना जवळून पाहता येईल. विशेषतः गलवान संघर्षाची संपूर्ण गाथा सांगणारे एक स्वतंत्र दालन येथे साकारण्यात आले आहे.

‘त्रिशूल डिव्हिजन’ची अखंड दक्षता

एकीकडे चीन आणि दुसरीकडे पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील सीमांचे रक्षण करण्याची अत्यंत महत्त्वाची आणि कठीण जबाबदारी भारतीय लष्कराची ‘त्रिशूल डिव्हिजन’ सांभाळते. अतिशय प्रतिकूल हवामान आणि दुर्गम भूप्रदेशातही या डिव्हिजनने नेहमीच शत्रूचे मनसुबे उधळून लावले आहेत.

प्रसिद्ध ‘रेझांग ला’ युद्ध स्मारकाच्या धर्तीवर उभारलेले हे संग्रहालय येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीची ज्योत नक्कीच पेटवत राहील!

अन्य लेख

संबंधित लेख