Wednesday, August 19, 2026

बॉस स्कॅमचे रॅकेट उघड… सायबर गुन्हेगारांचे परदेशात लागेबांधे…

Share

बॉस स्कॅमचे रॅकेट उघड… सायबर गुन्हेगारांचे परदेशात लागेबांधे…

गुजरातमधील अहमदाबाद सायबर क्राईम पोलिसांनी पश्चिम बंगालमधून दोन जणांना अटक केली असून, चीन आणि पाकिस्तानशी संबंध असलेली ‘बॉस स्कॅम’ (Boss Scam) ही सायबर गुन्हेगारी टोळी उघडकीस आणली आहे. यामध्ये इम्रान अली पियादा याला दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून, तर इंजम्मुल मुजीबुर मोल्ला याला कोलकाता येथून अटक करण्यात आली.

अहमदाबादचे पोलीस आयुक्त अनुपम सिंग गेहलोत यांनी सांगितले की, “या प्रकरणात पहिल्यांदाच ‘सायबर क्राईम ॲज अ सर्व्हिस’चा (सेवेच्या स्वरूपात सायबर गुन्हेगारी) वापर करण्यात आला. आरोपींचे मुख्य काम म्हणजे परदेशातील गुन्हेगारांना ओटीपी (OTP) ॲक्सेस उपलब्ध करून देणे, व्हॉट्सॲपवर नेटवर्क तयार करणे आणि भारतात सायबर गुन्हे करण्यासाठी पाकिस्तान व चीनमधील पायाभूत सुविधांचा वापर केला जात होता असे निदर्शनास आले आहे.

Boss Scam हा एक प्रकारचा Impersonation / Social Engineering Fraud आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार एखाद्या कंपनीच्या बॉस, वरिष्ठ अधिकारी, CEO, मॅनेजर किंवा मालकाचे रूप धारण करून कर्मचारी किंवा संबंधित व्यक्तीला तातडीने पैसे पाठवण्यास किंवा गोपनीय माहिती देण्यास सांगतात. अशा प्रकारच्या फसवणुकीत ई-मेल, WhatsApp, SMS, फोन कॉल किंवा सोशल मीडिया अकाउंटचा वापर केला जाऊ शकतो. Business Email Compromise (BEC) मध्येही विश्वासार्ह व्यक्तीच्या अकाउंटचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते.

हा फ्रॉड कसा होतो?

बॉसच्या नावाने मेसेज किंवा ई-मेल येतो

“मी मीटिंगमध्ये आहे”, “तातडीचे काम आहे” किंवा “हा व्यवहार लगेच पूर्ण करा” असा संदेश पाठवला जातो.

तातडीची परिस्थिती निर्माण केली जाते

“आत्ताच पैसे पाठवा”, “कुणालाही सांगू नका” किंवा “माझ्याकडे फोन करण्याची सोय नाही” असे सांगून विचार करण्यासाठी वेळ दिला जात नाही.

पैसे किंवा गोपनीय माहिती मागितली जाते

नवीन बँक खाते/UPI ID वर पैसे पाठवणे, OTP, पासवर्ड, कार्डची माहिती किंवा इतर संवेदनशील माहिती मागितली जाऊ शकते.

नकली प्रोफाइल किंवा ई-मेल वापरला जातो

नाव, फोटो, ई-मेल ID किंवा WhatsApp प्रोफाइल हुबेहूब वापरून विश्वास निर्माण केला जातो. आता AI च्या मदतीने अधिक विश्वासार्ह impersonation, phishing आणि deepfake तयार होण्याची शक्यता असल्याचे CERT-In नेही नमूद केले आहे.

Boss Scam पासून स्वतःचे संरक्षण कसे कराल?

  • तातडीचा आर्थिक व्यवहार सांगितला तर आधी खात्री करा.
  • मेसेजला थेट उत्तर देण्याऐवजी बॉसला त्यांच्या नेहमीच्या फोन नंबरवर कॉल करून व्यवहाराची पुष्टी करा.
  • ई-मेलचा पूर्ण पत्ता तपासा—फक्त नाव पाहून विश्वास ठेवू नका.
  • अनोळखी किंवा नवीन UPI ID/बँक खात्यावर पैसे पाठवण्यापूर्वी लाभार्थीची खात्री करा.
  • OTP, PIN, CVV, पासवर्ड किंवा इंटरनेट बँकिंग लॉगिनची माहिती कोणालाही देऊ नका.
  • “गुप्त ठेवा”, “आत्ताच करा”, “वरिष्ठांचा आदेश आहे” अशा दबावाच्या संदेशांबाबत विशेष सावध रहा.
  • कंपनीमध्ये मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी दुहेरी पडताळणी (Two-step verification) किंवा निश्चित approval process ठेवा.
  • ई-मेल, WhatsApp आणि इतर महत्त्वाच्या खात्यांसाठी Multi-Factor Authentication (MFA) सक्षम करा.

 फसवणूक झाल्यास काय करावे?

पैसे चुकीच्या खात्यात गेले असल्यास वेळ न दवडता आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि व्यवहाराची माहिती द्या. त्याचबरोबर भारत सरकारच्या National Cyber Crime Reporting Portal वर तक्रार नोंदवता येते. या पोर्टलवर आर्थिक फसवणुकीसाठी स्वतंत्र तक्रार सुविधा उपलब्ध आहे. संशयास्पद मोबाइल नंबर, ई-मेल, UPI ID, वेबसाइट किंवा सोशल मीडिया अकाउंटची माहितीही तपासता किंवा रिपोर्ट करता येते.

अन्य लेख

संबंधित लेख