Thursday, September 10, 2026

उत्तरेश्वर मंदिराचा होणार जीर्णोद्धार!

Share

प्रस्तावना

भारताच्या सहस्रो वर्षांच्या अखंड प्रवाहात मंदिरे ही केवळ उपासनेची ठिकाणे नव्हती; तर ती समाजाच्या चैतन्याची, संस्कृतीची, स्थापत्यकलेची आणि सामाजिक समरसतेची अक्षय ऊर्जाकेंद्रे राहिली आहेत. शतकानुशतके झालेली परकीय आक्रमणे आणि त्यानंतरच्या कालखंडातील आत्मविस्मृतीमुळे यातील अनेक पवित्र वास्तू काळाच्या ओघात उपेक्षित राहिल्या. आज आपल्या सांस्कृतिक स्वत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि भावी पिढ्यांमध्ये संस्कृतीविषयी व इतिहासाबद्दल स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी या प्राचीन देवस्थानांचे पुनरुत्थान करणे ही सामाजिक गरज बनली आहे.

प्राचीन मंदिरांना नवे वैभव

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने ‘प्राचीन मंदिरांना नवे वैभव’ या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) माध्यमातून राज्यातील नऊ प्राचीन मंदिरांच्या जतन, संवर्धन आणि परिसर विकासाचा घेतलेला निर्णय स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात कार्ल्याचे एकवीरा देवी मंदिर (पुणे), राजापूरचे धूतपापेश्वर (रत्नागिरी), खिद्रापूरचे कोपेश्वर (कोल्हापूर), सिन्नरचे गोंदेश्वर (नाशिक), छत्रपती संभाजीनगर परिसरातील खंडोबा मंदिर, बीडमधील पुरुषोत्तमपुरीचे भगवान पुरुषोत्तम मंदिर, अमरावतीचे आनंदेश्वर शिवमंदिर, गडचिरोलीचे मार्कंडेश्वर आणि साताऱ्यातील दुर्गम भागातील उत्तेश्वर मंदिर अशा ९ मंदिरांची निवड केली आहे.

श्री उत्तेश्वर मंदिर

या नऊ मंदिरांमध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील बामणोली परिसरातील कांदाटी खोऱ्यात वसलेले श्री उत्तेश्वर (उत्तरेश्वर) मंदिर विशेष लक्षवेधी आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील बामणोली व तापोळा परिसरातील शिवसागरापलीकडे वसलेले श्री उत्तेश्वर मंदिर हे सह्याद्रीच्या अत्यंत दुर्गम भागात, कांदाटी खोऱ्यातील निसर्गरम्य डोंगरमाथ्यावर वसलेले एक प्राचीन व जागृत देवस्थान आहे.

मंदिराच्या उत्पत्तीची लोककथा

उत्तेश्वर मंदिराच्या प्रकटीकरणाबाबत पिढ्यान्‌पिढ्या एक श्रद्धापूर्ण आख्यायिका सांगितली जाते. प्राचीन काळी गोगावले व दरे परिसरातील आपल्या मामाकडे एक गरीब गुराखी मुलगा गुरे चारण्याचे काम करत असे. एके दिवशी त्याच्या गोठ्यातील एका दुभत्या गायीने अचानक दूध देणे बंद केले. गायीचे दूध नेमके कुठे जाते, याचा शोध घेण्यासाठी त्या गुराख्याने जंगलात गायीचा पाठलाग केला. डोंगरमाथ्यावरील शेवटच्या टोकावर पोहोचल्यावर, ती गाय एका नैसर्गिक पाषाणावर उभी राहून स्वतःहून दुधाची धार म्हणजेच पान्हा सोडत असल्याचे त्याला दिसले.

त्याच रात्री भगवान शंकराने त्या गुराख्याच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, “मी या ठिकाणी स्वयंभू रूपात प्रगट झालो असून तू येथे माझी नियमित सेवा व पूजा कर, मी तुझ्या कुळाचा उद्धार करीन.” या दैवी दृष्टांतानंतर त्या गुराख्याने सुरुवातीला डोंगरमाथ्यावर आणि नंतर खाली वाळणे गावात आंब्याच्या झाडाखाली छोटे मंदिर बांधून पूजन सुरू केले. देवाच्या आशीर्वादाने त्यांच्या वंशाचा विस्तार झाला आणि उत्तेश्वराच्या कृपेने त्यांना ‘उत्तेकर’ हे नाव मिळाले.

प्राचीन स्थापत्य व स्वरूप

काळ्या बेसॉल्ट पाषाणात बांधलेल्या या मंदिरामध्ये पारंपरिक हेमाडपंती स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये दिसून येतात. मंदिर संकुलामध्ये मुख्य गर्भगृह, सभामंडप, नगारखाना, लग्नस्थान, संरक्षण भिंत, दगडी पायऱ्या आणि पालखी कट्टा अशी परिपूर्ण रचना आहे. मंदिराच्या मूळ बांधकामामध्ये सिमेंटचा लवलेश नसून केवळ घडवलेले पाषाण आणि चुना, गूळ, बेलफळाच्या रसासारख्या पारंपरिक घटकांच्या मिश्रणातून प्राचीन काळात या भक्कम वास्तूची उभारणी करण्यात आली होती.

वार्षिक यात्रा व धार्मिक परंपरा

दरवर्षी हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात (जानेवारी) पौष पौर्णिमा तसेच पुनर्वसु व पुष्य नक्षत्राच्या काळात येथे तीन दिवसांची भव्य यात्रा भरते. या यात्रेसाठी तिन्ही जिल्ह्यांतील भाविक मोठ्या संख्येने एकत्र येतात. भाविक शिवसागर जलाशयातून लाँच किंवा बोटीने प्रवास करून आणि पुढे दुर्गम डोंगर पायवाटेने चढाई करत मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी डोंगरमाथ्यावर पोहोचतात.

या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे स्थान सह्याद्रीच्या घाटमाथ्यापासून ते कोकणातील दऱ्याखोऱ्यांपर्यंत पसरलेल्या सातारा, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यांतील उत्तेकर, सकपाळ, म्हाब्दी आदी समाजाचे हे आराध्य कुलदैवत आहे. दरवर्षी पौष महिन्यात जलाशय आणि दुर्गम डोंगर पार करून एकत्र येणारा भाविक समुदाय एकात्म समाजजीवनाची साक्ष देतो.

निष्कर्ष

उत्तेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी मंजूर झालेला ३७ कोटी रुपयांचा आराखडा केवळ एका वास्तूची दुरुस्ती नसून, आपल्या पूर्वजांच्या शाश्वत स्थापत्यशास्त्राला दिलेली मानवंदना आहे. येथे आधुनिक सिमेंटचा वापर पूर्णपणे वर्ज्य करून, प्राचीन भारतीय पद्धतीनुसार चुना, गूळ आणि बेलफळाच्या रसाच्या पारंपारिक मिश्रणाने तसेच स्थानिक काळ्या बेसॉल्ट पाषाणाने केली जाणारी पुनर्बांधणी ही स्वदेशी ज्ञानपरंपरेची पुनर्प्रतिष्ठा आहे. मंदिराचा ऐतिहासिक सभामंडप, नगारखाना, लग्नस्थान संरक्षण भिंत, पालखी कट्टा आणि पुरातन दगडी पायऱ्यांचे मूळ हेमाडपंती स्वरूप अबाधित राखत होणारा हा जीर्णोद्धार भावी पिढ्यांना आपल्या समृद्ध वारशाची जाणीव करून देईल.

शासनाने उचललेले हे पाऊल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाची नांदी ठरो आणि अशा पवित्र प्रयत्नांतून समाजातील प्रत्येक घटकात स्वाभिमान,एकात्मता आणि समरसतेची भावना अधिक बळकट होवो.

अन्य लेख

संबंधित लेख