Wednesday, October 21, 2026

पोलीस स्मृती दिन

Share

प्रस्तावना

आज २१ ऑक्टोबर. आपल्या देशात वर्षाचे ३६५ दिवस कोणत्या ना कोणत्या राजकीय घडामोडींवरून, टीव्ही स्टुडिओमधील निरर्थक वादांवरून गदारोळ चालूच असतो. मात्र यासाठी आवश्यक असणारी सुरक्षितता असेल तरच तथाकथित बुद्धिजीवी वर्गाला स्वाभिमान जपता येतो. आणि या स्वाभिमानी राष्ट्राची ताकद सामावलेली असते ती तिथल्या सामान्य नागरिकाला निर्भयपणे जगता यावे यासाठी अहोरात्र डोळ्यांत तेल घालून पहारा देणाऱ्या रक्षकांच्या निष्ठेमध्ये. आजचा दिवस हा भारतीय राष्ट्रीय सुरक्षेच्या इतिहासात आठवण करून देतो तो एका त्यागाची, कर्तव्य कठोरतेची आणि राष्ट्रधर्माची. हा दिवस आहे ‘पोलीस स्मृती दिन’. 

काय घडले २१ ऑक्टोबरला?

इतिहास असा सहजासहजी पुसता येत नसतो. १९५० च्या दशकाच्या अखेरीस, जेव्हा दिल्लीतले राज्यकर्ते ‘हिंदी-चिनी भाई-भाई’च्या रोमँटिक गुंगीत मग्न होते, तेव्हा भारत आणि तिबेट दरम्यानच्या सुमारे अडीच हजार मैलांच्या अतिदुर्गम सीमेचे रक्षण नियमित लष्कर करत नव्हते; तिथे छातीचा कोट करून उभे होते ते केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि गुप्तचर विभागाचे (IB) जवान! समुद्रसपाटीपासून तब्बल १५ ते १६ हजार फूट उंचीवर, उणे तापमानात हे पोलीस जवान देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून पहारा देत होते.

२० ऑक्टोबर १९५९ रोजी लनक ला खिंडीच्या दिशेने गेलेली एक टेहळणी तुकडी परत आली नाही. दुसऱ्या दिवशी, म्हणजे २१ ऑक्टोबरला सकाळी, डीएसपी करम सिंग आपल्या अवघ्या वीस जवानांना घेऊन त्या लापत्ता सहकाऱ्यांच्या शोधात निघाले. तिथे काय झाले? टेकडीवर दबा धरून बसलेल्या चिनी सैन्याने मोर्टार, स्वयंचलित शस्त्रे आणि ग्रेनेड्सचा वापर करून तिन्ही बाजूंनी अचानक भीषण हल्ला चढवला. समोर आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले चिनी सैन्य आणि आपल्या जवानांच्या हातात काय? तर केवळ साध्या बोल्ट-ॲक्शन रायफली! त्या उघड्या माळरानावर कसलाही नैसर्गिक आडोसा नसताना हे जवान मागे हटले नाहीत. त्यांनी निकराचा प्रतिकार केला आणि कर्तव्य बजावताना १० पोलीस जवानांनी मातृभूमीसाठी हौतात्म्य पत्करले.

राष्ट्रीय पोलीस स्मारक

या घटनेनंतर तत्कालीन सरकारला जाग आली आणि त्यांनी सीमेची सूत्रे लष्कराकडे सोपवली. जानेवारी १९६० मध्ये देशभरातील सर्व पोलीस महानिरीक्षकांनी एकत्र येऊन ठरवले की, २१ ऑक्टोबर हा दिवस ‘पोलीस स्मृती दिन’ म्हणून पाळला जाईल. परंतु, स्वातंत्र्यापासून आजतागायत ज्या ३५ हजारांहून अधिक पोलिसांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्या खाकी वर्दीतल्या रक्षकांसाठी देशाच्या राजधानीत एक भव्य राष्ट्रीय पोलीस स्मारक उभारायला थेट २०१८ साल उजाडावे लागले, ही आपल्या व्यवस्थेची अनास्था आणि सोयीस्कर विस्मृती नाही तर काय? चाणक्यपुरीतल्या त्या ३० फूट उंच काळ्या ग्रॅनाइटच्या एकाश्म स्तंभावर आणि ‘शौर्य भिंती’वर कोरलेली ती नावे केवळ अक्षरे नाहीत, ती या देशाच्या अंतर्गत शांततेची मोजलेली किंमत आहे. त्या स्तंभाच्या तळाशी अखंड वाहणारा पाण्याचा प्रवाह आपल्याला संदेश देतो की, ज्याप्रमाणे नदी स्वतः न थांबता समाजाला जीवन देते, त्याचप्रमाणे हे जवान समाजाच्या शांततेसाठी स्वतःचा वर्तमान समर्पित करतात.

आज जेव्हा आपण स्वतंत्र भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा विचार करतो, तेव्हा अंतर्गत कलह, सीमापार पुरस्कृत दहशतवाद, नक्षलवादाचे आव्हान आणि समाजकंटकांचा उपद्रव या सर्व संकटांच्या विरोधात सर्वात पहिली ढाल म्हणून कोण उभा असतो? तो असतो खाकी वर्दीतला पोलीस.

दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारकापासून ते देशातील अगदी दुर्गम जिल्हा आणि बटालियन मुख्यालयापर्यंत ‘रोल ऑफ ऑनर’चे वाचन होते. मागील एका वर्षात कर्तव्यावर असताना बलिदान देणाऱ्या सुमारे दीडशे ते अडीचशे जवानांची नावे आदराने पुकारली जातात. या वाचनात पदाचा कोणताही अहंकार किंवा वर्गभेद नसतो; एका शिपायापासून ते वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाचे नाव सन्मानाने घेतले जाते. कारण राष्ट्रसेवेच्या यज्ञात दिलेली आहुती ही सर्वांची समान आणि पवित्र असते.

नागरिकांची जबाबदारी

विविध मुद्द्यांवरून पोलिसांना धारेवर धरले जाते. मात्र जेव्हा कुठे दंगली उसळतात, नक्षलवादी हल्ले होतात किंवा मुंबईवर २६/११ सारखा दहशतवादी हल्ला होतो, तेव्हा आपल्या घरांचे रक्षण करण्यासाठी पहिली गोळी स्वतःच्या छातीवर कोण झेलतो? सणासुदीच्या काळात आपण जेव्हा कुटुंबासोबत दिवाळी-दसरा साजरा करत असतो, तेव्हा उपाशीपोटी रस्त्यावर उभा राहून पहारा कोण देतो? तो हाच खाकी वर्दीतला पोलीस असतो! शोक संचलनात जेव्हा ‘शोक शस्त्र’ केले जाते, ‘लास्ट पोस्ट’चे कारुण्यमय बिगुल वाजते आणि हवेत तीन फैरी झाडून त्या हुतात्म्यांना अखेरची शासकीय सलामी दिली जाते, तेव्हा मागे उरतात ती त्यांची वृद्ध आई-वडील, एकाकी झालेली वीरपत्नी आणि पित्याचे छत्र हरपलेली निष्पाप मुले. या कुटुंबांप्रतीची संवेदनशीलता ही केवळ पोलीस खात्याची किंवा सरकारची जबाबदारी आहे का? की ती संपूर्ण समाजाची सामूहिक राष्ट्रीय कृतज्ञता असायला हवी?

थोडक्यात

‘सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य गाडीवर किंवा भिंतीवर लावण्यासाठी सोपे आहे; पण ते निभावताना हजारो जवानांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, मुले पोरकी झाली आहेत.

थोडक्यात सांगायचे तर, देशात लोकशाही, आर्थिक प्रगती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी फळे आपण बिनदिक्कत चाखत आहोत, ती फळे या पोलिसांच्या रक्ताने सिंचन केलेल्या शांततेवर उभी आहेत. पोलिसांच्या त्यागाची जाणीव ठेवणे आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण समाजाने एकसंधपणे उभे राहणे, हेच आपले खरे राष्ट्रकर्तव्य आहे.

अन्य लेख

संबंधित लेख