Saturday, October 3, 2026

दिमागी नक्षल : जंगलापलीकडचे युद्ध

Share

काही युद्धे बंदुकीने लढली जातात. काही युद्धे विचारांनी लढली जातात. भारतातील माओवादी बंडखोरी एकेकाळी जंगलात दिसत होती. तिथे सशस्त्र नक्षलवाद्यांनी भारतीय व्यवस्थेला आव्हान दिले. आज अनेक दशकांच्या कारवाईनंतर आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निर्धारानंतर हे सशस्त्र आव्हान मोडीत निघाले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवा मुद्दा मांडला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे नक्षलवादाचे किंवा माओवादाचे वैचारिक आव्हान संपलेले नाही. ‘नक्षली मानसिकता किंवा विचार’ असणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दिमागी नक्षल’ असे म्हटले आहे. अशा लोकांना नीट ओळखून दूर करायला पाहिजे, असा इशारा पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट शब्दांत दिलेला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी हा इशारा देताच यावर लगेच राजकीय प्रतिक्रिया उमटली. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी यांचा प्रतिवाद केला. ते म्हणाले, “दिमागी नक्षल असल्याचा मला अभिमान आहे.” अरविंद केजरीवाल आणि तृणमूलच्या महुआ मोईत्रा यांनीही या वादात त्यानंतर उडी घेतली. त्यामुळे आता प्रश्न फक्त मोदींना काय म्हणायचे होते, हा उरलेला नाही. प्रश्न असा आहे की, या शब्दावर इतकी तीव्र प्रतिक्रिया का उमटली? आणि यात अभिमान बाळगण्यासारखे नक्की काय आहे?

‘दिमागी नक्षल’ हा शब्द राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. हा कोणताही अधिकृत मानसशास्त्रीय किंवा समाजशास्त्रीय शब्द नाही. याचे महत्त्व एका विशिष्ट युक्तिवादात आहे. जंगलातील सशस्त्र नक्षलवाद संपेल. पण नक्षलवादाची वैचारिक परिसंस्था असणारी विद्यापीठे, खलबतखाने, वृत्तवाहिन्या, राजकीय संस्था व विद्यापीठे आणि इरतत्र असणाऱ्या बौद्धिक वर्तुळात नक्षलवाद हा जिवंत आहे आणि तसा तो काही काळ तरी राहणार, हे दिसतेच आहे. पंतप्रधानांचा सगळा रोख इकडे आहे.

भारतात हिंसाचार करणारा बंदूकधारी नक्षलवादी स्पष्ट दिसत होता. मात्र, वैचारिक म्हणजेच दिमागी नक्षलवादी ओळखणे कठीण असते. पहिला हिंसेच्या मार्गाने राज्याला आव्हान देतो. दुसरा विचार आणि नरेटिव्हच्या माध्यमातून देशाच्या संस्था, राष्ट्रीय प्रतीके आणि सांस्कृतिक पाया या साऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. हे सारे प्रयत्न अत्यंत हुशारीने, सुसंस्कृतपणाची लाढ करून, समाजाला थेट न दुखावता आणि शक्यतो कायद्यांचे उल्लंघन न करता केले जातात. मग खरी लढाई इथेच सुरू होते.

या व्यापक राजकीय संदर्भात ‘दिमागी नक्षल’ म्हणजे केवळ सरकारवर टीका करणारा माणूस नव्हे. लोकशाहीत मतभेद असणे हा घटनात्मक अधिकार आहे. सरकारला विरोध करणे म्हणजे देशाला विरोध करणे नव्हे. खरा प्रश्न त्या टीकेमागील वैचारिक भूमिकेचा आहे. देशातील लोकशाही संस्था, आपली राष्ट्रीय ओळख आणि नागरिकांचे घटनात्मक अधिकार यांना जाणीवपूर्वक दडपशाहीचे साधन ठरवले जाते का? त्यांची त्या दृष्टीने सतत बदनामी केली जाते का? आणि त्याच वेळी देशविरोधी राजकारण करणाऱ्या शक्तींना, संघटनांना, गटांना आणि प्रकाशनांना बौद्धिक समर्थन दिले जाते का? हा खरा मुद्दा आहे. असे जर होत असेल तर ते गंभीर आहे आणि ते मोडूनच काढावे लागेल.

या प्रवृत्तीची काही प्रमुख लक्षणे…

  • प्रस्थापित विचारधारेला विरोध : राष्ट्रवाद, सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्याकडे आदराने न पाहता, ती दडपशाहीची साधने मानणे. त्यांचा त्या दृष्टीने सतत निषेध करणे किंवा त्यांचा उल्लेख करताना तो अपमानास्पद पद्धतीने करणे.
  • संस्थांना बदनाम करणे : संसद, न्यायव्यवस्था, निवडणुका आणि सुरक्षा दले यांना कायम ‘हुकूमशाही’ किंवा ‘दडपशाही’च्या चष्म्यातून पाहणे.
  • दुटप्पी नैतिकता : राज्याकडून सर्वोच्च नैतिकतेची अपेक्षा करणे. पण त्याच वेळी देशविरोधी चळवळींच्या हिंसेला सामाजिक परिस्थितीच्या नावाखाली देऊन पाठीशी घालणे. त्यांचा स्पष्टपणे निषेध करणे तर सोडाच, त्यांच्या समर्थनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न या दिमागी नक्षलवाद जोपासणाऱ्या शक्ती व व्यक्ती करीत असतात.
  • दहशतवादाचे उदात्तीकरण : माओवाद्यांच्या सशस्त्र हिंसाचाराचा थेट निषेध करण्याऐवजी अथवा असा हिंसाचार थेट नाकारण्याऐवजी ती ‘दडपशाहीवरची प्रतिक्रिया’ असल्याचे सांगणे.
  • राष्ट्रीय प्रतीकांचा तिरस्कार : राष्ट्रध्वज, वंदे मातरम्, लष्कर आणि पारंपरिक प्रतीकांना केवळ बहुसंख्याकवादाच्या चष्म्यातून पाहणे. त्यांचा आदर न करणे किंवा त्यांच्याबद्दलचा अनादर सतत आपल्या वक्तव्यातून किंवा कृतीतून करत राहणे.
  • सांस्कृतिक न्यूनगंड : भारतीय संस्कृतीकडे केवळ जात, पितृसत्ता आणि दडपशाही याच कोत्या नजरेतून पाहणे. तिच्या ऐतिहासिक यशाला कमी लेखणे.
  • शब्दांचा खेळ : बौद्धिक तटस्थतेच्या बुरख्याखाली ‘फॅसिस्ट’ किंवा ‘हुकूमशहा’ या राजकीय शब्दांचा सर्रास वापर करणे.
  • नॅरेटिव्हचे युद्ध : देशाची सत्ता उलथवणे हाच केवळ हेतू नसतो. देशाच्या संस्थांवरून लोकांचा विश्वास उडवणे, हाही हेतू असतो.
  • सोयीस्कर इतिहास : स्वतःच्या विचारधारेला सोयीस्कर असाच इतिहास मांडणे आणि गैरसोयीचा इतिहास लपवणे.
  • कांगावा करणे : नेहमी स्वतःला ‘पीडित’ दाखवणे. राजकीय मतभेद असतानाही स्वतःवर अन्याय होत असल्याचा सतत कांगावा करणे.

या वरील सर्व कारणामुळे सशस्त्र नक्षलवादी आणि ‘दिमागी नक्षल’ यातील फरक महत्त्वाचा ठरतो. नक्षलवादी राज्याला थेट आव्हान देतो. दिमागी नक्षल राज्याच्या अस्तित्वालाच बौद्धिक पातळीवर आव्हान देतो. नक्षलग्रस्त भागातील चित्र आता बदलले आहे. २०२६ च्या आकडेवारीनुसार, २०१४ मधील १२६ नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या आता शून्यावर आली आहे. सशस्त्र चळवळ जवळपास संपली आहे. नेमक्या याच पार्श्वभूमीवर मोदींच्या इशाऱ्याला महत्त्व प्राप्त झाले. 

ही जंगलापलीकडची खरी लढाई आहे. भारताला बौद्धिक मतभेदांची भीती बाळगण्याची गरज नाही. पण घटनात्मक मतभेद आणि हिंसेचे उदात्तीकरण यातील फरक स्पष्ट असायला हवा. जर ‘दिमागी नक्षल’ असणे अभिमानाची गोष्ट असेल, तर माजी गृहमंत्र्यांनी देशाला स्पष्टीकरण द्यायला हवे. नक्षलवाद्यांच्या कोणत्या वैचारिक वारशाचे ते समर्थन करत आहेत? सशस्त्र नक्षलवाद्यांनी जंगलातला लढा गमावला असेल; पण नागरिकांच्या मेंदूचा ताबा मिळवण्याची ही लढाई पूर्णपणे वेगळी आहे.

अन्य लेख

संबंधित लेख