मुंबई : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी डिसेंबर महिन्यातील धान्य वितरणाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विभागाच्या कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास केला. राज्यात डिसेंबर महिन्यात प्राप्त नियतनाच्या 92.09% धान्याचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित वितरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुरवठा विभागाची ई-बैठक आयोजित करण्यात आली.
ई-पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणी, पोर्टलचे सर्वर डाऊन होणे आणि अन्य समस्यांबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. डिसेंबर महिन्यातील धान्य वितरणाची आकडेवारी पाहता, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ९८.५९ टक्के तर धुळे जिल्ह्यात सर्वात कमी ८१.६९ टक्के वितरण झाले आहे. ही आकडेवारी १०० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी ऑनलाइन आणि इतर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी संबंधित विभागाला आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच, या संदर्भात पुढील आठवड्यात सर्व संबंधितांसोबत आणखी एक बैठक आयोजित करण्याचेही निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले आहेत.
सर्वर डाऊन असणे, किंवा अन्य कारणांनी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये विविध योजनेतील लाभार्थींना धान्य वितरण डिसेंबर महिन्यात होऊ शकले नाही, त्यांना या महिन्यांमध्ये मुदतवाढ देण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने देण्याबाबतही मंत्री मुंडे यांनी संबंधित जिल्ह्यांना निर्देश दिले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील उर्वरित साखर उपलब्ध करून देणे त्याचबरोबर नागपूर विभागातील पुरवठा निरीक्षक व अन्य रिक्त पदे भरून देण्याबाबतचा प्रस्ताव देखील स्वतंत्ररीत्या मागवण्याबाबत धनंजय मुंडे यांनी संबंधितांना या बैठकीत निर्देश दिले आहेत. एफसीआयकडे विविध करार काही दिले व अन्य असलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने पुढील आठवड्यातील बैठकीमध्ये त्यावर निर्णय घेतला जाईल असेही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.
विविध जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी धान्याचे रॅक उतरवले जातात, त्या भागातील रस्ते व अन्य सुविधांच्याबाबतही स्वतंत्र आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असेही श्री. मुंडे म्हणाले आहेत. ई – पॉस मशीनवर डेटा उपलब्ध करून देणे, सर्वर डाऊन च्या समस्या यासह सर्वच्या सर्व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यासंदर्भात मंत्री मुंडे यांनी स्वतंत्र निर्देश दिले आहेत. या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव, उपसचिव, शिधावाटप संचालनालयाचे नियंत्रक, पुरवठा विभागाचे सर्व उपयुक्त तसेच राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी व उपनियंत्रक आदी उपस्थित होते.