Friday, September 11, 2026

१० वर्षे आणि १०० कोटींचा प्रवास

Share

गेल्या दशकात देशाने दूरसंचार क्षेत्रात मोठी झेप घेतली असून इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या सुमारे २५ कोटींवरून १०० कोटींपेक्षा अधिक झाली. ब्रॉडबैंड कनेक्शनची संख्याही ६ कोटींवरून १०२ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. देशात सध्या १३३ कोटी मोबाइल फोन असून, त्यापैकी ५२ कोटी मोबाइल ग्रामीण भागात आहेत. ही केवळ दूरसंचार क्षेत्राची आकडेवारी नसून, आर्थिक प्रगती आणि सर्वसामान्यांना मिळणाऱ्या संधींचे चित्र असल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी फिनटेक परिषदेत बोलताना सांगितले.

देशातील प्रत्येक गावाला डिजिटल नेटवर्कशी जोडण्याचे काम युद्धपातळीवर  सुरू आहे. भारतात २०२२ पासून ५जी नेटवर्क उभारणीला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या २६ महिन्यांत देशातील ९९.९ टक्के जिल्ह्यांमध्ये ५जी नेटवर्कची क्षमता उपलब्ध झाली असून, सुमारे ८५ टक्के लोकसंख्या त्याच्या कक्षेत आली आहे. या कामासाठी सुमारे ४,५०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च आतापर्यंत झाला आहे.

मुळातच फिनटेक म्हणजे काय..

फिनटेक हा ‘Financial Technology’ या दोन शब्दांपासून बनलेला शब्द आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, वित्तीय किंवा आर्थिक सेवा अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आणि इंटरनेटचा केला जाणारा वापर म्हणजे फिनटेक. एकेकाळी बँकेच्या रांगेत उभे राहून पैसे भरणे, पासबुक प्रिंट करणे किंवा चेक क्लिअरिंगसाठी वाट पाहणे आवश्यक होते. फिनटेकमुळे या सर्व गोष्टी आता आपल्या मोबाईल स्क्रीनवर आल्या आहेत.

डिजिटल पेमेंट्स, डिजिटल बँकिंग, डिजिटल कर्जे, गुंतवणूक आणि शेअर बाजार, विमा तंत्रज्ञान फिनटेकची उदाहरणे आहेत. फिनटेकचे प्रमुख फायदे म्हणजे विशिष्ट कामाशिवाय  बँकेच्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत. दिवस असो की रात्र, कधीही आणि कुठूनही वित्तीय व्यवहार करता येतात.व्यवहाराचा झटपट मेसेज मिळतो आणि खात्यावर पूर्ण नियंत्रण राहते. बँका जिथे पोहोचू शकल्या नाहीत, तिथे मोबाईल आणि इंटरनेटमुळे फिनटेक सेवा पोहोचल्या आहेत. डेटा हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्थव्यवस्थेसाठी इंधन ठरत असून, कनेक्टिव्हिटी, संगणकीय क्षमता आणि विश्वास या तीन बाबींमधून नवी डिजिटल व्यवस्था उभी राहते आहे.

२०१४ नंतर ..

२०१४ पूर्वी भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या नगण्य होती. इंटरनेटचा वेग, त्याची उपलब्धता आणि अवाजवी दर यांमुळे सामान्य माणसासाठी डिजिटल जग हे एका स्वप्नासारखे होते. मात्र, त्यानंतरच्या दशकात राबवण्यात आलेले धोरणात्मक निर्णय, डिजिटल इंडिया अभियान, ऑप्टिकल फायबरचे जाळे आणि दूरसंचार क्षेत्रातील तीव्र स्पर्धेतून स्वस्त डेटा उपलब्ध झाल्यामुळे चित्र वेगाने बदलले आहे. गेल्या १० वर्षांत १०० कोटी लोकांना इंटरनेटच्या जाळ्यात आणणे ही साधी गोष्ट नाही. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ‘डिजिटल दरी’ कमालीची सांधली गेली आहे. शेतकरी, लहान व्यापारी, विद्यार्थी आणि गृहिणी यांच्या हातात आता स्मार्टफोनच्या माध्यमातून माहितीचे अथांग भांडार खुले झाले आहे. शिक्षण, आरोग्य, आणि शासकीय सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे सर्वसमावेशक विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे.

फिनटेक क्षेत्राची घोडदौड..

इंटरनेटच्या या अभूतपूर्व प्रसाराचा सर्वांत मोठा आणि प्रत्यक्ष फायदा झाला तो भारताच्या आर्थिक क्षेत्राला.युपीआय या भारताच्या स्वदेशी डिजिटल पेमेंट प्रणालीने जागतिक स्तरावर इतिहास रचला आहे. आज भाजीविक्रेत्यापासून ते मोठ्या मॉलपर्यंत प्रत्येक ठिकाणी क्यूआर कोडद्वारे होणारे व्यवहार हे देशाच्या बदलत्या आर्थिक वर्तनाचे प्रतीक आहेत.

जनधन योजना, आधार आणि मोबाईल (JAM ट्रिनिटी) यांच्या एकत्रीकरणामुळे कोट्यवधी नागरिक थेट बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले. थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सरकारी मदतीचा पैसा मध्यस्थांशिवाय थेट गरिबांच्या खात्यात जमा होऊ लागला. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसलाच शिवाय पारदर्शकता व कार्यक्षमता देखील कमालीची वाढली आहे.

डिजिटल इंडियाने देशातील दळणवळण, व्यवहार आणि एकूणच जीवनशैली बदलून टाकली आहे. आता पुढील टप्प्यात भारत जेव्हा ‘विकसित भारत २०४७’ च्या दिशेने वाटचाल करत असताना हेच इंटरनेट आणि फिनटेकचे जाळे देशाच्या आर्थिक वाढीचा मुख्य इंजिन ठरणार आहे.

– हिमांशु शुक्ला

अन्य लेख

संबंधित लेख