भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत काळाकुट्ट दिवस म्हणजे २५ जून १९७५. (आणीबाणी : २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७). या घटनेला बरोबर ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. एका रात्रीत संपूर्ण देशाला एका व्यक्तीच्या अहंकारापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी तुरुंग बनवले गेले. घटनेचा गळा घोटला गेला आणि देशातील जनतेचे मूलभूत अधिकार पायदळी तुडवले गेले. आज संसदेच्या पायऱ्यांवर घटनेची प्रत हातात घेऊन जे ‘लोकशाही धोक्यात आहे’ असा खोटा नरेटिव्ह उभा करून रोज गळे काढत आहेत, त्यांनी ५१ वर्षांपूर्वीचा हा इतिहास आणि त्या काळातील दडपशाहीचा क्रूर चेहरा डोळे उघडून पाहण्याची गरज आहे.
भारतात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी म्हणजे कायदेशीर हुकूमशाही काय असते, याचा तो जिवंत पुरावा होता. परंतु, या दहशतीच्या कालखंडात मोठमोठे नेते आणि तथाकथित लढाऊ संघटना सत्ताधाऱ्यांसमोर शरणागत झाल्या, तेव्हा महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि वैचारिक विश्वाने दडपशाहीशी झुंजार लढा दिला होता.
दुर्गा भागवतांची ऐतिहासिक गर्जना
देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच, डिसेंबर १९७५ मध्ये कराड येथे ५१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्या संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गा भागवत होत्या. कडक सेन्सॉरशिपच्या आणि सरकारच्या विरोधात बोलण्याची बंदी असलेल्या त्या भयग्रस्त वातावरणात, साक्षात केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण व्यासपीठावर उपस्थित असताना दुर्गाबाईंनी जे अध्यक्षीय भाषण केले, ते हुकूमशाहीच्या छाताडावर मारलेली थेट चपराक होती. दुर्गाबाईंनी ठणकावून सांगितले की, ‘लेखकाचे स्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य यावर गदा आणणारा कोणताही कायदा हा सांस्कृतिक गुलामगिरी लादणारा आहे.’ या धारदार विधानानंतर त्यांना पुढे आणीबाणीत अनेक महिने तुरुंगवास भोगावा लागला, पण त्यांनी इंदिरा गांधी सरकारपुढे झुकण्यास स्पष्ट नकार दिला.

कराड येथे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर तिसऱ्या दिवशी समारोपाचे भाषण करताना दुर्गाबाई म्हणाल्या, “कराडला प्रीतिसंगमस्थान आहे. एक छोटी नदी मोठ्या नदीला सामोरी जात आहे. अशा या ठिकाणी आपण एका दुःखाने बांधले गेलेले साहित्यिक जमलो आहोत. सूर्याची जबाबदारी यथाशक्ती पेलण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या त्या पणतीप्रमाणे आपणालाही बनायचे आहे; नव्हे अनेक पणत्यांचा सूर्य बनवायचा आहे! मी स्वतः लेखिका आहे. मी काही राजकारणी नाही. सध्या सगळीकडे प्रक्षोभ माजलेला आहे आणि तो मिटवू शकेल असा एकच माणूस मला दिसतो व तो म्हणजे जयप्रकाश नारायण!” दुर्गाबाईंनी हा शब्द उच्चारताच सगळ्या मंडपातले वातावरण बदलून जाते. हजारो श्रोत्यांच्या अंगात चैतन्याची लहर पसरत जाते.
दुर्गाबाई त्या भाषणात पुढे म्हणाल्या होत्या, “मी तीस सालापासून गांधीजींच्या चळवळीत भाग घेतला. गांधीजींनंतर वंदनीय असा जयप्रकाश यांच्याशिवाय माणूस नाही. त्यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व कुणाला पसंत असेल नसेल, पण माणुसकीचा गहिवर असलेला हा माणूस आहे. ते कुठल्याही अवस्थेत असोत, ते आम्हाला हवे आहेत. कारण देश पेटून भडका उडण्याची शक्यता असताना तो क्षोभ विझवण्याची क्षमता त्यांच्यातच आहे. ते जाणार तेथे प्रकाश येणारच. माणसामाणसांत सध्या काळोखाचे पडदे उभे आहेत ते नाहीसे होऊन सगळ्या राष्ट्राला दिवाळी झालेली दिसावी अशी माझी इच्छा आहे.” यावेळी, आणीबाणी चालू असताना जयप्रकाश नारायण हे कैदेत होते. मात्र, त्यांची प्रकृती सतत बिघडत चालली होती. रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार करावे लागत होते. दुर्गाबाईंच्या आर्त बोलण्यामागे या साऱ्या वेदना होत्या. आपला आवंढा गिळून दुर्गाबाई मंचावर बसलेल्या यशवंतरावांकडे वळून म्हणल्या, “यशवंतराव, या बहिणीची विनंती एवढीच आहे की, या संमेलनाची गोष्ट तुम्ही दिल्लीस जाऊन सांगावी. आता आपण रुग्णशय्येवर असणाऱ्या जयप्रकाश नारायण यांना उत्तम आयुरारोग्य लाभावे, अशी प्रार्थना करूया आणि त्यासाठी एक मिनिट उभे राहूया…” दुर्गाबाईंनी असे म्हणताच पुन्हा मंडपभर सळसळ झाली. आणि केंद्रीय मंत्रिमंडळात असणारे इंदिरा गांधी यांचे सहकारी मंत्री यशवंतराव चव्हाण हेही एक मिनिट शांतपणे उभे राहिले. आणीबाणीची इतकी प्रचंड दहशत तेव्हा होती की दुर्गाबाईंनी जी भाषा वापरली तशी इतर कोणी व्यासपीठावर वापरली नाही. खुद्द दुर्गाबाईंनी आपल्या या सडेतोडपणाची आणि स्वातंत्र्याच्या ऊर्मीची किंमत मोजली. तुरुंगवास भोगला.
पु. ल. आणि कुरुंदकरांचा शांत पण वज्रप्रहार
या लढ्यात केवळ दुर्गाबाईच नव्हत्या, तर महाराष्ट्रातील इतर आघाडीच्या साहित्यिकांनीही आपापल्या परीने या हुकूमशाहीविरुद्ध वज्रप्रहार केला होता. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी आणीबाणीविरुद्ध शांतपणे काम केले. जयप्रकाश नारायण यांच्या डायरीचा त्यांनी अनुवाद केला. तो प्रकाशितही झाला. आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत पुलंनी धारदार भाषणांनी जाहीर सभा गाजवल्या आणि हुकूमशाही राजवटीचा पराभव करण्यात मोठी भूमिका बजावली.
दुसरीकडे, थोर विचारवंत प्रा. नरहर कुरुंदकर यांनी आणीबाणीत वैचारिक लेखणीची धार कमी होऊ दिली नाही. नियतकालिकांमधून त्यांनी उपरोधिक आणि रूपकात्मक शैलीत थेट हुकूमशाहीवर आणि फॅसिझमवर वैचारिक प्रहार केले. ज्या काळात उघड बोलणे शक्य नव्हते, अशा काळात कुरुंदकरांनी व्याख्यानांमधून आणि लेखांमधून लोकशाही मूल्यांचे महत्त्व समाजाच्या मनावर बिंबवले.
‘पुरस्कार वापसी’ गँगचा ढोंगीपणा
काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीचा असा इतिहास असताना आज काही कथित विचारवंत, डावे साहित्यिक आणि पुरस्कार वापसी गँग राजकीय मतलबीपणा करून ‘देशात आणीबाणीसदृश परिस्थिती आहे,’ असा ओरडा करत आहेत. हा या देशाचा आणि दुर्गाबाई, पु. ल. किंवा कुरुंदकर.. अशांचा अपमानच आहे. आज सरकारवर उघड टीका करण्याचे आणि मोर्चे काढण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणीबाणीत तर न्यायालयांचे पंखही कापले गेले होते. आज जे लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बुरखा पांघरून देशाविरुद्ध नॅरेटिव्ह सेट करतात, त्यांनी आणीबाणी लादणाऱ्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्यात आज स्वतःचा राजकीय फायदा शोधला आहे, हा मोठा विरोधाभास आहे.
व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय ?
व्यक्तिस्वातंत्र्य हे घटनेने दिलेले अमूल्य कवच आहे, पण ते देशाच्या सार्वभौमत्वाला नख लावण्यासाठी वापरता येऊ शकत नाही, हे सूत्र आज पुन्हा एकदा ठामपणे मांडण्याची गरज आहे. ‘आणीबाणी’मध्ये तुरुंगवास भोगलेल्या असंख्य वीरांचा तो लढा आपले स्वातंत्र्य कोणत्याही परकीय शक्तींच्या किंवा देशविरोधी तुकडे-तुकडे गँगच्या अजेंड्यासाठी नव्हते. साहित्याचे किंवा विचारांचे व्यासपीठ हे कधीही एका बाजूला सत्तेचे किंवा देशविरोधी शक्तींचे गुलाम असू शकत नाही, हाच धडा आपल्या पूर्वसूरींनी घालून दिला आहे. आणीबाणीचे स्मरण करताना तो विसरता कामा नये.
– सारंग दर्शने