Tuesday, February 10, 2026

कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ऱ्हासबोध

Share

संघ शताब्दी निमित्त सरसंघचालकांच्या ७ व ८ फेब्रुवारीतल्या कार्यक्रमातील एका प्रश्नाच्या उत्तरातील निवडक वाक्यांचा सोयीस्कर अर्थ लावून राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून अनावश्यकरीत्या सरसंघचालकांना ज्ञानामृत पाजण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे त्याची दखल घेण्याचीही गरज नव्हती परंतु आपण संघवाल्यांना निरुत्तर केले या भ्रमात त्यांनी राहू नये म्हणून हा लेख प्रपंच…

सरसंघचालकांनी आपल्या संपूर्ण उत्तरात राज ठाकरे यांचा लाडका व सोयीस्कर असलेला “परप्रांतीय” हा शब्द उच्चारला नसल्यामुळे ते कासावीस झाले असावेत. राज ठाकरे यांच्या व्याख्येतील तिरस्कारयुक्त “परप्रांतीय” संबोधन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी “अन्य प्रांतीय” आप्त हिंदू बांधव आहेत. त्यामुळे परप्रांतीय हे संबोधन संघाच्या स्वयंसेवकांच्या तोंडून निघेल अशी आशा राज ठाकरे यांनी आयुष्यात करू नये.

सरसंघचालकांनी “गुंडागर्दी का बंदोबस्त करने की ताकद समाज में चाहिये” म्हटल्याचा घाव राज ठाकरे यांच्या वर्मी लागत बसलेला दिसतो. हा बंदोबस्त मतदारांनी मतपेटीतून केलेलाच आहे. सरसंघचालकांना बहुदा हेच अपेक्षित असावे.

असो…

विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हजेरीचा दाखला देऊन ती मंडळी सरसंघचालकांच्या प्रेमा खातर नव्हे तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती म्हणून या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे.

त्यातील काही हिंदी चित्रपट सृष्टीतील मराठी बोलता न येणारी मंडळी राज ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. तेव्हा मराठीचा आग्रह धरणारे राज ठाकरे त्यांच्याशी कुठल्या भाषेत बोलतात परमेश्वराला ठाऊक आणि ते सगळे मान्यवर राज ठाकरे यांच्या कार्यक्रमासाठी कोणत्यातरी “अर्थपूर्ण” प्रेमापोटी येतात की किमान मुंबईत तरी आपले चित्रपट सुरळीत चालावेत या भीतीपोटी येतात. हे राज ठाकरे यांना चांगलेच ठाऊक असावे. राज ठाकरे यांना ठाऊक असेल नसेल. जनता मात्र कोणत्याही गैरसमजात नाही हे निश्चित. आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे जर ही मंडळी आली असतील तर राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे निमंत्रण देऊनही काही मंडळी गैरहजर होती तसे धाडस त्यांनी केले नसते आणि दुपारी उशीरा उठणाऱ्या आळशांना सरसंघचालकांचा सकाळचा कार्यक्रम ज्यात फक्त प्रबोधन होते. ना मिमिक्री होती ना नकला होत्या. रटाळ वाटणारच म्हणा…

भाषावार प्रांत रचनेचा इतिहास जगातील निःशेष हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी आपले आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण करणाऱ्या सरसंघचालकांना समजावण्याचा उपद्व्याप “ऊठ दुपारी घे सुपारी” फेम राज ठाकरे यांनी अजिबात करू नये. भारतातील एकूण राज्ये आणि त्यांच्या राजधान्या राज ठाकरे यांनी न अडखळता सांगितल्या तर आम्ही त्यांचा भाषावार प्रांत रचनेवरील अधिकार दिलखुलासपणे मान्य करु.

देशातील चार-पाच राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात हे म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना मुंबईत येणाऱ्या घुसखोर बांगलादेशी मुसलमान आणि रोहिंग्यांच्या झुंडी दिसत नाहीत का? न दिसायला काय झालंय म्हणा… पण त्या बाबतीत मात्र ते सोयीस्कर मौन बाळगतात. तिथेही “अर्थपूर्ण” व्यवहार असतो की पोट भरण्यासाठी मुंबईत आलेल्या गरीब आणि असाह्य “परप्रांतीयां”वर हात उचलण्यात मनसेची आणि जाहीर सभेत एका अन्य प्रांतीय राजकीय नेत्याचा भ*वा म्हणून उल्लेख करण्यात पुरुषार्थ मानणाऱ्या राज ठाकरे यांची. मुसलमानांच्या झुंडीसमोर तोंड उघडण्याची त्यांची हिम्मत होत नाही (थोडक्यात “फाटते”) हे कळायला मात्र मार्ग नाही. कारण ज्या रझा अकादमीच्या दंगली विरोधात मनसेने मोर्चा काढला होता म्हणून राज ठाकरे अभिमानाने सांगत आहेत त्या मोर्चाच्या शेवटी भाषण करताना त्यांनी दंगलखोरांना “परप्रांतीय” ठरवले होते. किमान पक्षी “परप्रांतीय मुसलमान” म्हणण्याची सुद्धा त्यांची बिशाद झाली नव्हती.

भैय्याजी जोशी यांच्या “मराठी आणि गुजराती भाषे”च्या विधानाचा कसा विपर्यास करण्यात आला होता हे आम्ही त्यावेळी स्पष्ट केले होते… ज्या निवडणुकीच्या तोंडावर भैय्याजींनी हे विधान केले होते आणि “मराठी माणसाला दिवसात गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला होता” म्हणून राज ठाकरे सांगताहेत ती निवडणूक होऊन त्याचा निकाल सुद्धा लागला. सर्व भाषिक मुंबईकर मतदारांनी त्या विधानाचा विपर्यास करणाऱ्यांचाच निकाल लावला असेच म्हणावे लागेल. मातृभाषेचा आग्रह आणि दुराग्रह यातला फरक न कळल्याने राज ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याची पुरती वाताहात झाली आहे.

पुढे राज ठाकरे म्हणतात की, “ज्यावेळेस हिंदूवर हल्ला होईल तेव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच!” म्हणजे राज ठाकरे हिंदूंवर हल्ला झाला की हिंदू होणार. त्यापेक्षा हिंदू समाजावर हल्लाच होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असे त्यांनी म्हटले असते तर ते खऱ्या अर्थाने “हिंदू जननायक” झाले असते. त्यांचे हे पार्ट टाइम आणि प्रसंगिक हिंदुत्व ना त्यांच्या पक्षाला उपयोगी पडो न पडो… सकल हिंदू समाजाला मात्र त्याचा काडीचाही उपयोग नाही.

हा देश एक आहे. हे राष्ट्र एक आहे. याची संस्कृती एक आहे. इथला समाज एक आहे आणि त्याचे नाव हिंदू. “हे हिंदू राष्ट्र आहे” या स्थितीकालनिरपेक्ष सनातन सत्यावर नितांत श्रद्धा ठेवून स्थापनेच्या दिवसापासून गेली १०० वर्षे फक्त आणि फक्त हिंदुत्वाचा वसा घेतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना काय सांगू इच्छितात? आपला पुरुषार्थ की आपली अगतिकता?

उत्तर भारतातील कावड यात्रेतील बिभत्सपणावर राज ठाकरे सांगतात. मग महाकुंभच्या त्रिवेणी संगमावरील स्नानाची त्यांनी भर सभेत काखा खाजवून टिंगल उडवली होती. तिथल्या पवित्र गंगाजलाची कुचेष्टा केली होती. दहीहंडीला मी फक्त मटण हंडीचे निमंत्रण स्वीकारतो म्हणून हिंदू भावनांची क्रूर थट्टा केली होती. हा सगळा बिभत्सपणा नव्हता काय?

बीफ एक्सपोर्ट (खरं म्हणजे ते म्हशीचे मांस आहे, गाईचे नाही हे सरकारने अनेक वेळा स्पष्ट केले आहे) आणि गोहत्येच्या राजकारणावरून सरसंघचालकांनी सरकारला खडे बोल सुनवावेत अशी राज ठाकरे यांची अपेक्षा आहे. भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून गोहत्या बंदीसाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि विविध राज्यातील भाजप सरकारे प्रामाणिकपणे करत आहेत आणि सरसंघचालकांनी राज ठाकरे यांना विचारून ते सांगतील त्याला खडे बोल सुनवावेत अशी त्यांची अपेक्षा आहे काय? संपलेल्या पक्षाचे पक्षप्रमुख ऊठसूठ शाखाप्रमुखांना खडेबोल सुनवत असतील, सरसंघचालकांना तसे करता येणे शक्य नाही.

“जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो” हा राज ठाकरे यांचा आपण राजा हरिश्चंद्राचे थेट वंशज असल्याचा अविर्भाव आणत केलेला दावा म्हणजे या शतकातील सर्वात मोठा विनोद ठरावा. गेल्या २५ वर्षात पक्ष स्थापनेपासून राज ठाकरे यांनी इतक्या वेळा आपल्या राजकीय भूमिका बदलल्या आहेत की, त्यांचे कार्यकर्ते मनोरुग्ण होण्याचे बाकी आहेत. अशी एक मार्मिक आणि मजेशीर पोस्ट आम्ही सोशल मीडियावर वाचली होती. “२०१४ साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच हवेत इथपासून २०१९ साली ‘लाव रे तो व्हिडिओ’ ते २०२६ साली महापालिकेसाठी उबाठाशी केलेल्या युतीपर्यंत”च्या राज ठाकरे यांच्या सगळ्या राजकीय कोलांट्या उड्या उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत आणि त्याचा चोख हिशोब मतपेटीतून केलेला देखील आहे.

या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच. असे म्हणताना राज ठाकरे एक गोष्ट सोईस्कररित्या विसरतात. आम्ही हिंदू म्हणून टिकलो तरच आमची “भाषिक आणि प्रांतिक अस्मिता” टिकणार आहे. या ऐतिहासिक सत्याचा त्यांनी विसर पडू देऊ नये. एकेकाळी “जुळी मुंबई” म्हणून ओळखली जाणारी बॉम्बे प्रोव्हिन्सचा हिस्सा असलेली कराची इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मध्ये राहिली आहे. सिंध प्रांतातील आमचा हिंदू सिंधी बांधव धर्माबरोबर आपल्या भाषिक आणि प्रांतिक अस्मिता टिकवण्यासाठी नेसत्या वस्त्रानिशी रावी ओलांडून हिंदू बहुल भारतात आला. भाषावार प्रांत रचनेचा इतिहास तोंडपाठ असणाऱ्या राज ठाकरे यांना हा इतिहास ठाऊक नाही का?

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी भाषिक अस्मितेचे उदाहरण देताना बंगाली भाषेच्या आधारावर निर्माण झालेल्या बांगलादेशचे उदाहरण दिले. १९७१ साली बंगाली भाषेच्या अस्मितेमुळे बांगलादेशी निर्मिती झाली हा त्यांनी सांगितलेला इतिहास अर्धसत्य आहे. १९४७ साली इतिहासात पहिल्यांदा आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे धर्माच्या आधारावर विभाजन झाले तेव्हा हाच बांगलादेश पूर्व इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान म्हणून आमच्यापासून वेगळा झाला होता. हे पूर्ण सत्य मात्र ते दडवून ठेवतात.

अर्थात राज ठाकरे यांच्या बॉम्बे स्कॉटिशमध्ये इंग्रजी माध्यमात शिकलेल्या सुपुत्राने अमित ठाकरे यांनी “मराठी मुसलमान कधीच दंगल करत नाहीत” म्हणून प्रमाणपत्र देऊन टाकलेले आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम कासकर हा मराठी मुसलमान असल्याने ठाकरे कुटुंबीयांच्या व्याख्येप्रमाणे तो कधीच दंगल करू शकत नाही. त्यामुळे आता दाऊदला भारतात परतायला काही हरकत नसावी. सरकारने त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याचे काहीच कारण नाही. दाऊदने मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवायलाही काही हरकत नसावी. जनतेने समर्थन दिले तर मराठी मातृभाषा असलेल्या दाऊद इब्राहिम कासकरला मनसेच्या तिकिटावर निवडून आणून त्याला मुंबईचा महापौर करायला देखील त्यांची हरकत नसावी.

सरसंघचालकांच्या स्फटिकासारख्या निर्मळ विचारधनावर सोशल मीडियावर सपक प्रसिद्धीसाठी विपर्यस्त पोस्ट टाकून राज ठाकरे यांना प्रसिद्धी मिळणार असेल तर त्याला मात्र आमची काहीच हरकत नाही.

कारण, समर्थांनी दासबोधात सांगितलेल्या मूर्खांच्या लक्षणांमधील

कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख॥ 

हे लक्षण चपखल बसणारी ही पोस्ट आहे.

अन्य लेख

संबंधित लेख