भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या विशाल देशाला एका सूत्रात बांधण्याचे काम भारतीय रेल्वे गेल्या अनेक दशकांपासून करत आहे. रेल्वे ही केवळ दळणवळणाचे साधन नसून कोट्यवधी भारतीयांच्या भावना, त्यांच्या आकांक्षा आणि रोजगाराची जीवनवाहिनी आहे. मात्र, बदलत्या काळासोबत या जीवनवाहिनीला आधुनिकतेचा स्पर्श होणे गरजेचे होते. याच पार्श्वभूमीवर, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील ७५ पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण करण्यात आले. यात महाराष्ट्रातील बारामती आणि नांदुरा यांसारख्या स्थानकांचा समावेश आहे. भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांत घेतलेली ही झेप खरोखरच कौतुकास्पद आहे. या परिवर्तनाचे सर्वांत मोठे श्रेय डिसेंबर २०२२ मध्ये सुरू झालेल्या ‘अमृत भारत स्थानक योजनेला’ जाते. या महत्त्वाकांक्षी योजनेने अवघ्या काही वर्षांतच रेल्वे सुविधांचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. प्रवाशांना केवळ एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकावर पोहोचवणे इतकाच मर्यादित हेतू न ठेवता, रेल्वे स्थानकांना आधुनिक सुविधांचे आणि स्थानिक संस्कृतीचे केंद्र बनवण्याचा हा उपक्रम आता झपाट्याने वेग घेतो आहे.
आधुनिकतेची नवी पायाभरणी
अमृत भारत स्थानक योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ मुंबई, दिल्ली किंवा चेन्नईसारख्या महानगरांपुरती मर्यादित नसून, देशातील निमशहरी आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकांपर्यंत पोहोचली आहे. याचे ताजे आणि उत्तम उदाहरण म्हणजे बारामती रेल्वे स्थानकाचा कायापालट. ११.४० कोटी रुपये खर्चून या स्थानकाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास झाला. सन १९१४ पासून सुरू असलेल्या आणि एकेकाळी नॅरोगेज असलेल्या या ऐतिहासिक स्थानकाचे रूप आता पूर्ण बदलले आहे. आधुनिक वास्तुकला, दिव्यांगांसाठी अडथळामुक्त प्रवेशद्वार, प्रशस्त पार्किंग आणि अत्याधुनिक प्रवासी विश्रामगृहे यामुळे या स्थानकाला भव्य रूप आले आहे. बारामती हे केवळ एक कृषी आणि औद्योगिक केंद्र नाही, तर कृषी पर्यटन आणि धार्मिक स्थळांचे प्रवेशद्वार आहे. नव्या स्थानकामुळे या संपूर्ण परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी गती मिळेल. हेच कमी-अधिक प्रमाणात इतरही अमृत स्थानकांबाबत खरे आहे.
वारसा आणि आधुनिकतेचा मेळ
या योजनेचे मुख्य सूत्र ‘विरासत भी, विकास भी’ (वारसाही आणि विकासही) हे आहे. भारतातील रेल्वे स्थानके या केवळ सिमेंट-काँक्रीटच्या इमारती बनणार नाहीत, तर ती त्या त्या भागातल्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवतील, ही दूरदृष्टी यामागे आहे. बारामती स्थानकाच्या पुनर्विकासातही स्थानिक पर्यटनाला महत्त्व देण्यात आले. भिगवण पक्षी अभयारण्य आणि श्री सिद्धेश्वर मंदिरासारख्या वैशिष्ट्यांना वास्तुकलेतून अधोरेखित करण्यात आले. या स्थानकांचे दृश्यरूप आता विमानतळासारखा भव्य आणि आधुनिक आहे. प्रशस्त आणि दुहेरी उंचीचे एअर कॉनकोर्स, आधुनिक तिकिट खिडक्या, रोषणाईसाठी एलईडी लाइट्स आणि डिजिटल डिस्प्ले बोर्ड्समुळे स्थानकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे रूप मिळाले. आधुनिकतेच्या शर्यतीत ऐतिहासिक वारसा जपण्याचा हा एक यशस्वी प्रयोग आहे.

स्वच्छता, शुद्ध पाणी आणि इतर सोयी
रेल्वे प्रवासात प्रवाशांना भेडसावणारी सर्वांत मोठी समस्या म्हणजे स्वच्छता आणि पिण्याचे पाणी. अमृत भारत स्टेशन योजनेने या दोन मूलभूत बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक पुनर्विकसित स्थानकावर २४ तास स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आधुनिक वॉटर बूथ उभारले आहेत. स्वच्छता राखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि नियमित स्वच्छता वेळापत्रक (क्लीनिंग शेड्युल) लागू केले आहे. टॉयलेट ब्लॉक्स हे अत्याधुनिक, हायड्रॉलिक फ्लश सिस्टमयुक्त आणि स्वच्छ ठेवले जात आहेत. स्टेशनच्या आवारात कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रियेसाठी हरित तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. दुर्गंधीची समस्या यामुळे कायमची मिटली.
दिव्यांगांसाठी सुलभता, लिफ्ट्स आणि सरकते जिने
आधुनिक सुविधा देताना समाजातील सर्व घटकांचा, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचा विचार करणे आवश्यक असते. जुन्या रेल्वे स्थानकांवर एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पायऱ्या चढणे क्लेशदायक असायचे. अमृत भारत योजनेत आता प्रत्येक स्थानकावर लिफ्ट्स आणि सरकते जिने अनिवार्य आहेत. नुकत्याच लोकार्पण झालेल्या स्थानकांवर मोठ्या क्षमतेच्या लिफ्ट्स बसवल्या आहेत. यामुळे, वृद्ध आणि रुग्णांना विनासायास प्रवास करता येत आहे. यासोबतच, दिव्यांगांसाठी विशेष रॅम्प, ब्रेल लिपीतील साईन बोर्ड, टॅक्टाईल पाथवे (स्पर्शज्ञान देणारे मार्ग) आणि स्वतंत्र प्रसाधनांची सोय आहे. यामुळे भारतीय रेल्वे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनत आहे.
वाढलेली आर्थिक तरतूद
अमूर्त संकल्पनांना वास्तवात आणताना भारतीय रेल्वेने बजेट आणि अंमलबजावणी या दोन्ही आघाड्यांवर मोठी झेप घेतली आहे. रेल्वेच्या विकासासाठीचे बजेट २०१४-१५ मधील ३२,३०० कोटी रुपयांवरून तब्बल ८ पटीने वाढवून २०२५-२६ या आर्थिक वर्षात २,५२,२०० कोटी रुपये करण्यात आले आहे. या अफाट आर्थिक तरतुदीमुळेच देशभरातील १,३३० हून अधिक स्थानकांच्या पुनर्विकासाचे उद्दिष्ट वेगाने साध्य होत आहे. मार्च २०२६ पर्यंत १८० स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, २०२६ च्या अखेरपर्यंत ४०० हून अधिक स्थानकांचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट आहे. या वेगावरून हे स्पष्ट होते की, सरकारी यंत्रणा आता वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या कार्यसंस्कृतीकडे वळली आहे.
भविष्यातील भारताचे चित्र
आजची रेल्वे स्थानके ही केवळ ट्रेन पकडण्याची जागा नाही, तर ती शहराचे मध्यवर्ती आर्थिक केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण स्थानक परिसर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आला आहे. स्थानकांवर हाय-स्पीड मोफत वाय-फाय, एक्झिक्युटिव्ह लाउंज आणि महिला प्रवाशांसाठी विशेष प्रतीक्षाकक्ष आहेत. याशिवाय, स्टेशनच्या दोन्ही बाजूंनी शहराला जोडणारे प्रशस्त उड्डाणपूल (FOBs) आणि मल्टिमोडल कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडताच बस, मेट्रो किंवा टॅक्सीची थेट जोडणी मिळत आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने घेतलेली ही झेप केवळ इमारतींचे आधुनिकीकरण नाही, तर समाजाचे जीवनमान उंचावणारे पाऊल आहे. पायाभूत सुविधांचा हा नवा चेहरा भारताला जगाच्या नकाशावर एक आधुनिक आणि प्रगत राष्ट्र म्हणून अधोरेखित करेल, यात शंका नाही!