
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात ल्यारी गँगवॉरवरील “धुरंधर” चित्रपटाने लावलेली आग विझायचे नाव घेत नाहीये. तिथे धुरंधरवरून रोज काही ना काहीतरी कथा दंतकथा सांगितल्या जात आहेत. आता संजय दत्तने केलेल्या पोलिस अधिकारी अस्लम चौधरीच्या भूमिकेवरून संजय दत्तचे वडिल सुनील दत्त यांच्या ल्यारी भेटीला तिथे उजाळा दिला जात आहे. अस्लम चौधरी ल्यारीच्या गँगस्टर्सचा कर्दनकाळ.

अस्लम चौधरी हा ल्यारी टास्क फोर्स (LTF)चा प्रमुख पोलिस अधिकारी. पोलिस खात्यात असूनही कायम पांढरा शुभ्र कुड़ता पायजमा घालणारा. आयुष्यात बुलेट प्रूफ जॅकेट न घातलेला. डाव्या हातात शिलगवेली सिगारेट आणि उजव्या हातात लोडेड रिव्हॉलव्हर आणि कारवाईच्या वेळी सगळ्यात पुढे असणाऱ्या अस्लम चौधरीच्या नुसत्या नावानेच कराचीतील गँगस्टर्सच्या पँटस् ओल्या व्हायच्या. त्याने एकूण १०० पेक्षा जास्त एनकाऊंटर्स केली होती.
अस्लम चौधरीच्या हातात सापडण्यापेक्षा त्याने गोळी घातली तर आपण सुटू अशी गँगस्टर्स प्रार्थना करत हातात सापडलो तर अस्लम चौधरी जहन्नुमपेक्षा भयंकर यातना देणार हे ठरलेले असायचे. त्याच्या कस्टडीतल्या नरक यातनांपुढे आपल्याकडच्या गरुड पुराणातील शिक्षा देखील फिक्या पडाव्यात अशा असत. शिवाय कस्टडीत असताना देखील अस्लम चौधरी कधी एन्काऊंटर करेल त्याचा नेम नसे. मात्र आजही काही कराचीकरांसाठी तो “फरिश्ता” तर काही कराचीकरांसाठी “शैतान” मानला जातो. काय असेल ते असेल… खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या पठाण खानदानात जन्मलेल्या अस्लम चौधरीचा कराची पोलिस खात्यात रुबाब, रुतबा आणि दबदबा काही औरच होता.
संजय दत्त… पडद्यावरचा हुबेहूब अस्लम चौधरी.

धुरंदरमध्ये अस्लम चौधरीचे पात्र संजय दत्तने रंगवले आहे. त्याची एकूण शारीरिक ठेवण, चेहरेपट्टी आणि मेकअप यामुळे संजय दत्तच्या या भूमिकेचे खूप कौतुक होत आहे. अस्लम चौधरीची विधवा पत्नी नौरीन अस्लम हिने चित्रपटाच्या कथेत रंगवलेल्या आपल्या पतीच्या पात्राच्या कथानकाबद्दल काही आक्षेप नोंदवले असले तरी संजय दत्तच्या अभिनयावर मात्र ती बेहद खुश आहे. जर अस्लम चौधरीची विधवा पत्नीच संजय दत्तला प्रशस्तीपत्र देत असेल. तर बाकीच्यांनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी..? मात्र या निमित्ताने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या प्रेक्षकांना संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त यांची प्रकर्षाने आठवण होत आहे. निमित्त आहे बेनझीर भुट्टो आणि आसिफ अली जरदारी यांच्या निकाहाच्या सोहळ्याचे.

१८ डिसेंबर १९८७ रोजी बेनझीर भुट्टो आणि आसिफ अली जरदारी यांचा निकाह सोहळा कराचीच्या उच्चभ्रू अशा क्लिफ्टन पॅलेस गार्डन इथे पार पडला. आणि त्यानंतर या निकालाचा वलीमा (Reception) कराची ती ल्यारीच्या ककरी मैदानावर पार पडला. अक्षरशः लाखो लोकांनी या वलीम्याला हजेरी लावली होती. त्यावेळी ल्यारी हा बेनझीर भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपलस् पार्टी (PPP) चा गड मानला जात होता. पुढच्या काळात स्वतः बेनझीर व त्यांचे पती आसिफ अली जरदारी याच ल्यारी मतदारसंघातून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीमध्ये निवडून गेले होते. ककरी मैदानावर पार पडलेल्या बेनझीर भुट्टो यांच्या विवाहाच्या वलीम्याला सुनील दत्त यांना निमंत्रण होते. कारण सुनील दत्त आणि भुट्टो परिवाराचे काही दशकांपासून खूप जवळचे संबंध होते असे सांगितले जाते.

एक तर सुनील दत्त हे भारतीय चित्रपट सृष्टीतील (बॉलीवूड) लोकप्रिय अभिनेते होते. शिवाय त्यावेळी ते केंद्रातील सत्तारूढ काँग्रेस पक्षाचे खासदार देखील होते. त्यामुळे मिळालेल्या निमंत्रणानुसार ल्यारीतल्या या वलीमा सोहळ्याला ते जातीने उपस्थित होते. पण याच्या पलीकडे देखील सुनील दत्त यांना इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानशी जोडणारा एक दुवा होता.

तो म्हणजे ६ जून १९२९ रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्याच्या खुर्द या गावी बलराज दत्त अर्थात सुनील दत्त यांचा जन्म झाला होता. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण खुर्द या गावीच झाले. आणि १४ ऑगस्ट १९४७ रोजी इतिहासात पहिल्यांदा धर्माच्या आधारावर आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन झाले आणि सुनील दत्त नेसत्या वस्त्रानिशी रावी पार हिंदू बहुल भारतात आले. त्यावेळी आपल्या वडिलांचे मित्र याकूब यांनी आपल्याला भारतात सुरक्षित पोहोचण्यासाठी खूप मदत केली असे ते कृतज्ञतेने सांगतात. आज सुनील दत्त यांचे हे खुर्द गाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये आहे.
देशाच्या विभाजनाचा भुक्तभोगी असलेला हा तरुण पुढे भारतीय चित्रपट सृष्टीत नावारूपाला आला धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन स्वीकारणाऱ्या सत्तारूढ काँग्रेसचा खासदार बनला अगदी केंद्रीय मंत्री देखील झाला. बेनझीर भुट्टो यांच्या वलिमा सोहळ्या निमित्त ते इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला गेले. त्यावेळी तिथून ते आपल्या जन्मगावी खुर्द येथे गेले सुनील दत्त या भेटीने भारावून गेले होते.

२००५ मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत सुनील दत्त यांनी सांगितले होते की, त्यांच्या भेटीच्या दरम्यान तिथे टेलिव्हिजन चॅनेलस् उपस्थित होती. गावकऱ्यांना विचारण्यात आले की, ते मला इतके प्रेम का देत आहेत? तेव्हा गावकऱ्यांनी उत्तर दिले “हा आदर सुनील दत्त यांच्यामुळे नाही तर त्यांच्या पूर्वजांमुळे आहे. ते इथे राहत होते आणि आम्हाला खूप आदर देत होते. ते चांगले लोक होते आणि आमच्या धर्माचा आदर करत होते. ते जमीनदार होते. आमच्या गावाच्या बाहेर एक दर्गा आहे. जेव्हा ते (सुनील दत्तचे पूर्वज) दर्ग्याजवळ येत असत तेव्हा ते त्यांच्या घोड्यांवरून उतरत असत आणि दर्ग्याजवळून जाईपर्यंत पायी चालत जात असत आणि नंतर त्यांच्या घोड्यांवर परत स्वार होत असत. त्यांनी आम्हाला इतका आदर दिला. आम्ही त्यांचा आदर का करणार नाही?”
पण सुनील दत्त यांना चुकूनही असा प्रश्न पडला नाही की माझे पूर्वज जर इतके चांगले होते तुम्हाला आणि तुमच्या धर्माला सन्मानाची वागणूक देत होते आणि आज तुम्ही माझे इतक्या उत्साहाने स्वागत करत आहात. “तर मग आम्हाला आमची मायभूमी सोडायला का भाग पाडलेत?” बाकी अपरिचित गावकऱ्यांना नाही परंतु आपले कौटुंबिक मित्र असलेल्या (हयात असते तर) याकूब भाईंना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना तरी सुनील दत्त हा प्रश्न निश्चित विचारू शकले असते.
पण आत्मविस्मृतीने पछाडलेल्या काँग्रेसच्या मानसिक गुलामगिरीमुळे “स्व”ची किंचितही जाणीव नसलेल्या “शत्रुबोधा”चा लवलेश नसलेल्या आणि मुस्लिम लांगुलचालनाच्या काँग्रेसी डीएनएमुळे खुदा स्वरूप याकूब भाईमुळे आपण हिंदू बहुल भारतात सुखरूप पोहोचलो. यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मांनणाऱ्या आणि “या देशातील संसाधनांवर अल्पसंख्याकांचा अर्थात मुस्लिमांचा पहिला हक्क आहे” असे मानणाऱ्या काँग्रेसच्या मांदियाळीतील सुनील दत्त यांना आपल्या वडिलोपार्जित शेतीवाडीचा, जमीनजुमल्याचा कब्जा आज आपल्याला सन्मान देणाऱ्या पिढ्यान पिढ्या शेजारी राहणाऱ्या मुसलमानांकडेच किंवा कोणा मोहाजीरांकडे आहे हे पाहून विषण्णता देखील वाटली नाही. त्यांच्या घराचा ताबा मात्र याकूब साहेब नावाच्या अंबाल्याहून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये आलेल्या एका मोहाजीराला देण्यात आला होता. उलट याकूब भाई तारणहार तर आपल्याला रावीपार पळवून लावणारे शेजारीपाजारी मुसलमान “अपनेवाले” वाटले.
आता आपल्याकडे भरपूर पैसा आहे. तुमच्या प्रेमाने भारावून जाऊन आपण पुन्हा या खुर्द गावी परतण्याचा विचार करत आहोत. असा एक खडा टाकून बघायला सुनील दत्त यांना हरकत नव्हती. खुर्दवासीयांच्या त्या अलोट प्रेमाच्या आदराच्या खऱ्याखोट्याची प्रचिती त्यांना तिथेच आली असती. त्याच वेळी आपल्या खुर्द गावातील रावीपार पळवून लावलेल्या अन्य शेजारी हिंदू बांधवांची साधी चौकशी देखील त्यांनी केली नाही.
सुनील दत्त हे एका आत्मविस्मृत, स्व आणि शत्रुबोध नसलेल्या खोट्या सर्वधर्मसमभावाच्या आहारी गेलेल्या आदर्श हिंदूचे प्रतीक आहे.
मात्र इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या प्रेक्षकांना PPPच्या सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या निकाहाच्या वलीम्याला ल्यारीत येऊन गेलेल्या सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त याची त्याच ल्यारीच्या खतरनाक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी निवड व्हावी हा योगायोग वाटत नाही तर एक सुनियोजित चाल वाटते. असो… कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना…