महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर विचारांची लढाई नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. परंतु, अलीकडच्या काळात या लढाईचे स्वरूप बदलून ते वैयक्तिक द्वेष, अर्वाच्य भाषा आणि थेट शारीरिक हिंसेपर्यंत पोहोचले आहे. पुणे येथे पुढारी वृत्तसंस्थेच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्यात झालेला संघर्ष ही केवळ दोन व्यक्तींमधील हाणामारी नसून ती प्रामुख्याने महाराष्ट्राच्या ढासळत्या राजकीय संस्कृतीचे, खास करून प्रसारमाध्यमांच्या बेजबाबदारपणाचे जिवंत उदाहरण आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली ही घटना एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रातून सुरू झाली. राजकीय विषयावर सुरू असलेल्या चर्चेत हनुमंत पवार यांनी मांडलेले मुद्दे आणि त्यानंतर तुषार दामगुडे यांच्याशी झालेला वाद हा अखेर रस्त्यावरील मारहाणीत रूपांतरित झाला. या घटनेचे गांभीर्य केवळ मारहाणीपुरते मर्यादित नाही, तर त्यामागे असलेल्या कारणांची साखळी समजून घेणे आवश्यक आहे.
या संपूर्ण वादाचा सर्वात दुर्दैवी आणि संतापजनक पैलू म्हणजे हनुमंत पवार यांनी चर्चेदरम्यान तुषार धायगुडे यांच्या कुटुंबियांवर केलेली अभद्र टिप्पणी होय. हनुमंत पवार हे स्वतःला अभ्यासू आणि विचारवंत मानतात, मात्र या चर्चेत त्यांनी आपल्या तथाकथित वैचारिक प्रगल्भतेला हरताळ फासत धायगुडे यांच्या आई-वडिलांबद्दल अत्यंत निकृष्ट, अर्वाच्य आणि अनैतिक भाषेचा वापर केला. भारतीय समाजात आई-वडिलांना सर्वोच्च आणि पवित्र स्थान दिले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती सार्वजनिक व्यासपीठावर एखाद्याच्या पालकांचा असा घृणास्पद अपमान करते, तेव्हा तो केवळ शाब्दिक वाद राहत नाही, तर तो समोरच्या व्यक्तीच्या आत्मसन्मानावर केलेला थेट हल्ला ठरतो.
मानवी स्वभावानुसार, एखादी व्यक्ती स्वतःवर झालेली टीका किंवा राजकीय आरोप सहन करू शकते, परंतु जेव्हा विषय त्या व्यक्तीच्या जन्मदात्यांवर जातो, तेव्हा तिचा संयम सुटणे ही एक अत्यंत नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. हनुमंत पवार यांनी वापरलेली भाषा ही कोणत्याही सुसंस्कृत माणसाला हिंसेसाठी प्रवृत्त करणारी होती. जर तुमच्या आई-वडिलांबद्दल कोणीही अशा प्रकारे घाणेरड्या भाषेत बोलत असेल, तर त्या क्षणी विवेकापेक्षा भावना वरचढ ठरतात. कायद्याने हात हातात घेणे जरी समर्थनीय नसले, तरी धायगुडे यांचा तो क्षणिक संताप आणि झालेली प्रतिक्रिया ही मानवी दृष्टिकोनातून समजून घेण्यासारखी वाटते. अशा प्रकारे आई-वडिलांवरून शिवीगाळ करणे हे कोणत्याही ‘बौद्धिक’ माणसाला शोभा देणारे कृत्य नाही. विवेकी माणसालासुद्धा या शिवीगाळीचा राग आला असता. दामगुडे स्वत:ला `मावळातला मावळा’ समजतात. अशा माणूस क्रोधित न झाला तरच नवल.
या वादात टीव्ही ९ मराठीचे सूत्रसंचालक विलास बढे यांची भूमिका अत्यंत बेजबाबदार आणि टीकेला पात्र ठरली आहे. एका चर्चासत्राचे नियंत्रण करणे आणि वक्त्यांना भाषेच्या मर्यादेची जाणीव करून देणे ही सूत्रसंचालकाची नैतिक जबाबदारी असते. जेव्हा हनुमंत पवार सातत्याने तुषार धायगुडे यांचा अपमान करत होते, तेव्हा विलास बढे यांनी मौन पाळून त्या अभद्र भाषेला एक प्रकारे मूक संमतीच दिली. बढे यांची हिंदुत्वाबाबतची भूमिका कायमच पक्षपाती असल्याचे दिसून आली आहे. प्रसारमाध्यमांनी टीआरपीच्या शर्यतीत इतके आंधळे होऊ नये की, तिथे बसलेल्या पाहुण्यांच्या कुटुंबियांचा अपमान होताना ते केवळ प्रेक्षक बनून राहतील. विलास बढे यांनी जर वेळीच हस्तक्षेप करून पवारांना रोखले असते किंवा त्यांना चर्चेतून बाहेर काढले असते, तर हा प्रकार टाळता आला असता. अशा प्रकारची भाषा ‘टोलरेट’ करणे हे पत्रकारितेच्या मूल्यांना हरताळ फासणारे आहे.
घटनेनंतर सोशल मीडियावर हनुमंत पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची कृत्रिम लाट दिसून आली. अनेकांनी त्यांना ‘बुद्धिजीवी’ ठरवत त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र, ही सहानुभूती दर्शवताना पवारांनी वापरलेल्या भाषेबद्दल सोयीस्कर मौन पाळले जात आहे. केवळ एखादी व्यक्ती चॅनेलवर बोलते म्हणून तिने इतरांचा अपमान करण्याचा परवाना मिळवला नाही. धायगुडे यांनी कायदा हातात घेतला का? यापेक्षा त्यांना झालेली ‘शाब्दिक जखम’ अधिक गंभीर आहे. सोशल मीडियावरील पवार समर्थकांनी हे समजून घेतले पाहिजे की, विचारांची धार ही शब्दांत असावी, शिवीगाळीत नाही. हनुमंत पवार यांच्या कथित बौद्धिकतेचा मुखवटा त्यांच्या याच भाषेमुळे गळून पडला आहे.
स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी केवळ सीसीटीव्ही फुटेज आणि मारहाणीचा तपास न करता, त्या प्रक्षोभक वक्तव्याचा आणि कौटुंबिक अपमानाचाही गांभीर्याने विचार करावा, ज्यामुळे ही हिंसा घडली. राजकीय संघर्षात कुटुंबाला ओढणे ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती आणि नाही. हा संघर्ष महाराष्ट्रातील राजकीय प्रवक्त्यांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी एक धोक्याची घंटा आहे. भाषेची मर्यादा ओलांडून कोणाच्याही आई-वडिलांचा अपमान करणे हे लोकशाहीत बसत नाही. हनुमंत पवार यांची ती ‘अभद्र टिप्पणी’ या संघर्षाचे मूळ कारण आहे आणि जोपर्यंत आपण अशा भाषेचा तीव्र निषेध करत नाही, तोपर्यंत समाजात अशा हिंसक प्रतिक्रिया उमटतच राहतील. विचारांची लढाई ही शब्दांच्या सभ्यतेनेच जिंकली पाहिजे, अर्वाच्य शिवीगाळीतून नाही.
हनुमंत पवार हे जणू काही मराठी सारस्वताला पडलेले सुरेल स्वप्न असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. शिवीगाळ केल्यानंतर स्वत: पवार संभावितासारखे वावरत आहेत. हे सारेच दांभिक आहे. संपकाळ यांच्या कंपूत असणे, याशिवाय त्यांचे कर्तुत्व काय आहे? मुळात संपकाळ यांना पक्षात तरी कितीजण ओळखतात? केवळ हिंदुत्वविरोधामुळे अनावश्यक माणसे आणि त्यांच्या कृतीला पाठिंबा देणे वैचारिक दारिद्रयाचे लक्षण आहे.
– अनिकेत जगदाळे