नवी मुंबई (खारघर) : नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात अखिल भारतीय धर्मजागरण मंचाचे प्रमुख शरदराव ढोले यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या व्यापक जनजागरण मोहिमेची माहिती दिली.
आध्यात्मिक नात्याचा वारसा
आपल्या भाषणात शरदराव ढोले यांनी संत नामदेव महाराजांचा विशेष उल्लेख केला. संत नामदेव यांनी पंजाब आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना आध्यात्मिक धाग्याने कसे जोडले, याचे महत्त्व त्यांनी विषद केले. हा सोहळा केवळ एका समाजाचा नसून वारकरी, सिंधी, मोहियाल आणि गुरु नानक साहेबांना मानणाऱ्या सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
नियोजनाचा महाप्रवास
कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या परिश्रमांचा पाढा त्यांनी वाचला.
रथयात्रा : महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ९६ रथांच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात संदेश पोहोचवण्यात आला.
जनजागरण : सुमारे २०,००० गावांमध्ये या रथांच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शौर्याचा जागर करण्यात आला.
स्वयंसेवक : ५०० हून अधिक पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा भव्य कार्यक्रम यशस्वी केला.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, राज्यस्तरीय समनव्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह आदी उपस्थित होते. शीख धर्मातील विविध संप्रदायांचे संत उपस्थित होते.