इंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर पोलिसांनी गोवंश तस्करीविरुद्ध मोठी कारवाई केली असून, कत्तलीच्या उद्देशाने अमानुषपणे नेल्या जाणाऱ्या ३ जर्सी गायी आणि २६ वासरांची सुटका केली आहे. मात्र, या प्रवासात ताडपत्रीखाली हवा न मिळाल्याने ३ कोवळ्या वासरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (१६ मार्च) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास इंदापूर बाह्यवळण महामार्गावर सुरज अविनाश गोसावी आणि त्यांचे मित्र उभे होते. यावेळी एक बोलेरो पिकअप (क्र. MH 12 SF 5028) वेगाने जात असताना त्यातून गोमूत्रासारखे पाणी पडताना दिसले आणि आतून लहान गुरांचा ओरडण्याचा आवाज आला. संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून इंदापूर उड्डाणपुलाजवळ वाहन अडवले.
अमानुष छळ आणि कारवाई
वाहनाची ताडपत्री उघडून पाहिले असता, आत ३ गायी आणि २९ वासरे पाय व तोंड बांधून अत्यंत निर्दयीपणे कोंबलेली आढळली. त्यांच्यासाठी चारा किंवा पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्दैवाने, यामध्ये अवघ्या दोन महिन्यांची तीन वासरे मृत अवस्थेत आढळली.
पोलिसांनी ३ जर्सी गायी, २६ जिवंत वासरे आणि बोलेरो पिकअप असा एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चालक कमलेश साहेबराव दामोदर (वय २७, रा. देवळाली, ता. करमाळा) आणि आबुजर शहाजादा कुरेशी (रा. मौलालीचा माळ, करमाळा) यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका केलेल्या गोवंशाची रवानगी पुढील पालनपोषणासाठी गोशाळेत करण्यात आली आहे.