पुण्यातील लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून केतन अग्रवाल या तरुणाला त्याचीच वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी ढकलून ठार मारल्याची घटना म्हणजे केवळ एक गुन्हेगारी कृत्य नाही. हा आजच्या तरुण पिढीच्या मानसिकतेत आणि आपल्या सामाजिक जडणघडणीत कुठेतरी गंभीर बिघाड झाल्याचा चिंताजनक आणि भीषण धोक्याचा इशारा आहे. या मुलीचे वय अवघे वीस वर्षे! ज्या वयात डोळ्यांत भविष्याची सुंदर स्वप्ने असायला हवीत, करिअर, शिक्षण आणि जग समजून घेण्याची ऊर्मी असायला हवी, त्या वयात एका तरुणीच्या डोक्यात इतका टोकाचा द्वेष, क्रौर्य आणि हत्येचा कट शिजतोच कसा, हा या घटनेने निर्माण केलेला प्रश्न कमालीचा अस्वस्थ करणारा आहे. आपल्या सुखाच्या आड येणाऱ्या कुणालाही दगाबाजी करून क्रूरपणे संपवून टाकायला हवे; इथवरचा मानसिक प्रवास एका दिवसात होत नाही. लहानपणापासून प्रत्येक गोष्ट मनासारखी होत असल्याने मानसिकता तशीच होत जाते. नात्यांमधील घसरती विश्वासार्हता, अर्थपूर्ण संवादाचा अभाव आणि कोणत्याही थराला जाऊन स्वार्थ साधण्याची ही ‘इन्स्टंट’ मानसिकता आज समाजाला कुठे घेऊन चालली आहे, याचा वरवरचा विचार करून चालणार नाही. या विकृतीच्या मुळाशी जावे लागेल.
नात्यांचे बाजारीकरण आणि संवादाची कोंडी
सिया आणि चेतन यांनी केतनला मारून टाकणे हा गुन्हा एकाएकी किंवा तात्कालिक रागाच्या भरात घडलेला नाही. एका बाजूला लग्नाची बोलणी, वाङ्निश्चय (साखरपुडा) आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच भावी पतीला संपवण्याचा थंड डोक्याने रचलेला कट, यातून या तरुणीचे दुभंग व्यक्तित्व आणि तिच्या मनातले भयंकर क्रौर्य दिसून येते. आज तरुण पिढीत नात्यांबद्दलची बांधिलकी वेगाने कमी होते आहे. लग्न किंवा विवाहसंस्थेकडे केवळ एक तडजोड, व्यावहारिक करार म्हणून पाहिले जाते. अनेक घरांमध्ये मुलांवर किंवा मुलींवर कौटुंबिक दबाव आणला जातो. ही मुलगी केवळ वीस वर्षांची होती. तिच्या लग्नाची इतकी घाई का करता, या प्रश्नाला समर्पक उत्तर या मुलीच्या पालकांनी दिलेले दिसत नाही. याचा अर्थ, आपल्या मुलीने तिच्या मनासारखे काही न करता आपल्याच मनासारखे करावे, हा आग्रह प्रत्यक्षात येण्यासाठी हे लग्न घाईने ठरविलेले असू शकते. यातून हा सारा अनर्थ घडला आहे. यात अपमृत्यू झालेल्या केतनविषयी मनात अपार करुणाभाव दाटून येतो. बिचाऱ्याची काहीही चूक नव्हती. एकदा लोहगडावरच ढकलून देऊन त्याच्या हत्येचा प्रयत्न होऊनही त्याच्या मनात या नात्याविषयी शंका कशी निर्माण झाली नाही, याचेही नवल वाटते. मात्र, त्याने आपल्या पालकांकडे काही शंका व्यक्त केल्या होत्या. त्या शंकांचे निरसन होईपर्यंत हा विवाह स्थगित ठेवायला हवा होता. तसे केले असते तर केतनचे प्राण वाचले असते. पालकांनीही मुलांच्या भावना समजावून घेतल्या पाहिजेत, हा यातला धडा आहे.
कुटुंबातील संवादाची कोंडी
सिया या चेटकिणीला केतनसोबत लग्नच करायचे नव्हते, किंवा तिच्या आयुष्यात आधीपासूनच कोणी अन्य कोणी होते, तर तिने ते आपल्या पालकांना स्पष्ट शब्दांत का सांगितले नाही? इथेच आपल्या कुटुंबसंस्थेत निर्माण झालेली ‘संवादाची कोंडी’ समोर येते. मुलगे किंवा मुली आपल्या मनातील भावना, प्रेम किंवा नकार पालकांसमोर उघडपणे का मांडू शकत नाहीत? तसे न करणे हे शेवटी किती किंमत मोजायला लावते, हे या शोकांतिकेतून समोर आले आहे. समाज काय म्हणेल, घराण्याची अब्रू जाईल, किंवा पालकांचा रोष ओढवून घ्यावा लागेल, या भीतीने अनेक तरुण-तरुणी विवाहांना होकार तर देतात; पण आतल्या आत धुमसत राहतात. तसेच इथे झालेले दिसते. अशा परिस्थितीत सज्ञान झालेल्या मुला-मुलींनी आपला निर्णय तडीस नेण्याचे धैर्य व पराक्रम दाखविला पाहिजे. सिया किंवा तिचा मित्र हे गुन्हेगार आहेतच; पण या गुन्ह्यामुळे त्यांचेही आयुष्य आता उद्ध्वस्त झाल्यात जमा आहे. आज ना उद्या या खटल्याचा निकाल लागून त्यांना नक्कीच किमान जन्मठेपेची शिक्षा होईल. मग आपण शेवटी काय मिळवले, हा प्रश्न या दोघांनाही पडेलच. एखाद्या नात्यासाठी येणारा घरगुती दबाव किंवा आपले सध्याचे नाते संपण्याची भीती हे समजू शकते. मात्र, आपल्यावर शंभर टक्के विश्वास टाकणाऱ्या, एका निष्पाप व्यक्तीचा थेट जीवच घेण्याइतके क्रौर्य येते कुठून? एका बाजूला आईवडिलांनी ठरविलेल्या नात्याला नकार देण्याचे साधे धाडस अंगी नाही आणि दुसरीकडे मात्र एका निष्पाप जिवाचा बळी घेणे आणि स्वतःचेही आयुष्य कायमचे अंधारात लोटणे, यात कुठला शहाणपणा आहे?
‘जेन झी’ची उतावीळ आणि निर्दयी मने
या भयंकर आणि थंड डोक्याने केलेल्या कारस्थान व हत्येच्या निमित्ताने आजच्या ‘जेन झी’ म्हणजेच डिजिटल युगात जन्माला आलेल्या व वाढलेल्या पिढीच्या मानसिकतेचा गंभीर ऊहापोह करणे गरजेचे आहे. ही पिढी कमालीची उतावीळ, आक्रमक आणि काही अंशी निर्दयी का होत चालली आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. इंटरनेट, हाय-स्पीड डेटा आणि सोशल मीडियाच्या जगात वाढलेल्या या पिढीला प्रत्येक गोष्ट ‘इन्स्टंट’ म्हणजेच एका क्लिकवर हवी असते. मग ते खाद्यपदार्थ असोत, मनोरंजन असो की यश! दुर्दैवाने, हीच ‘इन्स्टंट’ मानसिकता आता नाती टिकवण्यात किंवा नात्यांमधील अडचणी सोडवण्यात डोकावते आहे. प्रत्यक्ष आयुष्यातील गुंतागुंत सोडवण्यासाठी कमालीचा संयम, वेळ आणि समजूतदारपणा लागतो. या साऱ्याचाच या पिढीत अभाव दिसतो. एखादी समस्या संवादाने सुटत नसेल, तर त्यासाठी जबाबदार वाटणारी व्यक्तीच थेट ‘डिलीट’ करून टाकण्याची घातक आणि अमानुष प्रवृत्ती तरुणांमध्ये बळावत चालली आहे. सतत आभासी जगात वावरल्यामुळे या पिढीमधील ‘सहानुभूती’ संपत चालली आहे का? आपल्यासारख्याच समोरील माणसालाही भावना आहेत, त्यालाही वेदना होतात, याचे भानच जणू ही पिढी विसरत आहे. स्वतःचा अहंकार दुखावला तर किंवा स्वतःचे सुख, आनंद दुरावला तर संवाद, सामोपचार, वयाने मोठ्या असणाऱ्या मित्र किंवा नातलगांची मदत असे काही मार्ग असतात, याचे भानच समाजातून हरपत चालले आहे. यातूनच एक प्रकारची हिंस्र उतावीळ आणि बेछूट क्रूरता जन्माला येते आहे.
आभासी जग, वेब सिरीज आणि संवेदनांचे वाळवंट
आजची विशीतील पिढी ही पूर्णपणे स्क्रीनोपजीवी बनली आहे. सोशल मीडियावरील रील्स, लाइक्स, कमेंट्स आणि विविध क्राईम थ्रिलर वेब सिरीज यांच्या भडिमारामुळे कोवळ्या मनांचे मोठ्या प्रमाणावर ‘डिसेंसिटायझेशन’ (संवेदनाशून्यता) झाले आहे. पडद्यावरचे खून, हिंसाचार आणि गुन्हेगारी विश्वाचे उदात्तीकरण तरुणांच्या मनावर ‘हिंसा हा जगण्याचाच भाग आहे..’ असा संस्कार नकळत करीत आहे. लोहगडासारख्या ऐतिहासिक स्थळाची निवड करून आणि तिथे हत्या करून अपघाताचा केलेला बनाव हा एखाद्या सस्पेन्स चित्रपटाच्या संहितेसारखा वाटतो. परंतु, आभासी पडद्यावर जे सोपे आणि रंजक वाटते, ते प्रत्यक्ष आयुष्यात भयानक असते. डिजिटल क्रांतीने माहितीचा महापूर आला असला, तरी तरुणांच्या मनातील संवेदनांची ओल पुरती करपून गेली आहे. एखाद्याला कड्यावरून ढकलून देताना त्याची जगण्यासाठीची तडफड, कुटुंबाची वाताहत.. या कशाचाही विचार या तरुण मनांमध्ये येत नाही. त्यांच्या संवेदनांचे वाळवंट होते आहे.
गुन्हेगारी आणि तरुणाई
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात, विशेषतः पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरात, गंभीर गुन्ह्यांमधला तरुण आणि अल्पवयीन मुला-मुलींचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. अमली पदार्थांचे सहज होणारे सेवन, झटपट पैसा कमावण्याची हाव, अनैतिक संबंध आणि कमालीची स्पर्धात्मकता यातून ही गुन्हेगारी जन्म घेत आहे. सिया गोयल आणि तिच्या मित्राने मिळून हा कट रचला. यात त्या मित्राची भूमिकाही गुन्हेगारी स्वरुपाची आणि घातक आहे. केवळ मित्राच्या सांगण्यावरून किंवा कथित प्रेमापोटी एका तिसऱ्याच तरुणाचा जीव घेण्यास तयार होणे, ही गुन्हेगारी प्रवृत्तीची पराकोटी आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा काहीच धाक उरलेला नाही की काय, अशी भीती यावरून निर्माण होते.
पालकांची भूमिका आणि कौटुंबिक जबाबदारी
या समस्येचे मूळ केवळ कायद्याच्या चौकटीत किंवा पोलिसांच्या कारवाईत नाही, तर ते आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक संस्कारांमध्ये आहे. आज पालक म्हणून आपण आपल्या मुलांना भौतिक सुख-सुविधा, महागडे मोबाईल, गाड्या सर्वकाही देतो; पण त्यांना नकार ऐकण्याची सवय लावतो का? अपयश, नकार किंवा मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी पचवण्याची मानसिक ताकद त्यांच्यात निर्माण करतो का? हा आजच्या पालकांसाठी आत्मपरीक्षणाचा विषय आहे.मुलांच्या मोबाईलमध्ये काय चालले आहे, त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांच्या मनात काय घालमेल सुरू आहे, याकडे लक्ष देण्यास पालकांकडे वेळ आहे का? केवळ गुणपत्रकातील टक्केवारी किंवा पॅकेज म्हणजे यश नव्हे, तर मुलांमध्ये नैतिक मूल्ये, संवेदनशीलता आणि कायद्याचा आदर निर्माण करणे ही देखील पालकांचीच प्राथमिक जबाबदारी आहे. मुले जेव्हा असे टोकाचे पाऊल उचलतात, तेव्हा एका रात्रीत तसे घडत नाही; त्यांच्या वर्तनात दीर्घकाळापासून बदल होत असतात, ते ओळखण्यात आजची कौटुंबिक व्यवस्था कमी पडत आहे.
मूल्यशिक्षण कसे मिळणार?
केतन अग्रवालच्या हत्येने एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा आधारच हरपला. त्याचे आई-वडील ज्या धक्क्यातून आणि दुःखातून जात आहेत, त्याची कल्पनाही करवत नाही. दुसरीकडे, सिया आणि चेतन यांनी स्वतःचे उभे आयुष्यही अंधारकोठडीत ढकलले आहे. या घटनेचा तपास पोलीस करतीलच आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईलही. परंतु, न्यायालयाने दिलेल्या शिक्षेने गेलेला निष्पाप जीव परत येणार नाही आणि समाजात वेगाने पसरणारी ही विकृतीही एका रात्रीत नष्ट होणार नाही. नैतिकतेचे बुरुज जेव्हा ढासळतात आणि तरुणाई निर्दयी बनू लागते, तेव्हा समाज म्हणून आपण सर्वच अपयशी असतो. या घटनेच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालये, कुटुंबसंस्था आणि एकूणच समाजाने एकत्र येऊन तरुणाईच्या मानसिक आरोग्याकडे, त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेकडे आणि मूल्यांच्या जपणुकीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा, प्रगतीच्या गप्पा मारणाऱ्या आपल्या समाजात अशा क्रौर्याची नवनवीन आणि अधिक भयानक रूपे पाहावी लागतील. वेळ निघून जाण्यापूर्वी जागे होणे, हेच सर्वांच्या हिताचे आहे.