Thursday, July 9, 2026

बालमनांवर ताबूतांचा संस्कार?

Share

प्राथमिक शिक्षण हा कोणत्याही देशाच्या भावी पिढीचा आणि संस्कृतीचा पाया असतो. या वयात मुलांच्या कोऱ्या मनावर जे संस्कार केले जातात, तेच त्यांची जीवनदृष्टी आणि राष्ट्रीय अस्मिता निश्चित करत असतात. नुकतेच ‘बालभारती’ने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीनुसार प्राथमिक इयत्तांच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. सांगली जिल्ह्यासाठी तयार केलेल्या इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग – भाग १’ या नव्या पाठ्यपुस्तकात कडेगावच्या मोहरममधील ‘ताबूत भेट सोहळ्याचा’ इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे. शिक्षणशास्त्रात ‘कृतीशीलता’ आणण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असला, तरी स्थानिक संस्कृतीच्या नावाखाली ८ वर्षांच्या बालमनावर ताबूतांसारखे गुंतागुंतीचे ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ लादण्याची खरोखरच काय गरज होती? हा प्रश्न आता अभ्यासक आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

ज्ञाताकडून अज्ञाताकडे
शैक्षणिक मानसशास्त्रानुसार, प्राथमिक स्तरावरील शिक्षण हे ‘ज्ञाताकडून अज्ञाताकडे’ आणि ‘मूर्ताकडून अमूर्ताकडे’ या सूत्रावर आधारित असावे लागते. मूल प्रथम आपले कुटुंब, घर, सभोवतालचा परिसर, निसर्ग आणि गाव समजून घेते. जागतिक निकषही हेच सांगतात की, प्राथमिक स्तरावर स्थानिक भूगोल, पर्यावरण आणि स्व-भाषेला प्राधान्य दिले पाहिजे; गुंतागुंतीचे ऐतिहासिक संदर्भ पुढील इयत्तांसाठी राखले जातात.

अशा वेळी, तिसरीच्या विद्यार्थ्याला थेट क्लिष्ट सामाजिक-धार्मिक प्रथांमध्ये गुंतवणे कितपत योग्य आहे? स्थानिक पातळीवरील नैसर्गिक भूरूपे, नद्या आणि पर्यावरण समजून घेण्याऐवजी, ८ वर्षांच्या मुलाला मध्य आशियातील ऐतिहासिक संघर्षाची पार्श्वभूमी असलेली ताबुतांची परंपरा शिकवणे बालमानसशास्त्राच्या नैसर्गिक क्रमिकतेला तडा देणारे ठरू शकते.

ताबूत प्रथेचा इतिहास
मोहरम हा इस्लामी कालगणनेचा पहिला महिना असून, इ.स. ६८० मध्ये करबलाच्या रणांगणात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांनी न्यायासाठी दिलेल्या बलिदानाचा शोक व्यक्त करण्यासाठी हा सण पाळला जातो. इमाम हुसेन यांच्या मजारची प्रतिकृती म्हणजेच ‘ताबूत’ (उत्तर भारतात ‘ताजीया’), ज्याच्या मिरवणुकीची प्रथा भारतात चौदाव्या शतकात अमीर तैमूरलंग याने सुरू केली होती. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे ताबूत प्रथा पाळली जात आहे. कडेगावच्या या दीडशे वर्षांच्या परंपरेत हिंदू कुटुंबेही सहभागी होतात, ज्याला सामाजिक समरसेतेचे उदाहरण म्हणून मांडले गेले आहे.

परंतु, हा भारताचा मूळ गौरवशाली इतिहास नसून, परकीय आक्रमणांमुळे इथल्या भूमीवर ओढवलेल्या एका काळ्या ऐतिहासिक कालखंडाशी जोडलेला भाग आहे. ज्या लहान मुलांमध्ये अजून स्वदेशी संस्कृतीची पाळेमुळे रुजलेली नाहीत, त्यांच्या पाठ्यपुस्तकात अशा आयात केलेल्या परंपरांचे उदात्तीकरण का केले जावे? भारताचा इतिहास पराक्रम, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि उदात्त मानवी मूल्यांचा आहे. अशा वेळी मूळ सांस्कृतिक वारशाऐवजी बाह्य खुणांना पाठ्यपुस्तकात मानाचे स्थान देण्यामागील शैक्षणिक उद्दिष्ट नक्की काय, हा मोठा संभ्रम निर्माण होतो.

ऐक्य दाखवण्याच्या अतिउत्साहात सुप्त ध्रुवीकरण?
तिसरीच्या कोवळ्या मुलांना ‘हिंदू-मुस्लिम ऐक्य’ शिकवण्याचा हेतू वरकरणी चांगला वाटू शकतो; पण ८ वर्षांच्या मुलाला मैदानावर खेळताना किंवा वर्गात बसताना धर्म काय असतो, हे ठाऊकच नसते. मुले एकमेकांकडे केवळ ‘मित्र’ म्हणून पाहतात. पण जेव्हा पाठ्यपुस्तक त्यांना विशेषत्वाने सांगते की, “हा उत्सव हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवतो,” तेव्हा मुलाच्या सुप्त मनात पहिला प्रश्न पडू शकतो की—’म्हणजे हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगळे आणि विरोधी गट आहेत का?’ ऐक्य दाखवण्याच्या अतिउत्साहात आपण त्यांच्या कोवळ्या मनात नकळत धार्मिक भिंती तर उभ्या करत नाही ना, याचा विचार अभ्यासक्रमात झालेला दिसत नाही.

उपेक्षित स्वदेशी वारसा
जर बालभारतीला सांगली जिल्ह्याचा किंवा स्थानिक परिसराचा इतिहास शिकवायचाच होता, तर ताबूतांसारख्या बाह्य परंपरांऐवजी इथल्या मातीशी घट्ट जोडलेला स्वदेशी वारसा का डावलला गेला?
• कोळदुर्ग किल्ला: खानापूर तालुक्यातील पळशीजवळील या किल्ल्यावर कल्याणी चालुक्य वंशाचा राजा जगदेकमल्ल (इ.स. ११३८ ते ११५०) याच्या काळातील शिलालेख आहे, जो प्राचीन भारतीय स्थापत्य आणि धार्मिक सहिष्णुतेचा खरा इतिहास सांगतो.
• जैन परंपरा (कुंडल): भगवान महावीर आणि पार्श्वनाथांच्या आगमनाशी जोडलेला कुंडलचा इतिहास आणि चालुक्य राजांनी दिलेले ताम्रपट यातून मुलांमध्ये संशोधकवृत्ती वाढवता आली असती.
• बौद्ध परंपरा (गिरीलिंग डोंगर): सातवाहन काळातील (इ.स. पहिले ते तिसरे शतक) प्राचीन बौद्ध लेण्यांचा वारसा मुलांना आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून देऊ शकला असता.

अशा प्राचीन वैभवाऐवजी आणि कवठेएकंदच्या विजयादशमीसारख्या जुन्या ‘विजयाचे प्रतीक’ असलेल्या गावाच्या एकजुटीच्या उत्सवाव्यतिरिक्त, ताबूतांच्या इतिहासाला अधिक महत्त्व देणे अनाकलनीय आहे.

द्विभाषिकतेचा भार
द्विभाषिक सादरीकरणामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल दुय्यमत्वाची भावना निर्माण होण्याची शक्यता काही भाषाशास्त्रज्ञांनी मांडली आहे. मूल जेव्हा मराठी शब्दाच्या पुढे कंसात इंग्रजी शब्द पाहते, तेव्हा त्याच्या सुप्त मनामध्ये अशी प्रतिमा निर्माण होऊ शकते की, आपली मातृभाषा- मराठी अत्यंत अवघड किंवा अपूर्ण आहे; तर कंसात दिलेली इंग्रजी भाषा ही सोपी आणि अधिक महत्त्वाची आहे. या पद्धतीमुळे मुलांच्या मनात स्वभाषेविषयी नकळत अनादर निर्माण होण्याचा धोका असतो. मराठी शिकताना इंग्रजी कुबड्यांची गरज पडणे, हे भाषिक विकासाच्या दृष्टीने योग्य नाही.

शहरांमधील इंग्रजी माध्यमाच्या प्रभावाखाली असलेल्या सुशिक्षित पालकांना कंसातील इंग्रजी शब्द कदाचित सोपे वाटू शकतील; परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या आणि शेतकरी किंवा कष्टकरी पार्श्वभूमी असलेल्या ग्रामीण पालकांचे काय?

कृतीशील ज्ञानरचनावादाचा जागर
पाठ्यपुस्तकातील वैचारिक त्रुटींवर चिकित्सा करताना, बालभारतीने केलेले काही अत्यंत सकारात्मक आणि प्रगतशील बदल देखील नोंदवणे न्याय्य ठरेल.
• ‘घोकंपट्टी’ला पूर्णविराम: पूर्वीची केवळ ‘धडा वाचणे आणि पाठाखालचे प्रश्नोत्तरे पाठ करून परीक्षेत लिहिणे’ ही घोकंपट्टीची पद्धत मुलांची कल्पनाशक्ती मर्यादित करत असे. नवीन पुस्तकात हा साचेबद्धपणा मोडण्यात आला आहे.
• ‘करून पहा’, ‘शोध घ्या’, ‘चर्चा करा’: प्रत्येक पाठाच्या शेवटी दिलेले हे छोटे उपक्रम मुलांमधील उपजत शोधकवृत्तीला वाव देतात. जेव्हा एखादे मूल स्वतःच्या परिसरातील वनस्पतींचे निरीक्षण करते, पालकांशी चर्चा करते, तेव्हा त्याचे शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता ‘अनुभवजन्य’ बनते. यामुळे मुलांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची सवय लागेल, जी भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

नवीन पुस्तकात ‘कृतीप्रधान आणि ज्ञानरचनावाद’ (नुसते माहिती वाचन करण्यापेक्षा कृती आणि अनुभव यांच्या माध्यमातून शिक्षणाद्वारे ज्ञान देण्याची पद्धत) या पद्धतीचा केलेला अंतर्भाव अत्यंत प्रशंसनीय आणि स्वागतार्ह आहे.

बालभारतीचे हे पाठ्यपुस्तक ‘ज्ञानरचनावाद’ पुरस्काराच्या आणि ‘घोकंपट्टीला पूर्णविराम’ देण्याच्या पातळीवर अत्यंत प्रशंसनीय असले, तरी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पातळीवर भरकटलेले दिसते. ८ वर्षांच्या मुलांवर ताबूतांसारख्या बाह्य परंपरांचा इतिहास लादणे शैक्षणिक आणि मानसशास्त्रीय निकषांना धरून नाही. पुढील आवृत्तीत सुधारणा करताना अभ्यासक्रम समितीने बालमनाचा नैसर्गिक विकासक्रम, स्वदेशी ऐतिहासिक वारसा आणि मातृभाषेचे पावित्र्य राखण्याला प्राधान्य दिले, तरच खऱ्या अर्थाने ‘राष्ट्रकेंद्री’ आणि ‘वैज्ञानिक’ जाणिवा असणारी समृद्ध पिढी निर्माण होईल.

– मैत्रेयी गोडसे

अन्य लेख

संबंधित लेख