Friday, September 11, 2026

‘दिल्लीत मंदिर होते दहशतवाद्यांचे लक्ष्य’

Share

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोट ११ जण ठार झाले तर अनेकजण जखमी झाले. या प्रकरणातील आत्मघाती हल्लेखोराने बॉम्ब तयार करण्यासाठी युरियाचा वापर केला असण्याची शक्यता देशाची प्रमुख दहशतवादविरोधी एजन्सी एनआयएने वर्तवली आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी उमर-उन-नबी आहे. चांदणी चौकातील लाल मंदिराजवळ कार उभी करून स्फोट घडवण्याचा त्याचा हेतू होता. आरोपपत्रात हल्ल्याची आखणी कशी केली, तपास यंत्रणांपासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घेतली, याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. आरोपपत्रानुसार, उमर-उन-नबीचा मूळ हेतू चांदणी चौकातील लाल मंदिराजवळ कार उभी करून स्फोट घडवण्याचा होता. मात्र, तेथे प्रचंड वाहतूक आणि पोलिसांचा बंदोबस्त असल्याने त्याला योजना राबवता आली नाही. त्यानंतर त्याने कार वळवून लाल किल्ल्याकडे मोर्चा वळवला. तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, उमर लाल मंदिराजवळ कार उभी करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

परिस्थिती प्रतिकूल असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने यू-टर्न घेतला. त्यानंतर अवघ्या १३ मिनिटांनी, सायंकाळी ६.५० वाजता, लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक ४ जवळ भीषण स्फोट झाला. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे, उमर स्फोटके सुरक्षित ठेवण्यासाठी आपली खोली नेहमी अत्यंत थंड ठेवत असे. खोलीतून सतत दुर्गंधी येत असल्याचे साक्षीदारांनी सांगितले. तयार केलेले टीएटीपी सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने पाणी भरण्याच्या विशेष पिशव्या विकत घेतल्या होत्या. स्फोटक मिश्रण स्थिर राहावे यासाठी त्यात नियमितपणे पाणी टाकले जात असल्याचेही साक्षीदारांनी तपास यंत्रणेला सांगितले.

पोलिसांच्या कारवाईनंतर उमर हरियाणातील नूंह येथील एका घरात लपून बसल्याचे तपासात उघड झाले. त्या घरातील एका महिला सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, तो बाहेर लघवीसाठी जात नव्हता. तो प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी साठवत असे, त्यामुळे खोलीत तीव्र दुर्गंधी पसरली होती. तपासादरम्यान एक दस्तावेजही जप्त करण्यात आला असून, त्यात युरिया नायट्रेट आधारित स्फोटक तयार करण्याची पद्धत नमूद होती. त्यामध्ये युरियाचा स्रोत म्हणून लघवीतून युरिया मिळवण्याचाही पर्याय होता.

या लाल किल्ला बॉम्बस्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर २९ जण जखमी झाले होते. शवविच्छेदन अहवालानुसार, मृत्यूचे कारण उच्च तीव्रतेच्या स्फोटलहरी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या स्फोटामुळे परिसरातील इमारतींचे सुमारे १७.७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंदही आरोपपत्रात करण्यात आली आहे.

सुरक्षेतील त्रुटी व सीसीटीव्हीचे महत्त्व..

आरोपपत्रानुसार, आरोपीने तपासापासून वाचण्यासाठी अनेक अत्याधुनिक खबरदारीचे उपाय योजले होते. परंतु, चांदणी चौक परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे तपास यंत्रणांना त्याचे धागेधोरे जोडता आले. यावरून हे स्पष्ट होते की, आधुनिक शहरातील सार्वजनिक सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नेटवर्क आणि डिजिटल सर्व्हेलन्स हे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे.

यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ‘ह्युमन इंटेलिजन्स’ म्हणजेच मानवी बुद्धीला पर्याय असू शकत नाही. जुनी दिल्ली किंवा चांदणी चौकासारखे भाग हे प्रचंड लोकसंख्या आणि गजबजलेल्या बाजारपेठांनी वेढलेले आहेत. अशा ठिकाणी अनोळखी व्यक्तीची हालचाल, संशयास्पद वाहने किंवा अनधिकृत उपक्रमांची माहिती मिळवण्यासाठी स्थानिक व्यापारी संघटना, नागरिक आणि दुकानदार यांचा सुरक्षेत सहभाग अत्यंत मोलाचा ठरतो.

अन्य लेख

संबंधित लेख