Friday, September 18, 2026

गणपती तुझे नाव चांगले – महोदर

Share

प्रस्तावना

यंदाच्या वर्षी येणाऱ्या या अनोख्या १२ दिवसीय गणेशोत्सवानिमित्तर १२ दिवस रोज एकेक नाव आणि त्यामागील रोचक कथा आपण  ‘गणपती तुझे नाव चांगले’ या नाम मालेत पाहणार आहोत. आज गणरायाच्या ‘महोदर’ या रूपाचे आणि नामाचे चिंतन करूया.

गणेशाच्या रूपाकडे पाहताना प्रत्येकाचे लक्ष त्याच्या विस्तीर्ण आणि विशाल पोटाकडे सहज वेधले जाते. लौकिक दृष्टीने हे केवळ लंबोदराचे रूप वाटू शकते; परंतु, हे उदर म्हणजे अथांग विश्वाला आणि अनंत ज्ञानाला स्वतःमध्ये सामावून घेणारे महापात्र आहे. मुद्गल पुराणात वर्णन केलेल्या गणेशाच्या अष्ट अवतार परंपरेतील तिसरा दैवी अवतार म्हणजे ‘महोदर’. हे केवळ एक रूप नसून मानवी चेतनेला अज्ञानाच्या गर्तेतून मुक्त करणाऱ्या एका सर्वोच्च आध्यात्मिक प्रज्ञेचे प्रकटीकरण आहे.

महोदर शब्दाचा अर्थ

‘महोदर’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘महा’ अधिक ‘उदर’ अशी होते. ‘महा’ म्हणजे अत्यंत विशाल, अमर्याद, जे काळाच्या आणि अवकाशाच्याही पलिकडे विस्तारलेले आहे; आणि ‘उदर’ म्हणजे पोट अथवा अंतरंग—जे सर्व काही स्वतःमध्ये सामावून घेते, पचवते आणि स्थिर राहते. या शब्दाचे मूळ रहस्य स्पष्ट करताना मुद्गल पुराणात म्हटले आहे:

महोदर इति ख्यातो ज्ञानब्रह्मप्रकाशकः ।

मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवाहनगः स्मृतः ॥

अर्थात, जो साक्षात ‘ज्ञानब्रह्म’ प्रकाशित करतो, मोहासुराचा भ्रम दूर करणारा त्याचा परमशत्रू आहे आणि ज्याचे वाहन मूषक आहे, तोच ‘महोदर’ म्हणून ओळखला जातो. येथे उदर हे केवळ स्थूल अन्नाचे पोषण करणारे नसून, संपूर्ण विश्वातील गूढ चैतन्य आणि ज्ञानब्रह्माचे साठवणूक केंद्र आहे.

मुद्गल पुराणातील कथा

या अवतारामागील पौराणिक कथा मानवी मनाच्या एका सूक्ष्म अंतर्द्वंद्वावर प्रकाश टाकते. दैत्यगुरू शुक्राचार्यांचा शिष्य असलेल्या ‘मोहासुरा’ने सूर्यदेवाची घोर तपश्चर्या केली. त्याच्या कठोर तपावर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला त्रैलोक्यावर विजय मिळवण्याचे असीम सामर्थ्य वरदान म्हणून दिले. परंतु शक्तीला जेव्हा विवेकाचे अधिष्ठान नसते, तेव्हा ती विनाशाचा मार्ग चोखाळते. मोहासुराने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ अशा तिन्ही लोकांवर आपले आधिपत्य प्रस्थापित केले.

मोहासुराचे हे आक्रमण केवळ शस्त्रांचे नव्हते; ते चेतनेवर आणि बुद्धीवर झालेले सूक्ष्म आक्रमण होते. त्याच्या प्रभावामुळे स्वर्गातील देव, अरण्यातील तपस्वी ऋषी-मुनी आणि सामान्य जनसमूह स्वतःचे मूळ कर्तव्य, धर्म आणि विवेक विसरून अज्ञानाच्या आणि भ्रमाच्या जाळ्यात अडकले. सत्य काय आणि आभास काय यातील भेदच मिटून गेला. जेव्हा विवेक नष्ट होतो, तेव्हा सर्वत्र हाहाकार माजतो. विश्वाचा हा वैचारिक तोल ढासळत असताना, वक्रतुंड आणि एकदंताच्या संयुक्त प्रज्ञेतून ‘महोदर’ अवताराचा उदय झाला.

महोदर अवताराचे सर्वात मोठे वेगळेपण म्हणजे त्यांनी मोहासुराचा पराभव रणांगणावर रक्त सांडून केला नाही. मोहासुर जेव्हा युद्धाच्या उन्मादात महोदरासमोर आला, तेव्हा महोदराने त्याच्यावर कोणत्याही संहारक अस्त्राचा मारा केला नाही; उलट त्यांनी त्याच्यासमोर साक्षात ‘ज्ञानब्रह्माचा’ उपदेश केला. ज्ञानाचा तो प्रकाश पसरताच मोहासुराच्या डोळ्यांसमोरील अज्ञानाचे पडदे गळून पडले. ज्या सत्तेचा, संपत्तीचा आणि वैभवाचा त्याला अहंकार होता, ते सर्व केवळ क्षणभंगुर आणि मिथ्या आहे याची जाणीव त्याला झाली. मोहाचे अस्तित्व केवळ ज्ञानाच्या अभावामुळेच टिकून असते; सूर्य उगवताच अंधार जसा क्षणात विरून जातो, तसेच ज्ञानब्रह्माच्या प्रकटीकरणाने मोहासुराचा भ्रम नष्ट झाला आणि तो नतमस्तक होऊन महोदराच्या चरणी लीन झाला.

महोदराचा तात्त्विक आणि आध्यात्मिक अर्थ

या कथेचा तात्विक गाभा मानवी अस्तित्त्वाशी अत्यंत खोलवर जोडलेला आहे. ‘मोहासुर’ हा बाहेरचा कुठला दैत्य नसून आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनात ठाण मांडून बसलेली एक घातक प्रवृत्ती आहे. ‘मोह’ म्हणजे नश्वर जगालाच अंतिम सत्य मानण्याची मानसिक भूल. देहाची क्षणिक सुखे, संपत्ती, नाती आणि अहंकार यात अडकून जेव्हा मनुष्य स्वतःच्या शाश्वत आत्मस्वरूपाचा विसर पाडतो, तेव्हा त्याच्यात मोहासुर जागा झालेला असतो. हा मोह विवेकाचा गळा घोटतो आणि माणसाला दुःखाच्या फेऱ्यात ढकलतो.

या पार्श्वभूमीवर महोदराचे ‘विशाल उदर’ हे आध्यात्मिक पचनक्षमतेचे प्रतीक बनते. खरा ज्ञानी तोच, जो विश्वातील सुख-दुःख, निंदा-स्तुती, मान-अपमान या सर्व द्वंद्वांना आपल्या अंतरात सामावून घेऊ शकतो, त्यांना पचवू शकतो आणि तरीही अविचल राहतो. जगातील सर्व कोलाहल स्वतःमध्ये सामावून घेऊन त्यातून केवळ शांती आणि ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्याचे सामर्थ्य महोदराच्या उदरात आहे.

त्याचप्रमाणे, महोदराचे वाहन असलेला मूषक (आखु) हा मानवाच्या चंचल वासनांचे आणि सतत भौतिक सुखांमागे धावणाऱ्या चंचल मनाचे रूपक आहे. उंदीर जसा अंधारात राहून अखंड कुरतडत राहतो, तसेच वासनांध मन माणसाची शांती कुर्तडत असते. महोदर जेव्हा मूषकावर स्वार होतात, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, ज्ञानाने चंचल मनावर आणि अमर्याद वासनांवर पूर्ण ताबा मिळवला आहे.

महोदराय नमः|

महोदर हे केवळ एका देवतेचे नाव नसून अंतर्मनातील मोहाचे जाळे छेदून विवेकाचा प्रकाश पाडणारी एक आंतरिक प्रक्रिया आहे. जोपर्यंत आपल्या आत ब्रह्म ज्ञानाचा उदय होत नाही, तोपर्यंत मोहाच्या बंधनातून मुक्ती मिळणे अशक्य असते. जेव्हा आपण जगातील अनुभवांना तटस्थपणे आपल्या अंतःकरणात पचवून सत्याचा अंगीकार करतो, तेव्हाच आपल्या अंतरात खऱ्या अर्थाने ‘महोदर’ तत्त्वाचा साक्षात्कार घडतो.

अन्य लेख

संबंधित लेख