Thursday, September 17, 2026

तुम्ही नास्तिक आहात का?

Share

प्रस्तावना

एखादा व्यक्ती कधी मंदिराची पायरी चढत नसेल, पूजाअर्चा करत नसेल किंवा धर्माच्या पारंपरिक चौकटी नाकारत असेल, तर आपण त्याला सहज ‘नास्तिक’ ठरवून मोकळे होतो. ‘देव मानणारा तो आस्तिक आणि देव न मानणारा तो नास्तिक’ अशीच एक अगदी सोपी, सरधोपट व्याख्या आपल्या सगळ्यांच्या मनात पक्की बसलेली असते.
पण गंमत म्हणजे, आपल्या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात डोकावून पाहिलं, तर सुरुवातीला नास्तिक असण्याचा ईश्वराशी किंवा देवाची पूजा करण्याशी थेट काहीही संबंध नव्हता! इतकेच नव्हे, तर ईश्वराचे अस्तित्व नाकारूनही एखादा विचारप्रवाह पूर्णपणे ‘आस्तिक’ मानला गेला, तर उच्च नैतिक मूल्ये जपणारे विचारवंत मात्र ‘नास्तिक’ ठरवले गेले. हा शब्दाचा आणि विचारांचा रंजक प्रवास नेमका कसा झाला, ते आजच्या ‘शब्दांच्या दुनियेत’ या लेखमालेत पाहूया.

भारतीय वैचारिक आणि दार्शनिक परंपरेमध्ये ‘आस्तिक’ आणि ‘नास्तिक’ या संज्ञा अत्यंत सूक्ष्म, बहुआयामी आणि विशिष्ट तात्त्विक संदर्भाने युक्त आहेत. आधुनिक व्यवहारात पाश्चात्त्य ‘Atheism’ या संकल्पनेचे भाषांतर म्हणून ‘नास्तिक’ हा शब्द रूढ झालेला असला, तरी भारतीय दर्शनांमध्ये आणि संस्कृत वाङ्मयात या शब्दाची व्याप्ती केवळ “ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा” एवढ्यापुरती मर्यादित नाही. 

‘परलोक’ नाकारणारा तो नास्तिक!

संस्कृत व्याकरणाचा पाया रचणारे महर्षी पाणिनी यांनी ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथात एक पायाभूत सूत्र दिले आहे—‘अस्ति नास्ति दिष्टं मतिः’ (४.४.६०). या सूत्रावर ‘काशिकावृत्ती’मध्ये भाष्य करताना नास्तिक शब्दाचा मूळ अर्थ स्पष्ट केला आहे: ‘नास्ति परलोक इति मतिर्यस्य स नास्तिकः’.

म्हणजेच, ज्याची अशी पक्की धारणा (मति) आहे की दृश्य जगतापलीकडे कर्माची फळे भोगायला कोणताही ‘परलोक’ अस्तित्वात नाही, तो ‘नास्तिक’! प्राचीन व्याकरण परंपरेत देव किंवा पूजापाठाचा कुठेही संबंध नव्हता; तर मृत्यूनंतर आत्म्याचे अस्तित्व, अदृष्ट आणि नैतिक कर्मफळ नाकारणारा माणूस हा ‘नास्तिक’ मानला गेला.

‘नास्तिको वेदनिन्दकः’

पुढे समाजव्यवस्था आणि स्मृतीग्रंथांच्या काळात नास्तिकतेची व्याख्या तात्त्विक भूमिकेकडून सामाजिक आचारशास्त्राकडे वळली. मनुस्मृतीमध्ये या संज्ञेला एक आक्रमक आयाम मिळाला:

‘योऽवमन्येत ते मूले हेतुशास्त्राश्रयाद् द्विजः ।

स साधुभिर्बहिष्कार्यो नास्तिको वेदनिन्दकः ॥ (२.११)

केवळ शुष्क तर्काच्या (हेतुशास्त्र) बळावर श्रुती आणि स्मृतींचा अनादर करणारा तो ‘वेदनिंदक’ आणि पर्यायाने ‘नास्तिक’ ठरवला गेला. वाल्मीकि रामायणातील अयोध्याकांडातही महर्षी जाबालि जेव्हा प्रभू श्रीरामांना वनवास सोडून परत येण्यासाठी पूर्णतः इहवादी आणि प्रत्यक्षवादी युक्तिवाद करतात, तेव्हा श्रीराम त्यांच्या विचारांना ‘वेदविरुद्ध नास्तिक विचार’ म्हणून स्पष्ट नकार देतात. या टप्प्यावर परंपरेच्या प्रमाणग्रंथांना आव्हान देणारा तो नास्तिक ठरला.

भारतीय दर्शने: ईश्वरापेक्षा ‘वेदप्रामाण्य’ महत्त्वाचे

भारतीय तत्त्वज्ञानात विचारसरणींचे वर्गीकरण करताना मुख्य निकष ‘ईश्वर’ नसून ‘वेदांचे अंतिम प्रामाण्य’ हाच होता. त्यामुळे ज्यांनी वेदांना प्रमाण मानले, ती सांख्य किंवा पूर्वमीमांसा दर्शने ईश्वराचे अस्तित्व उघडपणे नाकारूनही ‘आस्तिक’ ठरली.

याउलट, चार्वाक, बौद्ध आणि जैन या दर्शनांनी वेदांचे अपौरुषेयत्व नाकारल्यामुळे त्यांना ‘नास्तिक दर्शने’ (वेदबाह्य) म्हटले गेले. वेदांचे अपौरुषेयत्व म्हणजे काय? तर, जरी प्रत्यक्ष वेदातील मंत्र ऋषींनी सांगितलेले असले तरी देखील ऋषींना ते ज्ञान स्फुरले आणि दिसले. ते ज्ञान सामान्य व्यक्तींपर्यंत आणण्यासाठी ऋषी ‘माध्यम’ ठरले. म्हणूनच वेदातील मंत्र रचणारे ऋषी ‘कर्ते’ नसून ‘द्रष्टे’ ठरले. या विचारसरणीलाच नास्तिक दर्शनांनी स्वीकारले नाही.

विशेष म्हणजे, जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञान नैतिक कर्मनियम, पुनर्जन्म आणि मोक्ष मानत होते; म्हणूनच जैन दार्शनिक हरिभद्र सूरि यांनी स्वतःला आस्तिक मानत केवळ प्रत्यक्षवादी चार्वाकाला ‘नास्तिक’ म्हटले. चार्वाकाने मात्र प्रत्यक्ष न दिसणारा देव, धर्म, स्वर्ग आणि परलोक सगळेच नाकारल्यामुळे त्याला ‘नास्तिक शिरोमणी’ म्हटले गेले.

‘Atheism’ ते आधुनिक नास्तिकता

मग हा शब्द फक्त ‘देव न मानणारा’ या अर्थाने कसा रूढ झाला? एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांच्या काळात इंग्रजी संज्ञांचे देशी भाषांमध्ये भाषांतर सुरू झाले. ग्रीक ‘Theos’ (ईश्वर) वरून आलेल्या इंग्रजी ‘Theism’ ला ‘आस्तिक’ आणि ‘Atheism’ ला ‘नास्तिक’ असा प्रतिशब्द देण्यात आला. पाश्चात्त्य परंपरेतील ‘ईश्वर मानणे अथवा न मानणे’ ही चौकट भारतीय भाषेवर बसवली गेली आणि जुना सूक्ष्म तात्त्विक संदर्भ मागे पडून ‘नास्तिक म्हणजे निरीश्वरवादी’ हाच अर्थ जनमानसात पक्का झाला.

आधुनिक काळात शहीद भगतसिंगांच्या प्रसिद्ध “Why I am an Atheist” या निबंधाचे भाषांतर जेव्हा “मी नास्तिक का आहे?” असे केले गेले, तेव्हा त्यातील नास्तिकता ही वैज्ञानिक विवेकवाद, भौतिकवाद आणि सर्वशक्तिमान ईश्वराचा नकार दर्शवणारी आधुनिक नास्तिकता होती.

समाजमनावर काय परिणाम झाला?

या विचारसरणीने भारतीय समाजमनावर दुहेरी परिणाम घडवला:

  • सकारात्मक बाजू: या विचाराने अंधश्रद्धा, घातक रूढी, शोषक कर्मकांडे आणि विषम सामाजिक नियमांना थेट प्रश्न विचारण्याचे बळ दिले. ‘अनुभवाच्या कसोटीवर तपासून पाहा’ ही वैज्ञानिक दृष्टी दिली आणि मानवी बुद्धीचे स्वातंत्र्य अधोरेखित केले.
  • नकारात्मक बाजू: अनेकदा याचे रूपांतर टोकाच्या भौतिकवादात किंवा कोरड्या वितंडवादात झाले. संस्कृतीतील उदात्त प्रतीके आणि सामूहिक नैतिक मूल्यांकडे सरसकट संशयाने पाहण्याची एकांगी वृत्ती निर्माण झाली.
खरा नास्तिक कोण?

भारतीय परंपरेत नास्तिक म्हणजे वेदप्रमाण्य न मानणारा. जो वेद आणि पारंपारिक आचारांचा अवमान करणारा वेदनिंदक ठरतो तो प्रत्येक जण नास्तिक. तरीही त्यांना दर्शन परंपरेचा स्तर लाभलेला होता. पाणिनीय कालखंडात नास्तिक म्हणजे परलोकाचा अभाव मानणारा होय. आणि आधुनिक जनमानसात मात्र पाश्चात्त्य प्रभावामुळे तो सृष्टिकर्त्या ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा निरीश्वरवादी मानला जातो.

त्यामुळे, नास्तिक असणे म्हणजे केवळ विरोधासाठी देवाला नाकारणे किंवा रूढींवर कोरडी टीका करणे नव्हे; तर स्वतःच्या विवेकाला जागी ठेवून, अंधश्रद्धा झुगारून, किमान स्वतःच्या आचरणाची व कर्मांची संपूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारणे हीच खरी प्रगल्भ नास्तिकता आहे!

अन्य लेख

संबंधित लेख