राजकीय स्वार्थासाठी इतिहासाची आणि आपल्या परंपरांची मोडतोड करणे हा नवा प्रकार नाही. पण जेव्हा हा स्वार्थ थेट हजारो वर्षांच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेवर घाला घालतो, तेव्हा त्याबाबत स्पष्ट बोलावे लागते. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी म्हणजे वैष्णवांची चलती आणि शैवांची पीछेहाट, असा एक नवा आणि पूर्णपणे निराधार युक्तिवाद अलीकडे ऐकायला मिळत आहे. रेवंत रेड्डी यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांची या संदर्भातील विधाने केवळ अपरिपक्व नाहीत. तर ती भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेवर आघात करणारी आहेत. शैव आणि वैष्णव या दोन परंपरांमध्ये तत्त्ववैचारिक वैर कधीच नव्हते. हे दोन्ही प्रवाह एकाच महासागराला मिळणाऱ्या नद्या आहेत. हे समजून घेण्यासाठी भारतीय इतिहासात आणि तत्त्वज्ञानात थोडी खोल डुबी मारण्याची गरज आहे.
उत्तर–दक्षिण संघर्षाचा बनाव
राम मंदिर आणि शैव-वैष्णव वादाला आता उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत अशा संघर्षाची फोडणी दिली जात आहे. हा राजकीय प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडला पाहिजे. मुळात दक्षिण भारत हा केवळ शैवांचा आणि उत्तर भारत वैष्णवांचा, अशी कोणतीही विभागणी इतिहासात अस्तित्वात नाही. दक्षिणेत तिरुपती बालाजी, श्रीरंगपट्टणमचा रंगनाथ, उडुपीचा श्रीकृष्ण आणि तिरुअनंतपुरमचा पद्मनाभस्वामी अशी विष्णूची अनेक भव्य आणि प्राचीन मंदिरे आहेत. तिथे वैष्णव परंपरा हजारो वर्षे समृद्ध झाली आहे. दुसरीकडे, उत्तरेत थेट हिमालयाच्या कुशीत केदारनाथ आणि गंगेच्या तीरावर काशी विश्वनाथ विराजमान आहेत. संपूर्ण देशभरात शिव आणि विष्णू यांची समान श्रद्धेने पूजा होते. त्यामुळे या दैवतांना भौगोलिक सीमांमध्ये बांधण्याचा राजकीय अजेंडा इथल्या मातीला कधीही मान्य होणार नाही. हा संघर्ष केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी उभा केला जात आहे.
पाश्चात्य अभ्यासकांचे भ्रामक नरेटिव्ह
शिव हा मुळात इथल्या आदिम समाजाचा वेगळा देव आहे आणि विष्णू हा आर्यांचा देव आहे, असे एक नरेटिव्ह जाणीवपूर्वक पसरवले गेले. हे प्रामुख्याने पाश्चात्य अभ्यासकांचे आणि वसाहतवादी मानसिकतेचे अपत्य आहे. त्यांनी भारतीय समाज विभागण्यासाठी आर्य-द्रविड सिद्धांताला खतपाणी घातले. आणि या दैवतांचीही तशीच विभागणी केली. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतरही काहींनी हेच भ्रामक नरेटिव्ह पुढे चालवले. पण भारतीय तत्त्वज्ञानात असा कोणताही भेद नाही. वेद, उपनिषदे आणि पुराणांचा समग्र अभ्यास केल्यास शिव आणि विष्णू हे एकाच परमतत्त्वाचे दोन आविष्कार आहेत, हे वारंवार स्पष्ट होते. शिव हा जितका आदिम आहे, तितकाच तो वैश्विकही आहे. त्यामुळे पाश्चात्यांच्या चष्म्यातून आपला देव शोधण्याची किंवा त्यांच्या विभागणीवर विश्वास ठेवण्याची आपल्याला कोणतीही गरज नाही.
अद्वैताची साक्ष आणि आदि शंकराचार्य
भारतात जेव्हा विविध संप्रदायांमध्ये उपासनेवरून मतभेद निर्माण होऊ लागले, तेव्हा आदि शंकराचार्यांनी भक्कम वैचारिक मांडणी केली. त्यांनी अद्वैत वेदांताचा पुरस्कार केला. त्यांच्या मते, ब्रह्म हे एकच आणि अद्वैत आहे. त्याचेच सगुण रूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश होत. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन नैसर्गिक अवस्थांसाठी ही तीन रूपे मानली गेली आहेत. शंकराचार्यांनी पंचायतन पूजेची सुरुवात केली. यात शिव, विष्णू, सूर्य, गणपती आणि देवी या पाचही दैवतांची एकत्र पूजा करण्याची पद्धत त्यांनी रूढ केली. देशाच्या चार दिशांना चार पीठे स्थापन करून त्यांनी संपूर्ण भारताला एका धाग्यात बांधले. ‘शिवस्य हृदयम विष्णू, विष्णोश्च हृदयम शिव:’ म्हणजेच शिव हा विष्णूच्या हृदयात आहे आणि विष्णू शिवाच्या हृदयात आहे. हे शंकराचार्यांनी मांडलेले अद्वैत भारतीय जनमानसात आजवर खोलवर रुजले आहे.
हरी आणि हर यांचे एकत्व
आपल्याकडे केवळ तात्विक पातळीवरच नाही, तर प्रत्यक्ष पूजेतही शिव आणि विष्णू एकत्र पूजले जातात. ‘हरिहर’ हे त्याचे सर्वात मोठे आणि जिवंत उदाहरण आहे. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव. कर्नाटकातील हरिहरेश्वराचे मंदिर असो किंवा महाराष्ट्रातील पंढरपूरचा विठ्ठल असो, सर्वत्र हे एकत्व दिसते. विठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग आहे, अशी वारकरी संप्रदायाची दृढ धारणा आहे. रामेश्वरला प्रभू रामचंद्रांनी स्वतः शिवलिंगाची स्थापना करून शिवाची आराधना केली. तर शिव नेहमी रामनामाचा जप करतात, असे तुलसीदासांनी रामचरितमानसात स्पष्ट लिहिले आहे. जिथे राम स्वतः शिवाची भक्ती करतो आणि शिव रामाची भक्ती करतात, तिथे त्यांच्या भक्तांमध्ये वैर असण्याचे काहीच कारण उरत नाही.
समन्वय साधणारी दत्त परंपरा
भारतीय परंपरेत समन्वयाचे सर्वात मोठे प्रतीक म्हणजे भगवान दत्तात्रेय होत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही दैवतांचे मिळून झालेले हे एकच परिपूर्ण रूप आहे. दत्त ही देवता कोणत्याही एका संप्रदायाची मक्तेदारी नाही. ती शैव आणि वैष्णव या दोन्ही प्रवाहांना एकत्र आणणारा एक मजबूत सेतू आहे. नाथ संप्रदाय, महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय या सर्वांनी दत्त परंपरेचा मोठ्या आदराने स्वीकार केला आहे. दत्तात्रेयाच्या उपासनेने आपल्याला हजारो वर्षे हेच शिकवले आहे की, ईश्वराची रूपे अनेक असली तरी मूळ तत्त्व एकच आहे. या परंपरेने भारतातील आध्यात्मिक मतभेद मिटवून एक व्यापक समन्वय प्रस्थापित केला.
राम मंदिराच्या नावाने शैव आणि वैष्णव असा वाद उकरून काढणे हा बौद्धिक दिवाळखोरीचा पुरावा आहे. आपला समाज अशा उथळ आरोळीला भुलणारा नाही. इथल्या मातीत अद्वैताचे बीज रुजले आहे. राम जेवढा उत्तरेचा आहे, तेवढाच तो दक्षिणेचाही आहे. शिव जसा कैलासावर आहे, तसाच तो रामेश्वरममध्येही आहे. त्यामुळे अशा राजकीय वक्तव्यांकडे दुर्लक्ष करून, आपल्या हजारो वर्षांच्या समन्वयवादी परंपरेचा वारसा आपण अधिक प्रगल्भपणे जपायला हवा.