मणिपूर : ईशान्येकडील मणिपूर राज्याला अखेर नवीन नेतृत्व मिळाले आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट अधिकृतपणे उठवण्यात आली असून, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद सिंह यांनी आज मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजधानी इंफाळमधील ‘लोक भवन’ येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी त्यांना शपथ दिली.
दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती
राज्यातील मैतेई, कुकी आणि नागा या तिन्ही समुदायांमध्ये समतोल राखण्यासाठी भाजपने ‘एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री’ असा फॉर्म्युला राबवला आहे:
मुख्यमंत्री: युमनाम खेमचंद सिंह (मैतेई समुदाय)
उपमुख्यमंत्री १: नेमचा किपगेन (भाजप – कुकी समुदाय)
उपमुख्यमंत्री २: लोसी डिखो (एनपीएफ – नागा समुदाय)
विशेष म्हणजे, नेमचा किपगेन यांनी नवी दिल्लीतील मणिपूर भवन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात सहभाग घेतला. याशिवाय भाजपचे गोविंदास कोंथौजम आणि एनपीपीचे खुरैजाम लोकेन यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी मुख्यमंत्री खेमचंद सिंह आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. “हे नवीन नेतृत्व मणिपूरच्या नागरिकांच्या विकास आणि समृद्धीसाठी समर्पित भावनेने काम करेल,” असा विश्वास पंतप्रधानांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला.
‘विकसित भारत २०४७’ मध्ये मणिपूरचा वाटा
शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री खेमचंद सिंह म्हणाले, “वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मोहिमेत मणिपूर महत्त्वाची भूमिका बजावेल.
तत्कालीन मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर १३ फेब्रुवारी २०२५ पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. गृह मंत्रालयाने आज अधिसूचना जारी करून ही राजवट अधिकृतपणे मागे घेतली आहे.
युमनाम खेमचंद सिंह हे इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सिंगजामेई मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी २०१७ ते २०२२ या काळात विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे, तसेच ते तायक्वांडोचे आंतरराष्ट्रीय खेळाडूही राहिले आहेत.