Friday, February 13, 2026

“अजितदादांची पोकळी भरून काढणे सहज शक्य नाही”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शाह यांचे भावूक ट्विट

Share

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या पश्चात उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतरचा सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असून, यावेळी एनडीएतील घटक पक्षांची एकजूट आणि भविष्यातील विकासाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या भेटीनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी एक भावूक ट्विट करत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अमित शाह यांचे ट्विट जसेच्या तसे:
“महाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जी यांची भेट झाली.

आपले सर्वांचे लाडके स्व. अजित पवार जी यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणे सहज शक्य नाही. परंतु, जनकल्याण आणि राज्याच्या विकासाचे त्यांचे स्वप्न साकार करणे हे आपल्या सर्वांचे सामायिक कर्तव्य आहे; ज्यामध्ये तुमचा संकल्प अत्यंत उपयुक्त ठरेल.”

पंतप्रधान मोदींशी ४० मिनिटे चर्चा; भाजप खंबीरपणे पाठीशी
सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. या बैठकीत जवळपास ४० मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केले की, “एनडीएचा एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) कायम आहोत.” तसेच उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना भाजप आणि केंद्र सरकार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मोदींनी दिली. यावेळी पंतप्रधानांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल पुन्हा एकदा शोक व्यक्त केला.

दिल्ली दौऱ्यावर राष्ट्रवादीची कोअर टीम
या महत्त्वाच्या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार सुनील तटकरे, प्रफुल पटेल, तसेच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार हेदेखील उपस्थित होते. या दौऱ्यामुळे अजितदादांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महायुतीचे संबंध अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पुढील वाटचाल आणि जबाबदारी
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात जी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याचे मोठे आव्हान सुनेत्रा पवार यांच्यासमोर आहे. मात्र, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गट अधिक आत्मविश्वासाने कामाला लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख