Monday, March 2, 2026

सिखलीगर समाजावरील ब्रिटिशांचे जाचक निर्बंध हटवले; बाबा हरनाम सिंग जी यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक

Share

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात राज्य समन्वय समितीचे मार्गदर्शक आणि दमदमी टकसालचे मुखी बाबा हरनाम सिंग जी यांनी महाराष्ट्र आणि पंजाब या दोन प्रांतांमधील शतकानुशतके चालत आलेल्या आध्यात्मिक व ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकला.

आध्यात्मिक नात्याचा इतिहास

बाबा हरनाम सिंग जी म्हणाले की, नागपूर आणि नांदेडनंतरचा हा तिसरा आणि सर्वात मोठा कार्यक्रम ऐतिहासिक उत्साहात पार पडत आहे. संत नामदेव महाराज आणि गुरु नानक देव जी यांच्या काळापासून हे दोन्ही प्रांत एका सूत्रात बांधलेले आहेत. संत नामदेव महाराजांच्या अभंगांना गुरु ग्रंथ साहिबमध्ये मिळालेले स्थान हे या नात्याचे सर्वोच्च प्रतीक आहे. तसेच, दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंग जी यांनी पंजाबमधून येऊन नांदेडच्या पावन भूमीवर वास्तव्य केल्यामुळे हे नाते अधिक घट्ट झाले आहे.

संस्कृतीचे रक्षण आणि बलिदान

“भारतीय संस्कृतीवर होणाऱ्या अन्यायाविरोधात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान हे जागतिक इतिहासातील महान घटना आहे. त्यांच्या या शहादतीमुळेच आज भारतीय संस्कृती आणि धर्म सुरक्षित आहे,” असे भावोद्गार त्यांनी काढले.

सिखलीगर समाजाला न्याय

यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयांचे कौतुक केले. विशेषतः, ब्रिटिश काळापासून सिखलीगर समाजावर लादलेले जाचक निर्बंध हटवून त्यांना सन्मानाचे आणि समानतेचे अधिकार मिळवून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, राज्यस्तरीय समनव्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह आदी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख