मुंबई : केंद्र शासनाच्या ‘पीएम-जनमन’ (PM-JANMAN) योजनेअंतर्गत राज्यातील सर्व, विशेषतः ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कातकरी आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री अशोक वूईके यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित एका विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत मंत्र्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. ज्या कातकरी बांधवांकडे स्वतःच्या हक्काच्या घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही, अशांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने ‘विशेष कार्य प्रणाली’ तयार करावी, जेणेकरून कोणताही बांधव योजनेपासून वंचित राहणार नाही.
कातकरी समाजाला घरकुलासाठी २ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ दिला जातो, ज्यामध्ये शौचालय निर्मितीचाही समावेश असतो. शहापूर तालुक्यातील काही बांधवांना अद्याप शौचालय आणि रोजगार हमी योजनेची (MGNREGA) रक्कम मिळालेली नाही, ही बाब समोर येताच मंत्र्यांनी संबंधित विभागाला ही कार्यवाही तत्परतेने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
“समस्त कातकरी समाजासाठी मिळणारे लाभ विहित कालावधीत न मिळाल्यास, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल,” असेही मंत्री वूईके यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीला आमदार श्रीमती उमा खापरे, निरंजन डावखरे, स्नेहा दुबे, अप्पर आदिवासी आयुक्त गोपीचंद कदम आदिवासी विकास विभागाचे सहसचिव श्री शेळके, ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तर आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि माजी आमदार विवेक पंडित यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग घेतला.