Wednesday, March 18, 2026

राष्ट्रहितासाठी सर्व समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज – देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव

Share

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे केवळ संख्यात्मक वाढ नसून, ती समाजातील गुणवत्ता वृद्धी आणि राष्ट्रकार्यासाठी सज्जन शक्तीचे संघटन आहे. हरियाणातील समालखा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पार्श्वभूमीवर, देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिलजी भालेराव यांनी पत्रकार परिषदेत संघाच्या वाढत्या कार्याचा आणि आगामी योजनांचा सविस्तर आढावा सादर केला.

गेल्या वर्षभरात संघाच्या कार्यात मोठी झेप पाहायला मिळाली आहे. देशभरात शाखांची संख्या ६ हजारांनी वाढून आता ती ८८ हजारांच्या पुढे गेली आहे. ५५ हजारहून अधिक स्थानांवर संघाचे कार्य प्रत्यक्ष पोहोचले आहे. “हिंदुत्व ही केवळ एक विचारधारा नसून ती एक श्रेष्ठ जीवनशैली आहे, जी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ‘पंच परिवर्तन’ उपक्रमाद्वारे राबवली जात आहे,” असे भालेराव यांनी नमूद केले.

देवगिरी प्रांतात १२ लाख कुटुंबांशी संवाद

खान्देश आणि मराठवाडा मिळून असलेल्या देवगिरी प्रांतात राबविलेल्या ‘गृह संपर्क’ अभियानाचे यश अधोरेखित करताना ते म्हणाले की, पहिल्या टप्प्यात २१ दिवसांत तब्बल १२ लाख ९१९ कुटुंबांपर्यंत आणि ६,६४८ गावांपर्यंत स्वयंसेवक पोहोचले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि वस्तीगृहात राहणाऱ्या तरुणांशीही संवाद साधला जात असून, लवकरच अभियानाचा दुसरा टप्पा सुरू होईल.

संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी एप्रिल महिन्यापासून प्रत्येक तालुक्यात ‘सामाजिक सद्भाव’ बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेषतः जनजाती आणि भटके-विमुक्त समाजातील सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासाठी आणि त्यांच्यात वैचारिक स्पष्टता निर्माण करण्यासाठी ‘चेतना परिषदा’ घेतल्या गेल्या. नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या या परिषदांमध्ये ३८ विविध समाजांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला, ज्यांना भैय्याजी जोशी आणि पद्मश्री चैत्राम पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

आगामी काळात संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या प्राकट्य वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या बलिदान वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमांच्या यशाची माहितीही त्यांनी दिली. देवगिरी प्रांतात सध्या ५१७ दैनिक शाखा आणि ४४ उपक्रमशील शाखा कार्यरत असून, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि संस्कारांवर विशेष भर दिला जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख