मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. भारताने या संकटसमयी इराणच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आंबेडकर म्हणाले की, जेव्हा जेव्हा काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर किंवा संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) उपस्थित झाला, तेव्हा इराणने नेहमीच भारताची बाजू घेतली आहे. जगातील इतर देशांचे प्रमुख प्रत्येक मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडतात, परंतु भारत सरकार आपले मत ठामपणे मांडण्यात अपयशी ठरत आहे. मोदी-शहा यांच्या जोडीने हे लक्षात घेतले पाहिजे की, या कठीण काळात भारताची जनता इराणसोबत आहे.
भारताने इस्रायलशी असलेले संबंध तोडावेत असे जनता म्हणत नाही; मात्र अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणवर जे हल्ले करत आहेत, त्या काळात भारताने आपल्या जुन्या व विश्वासू मित्राला मदत केली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंबेडकर पुढे म्हणाले की, ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ (Strait of Hormuz) मार्ग सुरक्षित ठेवून इराणकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास, सध्या महागाईमुळे बिघडलेले सामान्य कुटुंबांचे बजेट पुन्हा पूर्वपदावर आणणे शक्य होईल.
दरम्यान, काश्मीर मुद्द्यावर इराणने भारताला पाठिंबा दिल्याचा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे, असे भाजपने पूर्वीच म्हटले होते. याबाबत भारताची भूमिका स्पष्ट असून काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे, ज्यावर भारताला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही, हे केंद्र सरकारने म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला इंधन सुरक्षेवरून जागतिक संकटांच्या काळात मोदी सरकारने भारतीय नागरिकांना आणि अर्थव्यवस्थेला कधीही इंधन टंचाई भासू दिली नाही. उलटपक्षी रशिया-युक्रेन युद्धात किंवा पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावात भारताने आपले हितसंबंध जपले होते. मात्र, हेही आंबेडकरांना मान्य नाही.
आता १ ऑक्टोबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनसमोर जनआंदोलन पुकारण्यात आले आहे.
Share
अन्य लेख