Thursday, September 17, 2026

हेट स्पीच : शब्दांवर आक्षेप, वास्तवावर मौन

Share

कुठल्यातरी आधी घडून गेलेल्या घटनेवर आपली तीव्र प्रतिक्रिया किंवा संताप व्यक्त करत असताना एखाद्या हिंदू बांधवाने केलेल्या संतापयुक्त वक्तव्याची गणना सरसकट  हेट स्पीच किंवा द्वेषपूर्ण भाषण अशी करणे हे समाजाचा मोठा भाग असणाऱ्या हिंदू समुदायासाठी घटक ठरणारे आहे. मुळातच जो विविध अन्य धर्मियांच्या अत्याचारांना शतकानुशतके बळी पडत आला आहे, त्याच्यावरच अत्याचारी असल्याचे आरोप करणे हा अजब न्याय सध्या सर्वत्र सर्रास लावला जातो आहे. त्याचा धावता आढावा घेणारा लेख.    

सहसा कोणतीही तीव्र प्रतिक्रिया न देणारा समाजातील एखादा समूह जेव्हा एखादी गोष्ट अथवा घटनेविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करू लागतो, तेव्हा लगेच त्यावर हेट स्पीच अशी लेबले लावण्यापेक्षा तशी प्रतिक्रिया देणे का आवश्यक झाले असेल याचा विचार करणे समाजाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असते. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी कॉँग्रेस चे आमदार संग्राम जगताप तसेच धवलसिंह मोहिते पाटील, सागर बेग आणि पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्यावर   सीजेपी म्हणजेच सिटीझन्स फॉर जस्टीस अँड पीस नावाच्या एक संस्थेने हेट स्पीच या मुद्यावरून तक्रारी दकाहल केल्याच्या निमित्ताने या मुद्द्यावर साकल्याने विचार होणे गरजेचे आहे. मुंबई, गेवराई, परतूर आणि शेवगाव या ठिकाणी झालेल्या भाषणांच्या संदर्भात ही तक्रार झालेली असून या प्रत्येकाचे उद्गार आणि भारतीय न्याय संहितेनुसार त्यावर लागू होणाऱ्या कलमांचा उल्लेख त्यामध्ये केला गेला आहे.    

आपला छुपा अजेंडा समाजात पसरवून सामाजिक समतोल आणि शांतता बिघडवण्यासाठी लोकशाही मार्गांचाच गैरवापर करण्याची डाव्यांची क्लृप्ती नवी नाही. सिटीझन्स फॉर जस्टीस अँड पीस ही देखील अशाच कामांसाठी कार्यरत असणारी एक संघटना असून, लव्ह जिहाद, लँड जिहाद अशासारखे भाषणात शब्द वापरल्याबद्दल त्यांनी वरील काही व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची मागणी करत तक्रार दाखल केली आहे.

Cjp कोण आहे?

२००२ मधील गुजरात हिंसचारानंतर तेथील तथाकथित दंगलपीडितांना मदत करण्यासाठी मुंबई येथे स्थापन झालेली ही संस्था आहे. तिच्या संकेतस्थळावर लिहिलेल्या माहितीनुसार अल्पसंख्यांकांचे हक्क, भाषण स्वातंत्र्य, बालहक्क, शिक्षणंधिकार आणि कायदे सुधारणा या क्षेत्रांमध्ये ती कार्यरत आहे. संविधानप्रणित हक्कांचे संरक्षण, धर्मनिरपेक्षता आणि भारताची विविधता या गोष्टींचे संरक्षण करणे हा त्यांचा उद्देश असल्याचे दिसून येते. मात्र २००२ च्या दंगली उसळण्याचे मुख्य कारण लक्षात घेण्याची आवश्यकता यांना वाटलेली दिसत नाही. गोध्रा येथे कारसेवकांच्या रेल्वेला याच अल्पसंख्यांकांनी लावलेल्या आगीत जळून मृत्युमुखी पडलेल्या कारसेवकांचे हक्क आणि आक्रोश यांच्यादृष्टीने महत्वाचे नाहीत. ही यातली खरी मेख आहे. आणि आता हीच cjp पुन्हा एकदा लव्ह जिहाद सारख्या अत्यंत धोकादायक आणि हीन दर्जाच्या कृतींवर सोयीस्कर मौन बाळगत त्याविषयी बोलणाऱ्या व्यक्तींची तक्रार करण्यात मात्र पुढाकार घेत आहे.     

CJPने महाराष्ट्रातील विविध हिंदुत्ववादी सभांमधील गोपीचंद पडळकर, धवलसिंह मोहिते-पाटील, संग्राम जगताप, सागर बेग, संग्राम बापू आणि पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या वक्तव्यांविरोधात तक्रारी केल्या आहेत. या भाषणांमध्ये कथित ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, धार्मिक तेढ, मुस्लिम समाजाला भारत सोडण्याचे आवाहन, हिंसेच्या धमक्या, कुटुंबांना लक्ष्य करणे, घटनात्मक व धर्मनिरपेक्ष मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि सार्वजनिक हिंसेला प्रोत्साहन देणारी वक्तव्ये केल्याचा आरोप तक्रारीत आहे. भारतीय न्याय संहितेनुसार या प्रकरणांची चौकशी व कारवाई करण्याची मागणी CJPने केली आहे. चारही तक्रारींमध्ये CJPने पोलिस आणि संबंधित प्रशासनाला भाषणांची चौकशी करून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Cjp चा ‘सिलेक्टीव्ह नॅरेटीव्ह’

मुळातच यातले कोणतेही वक्तव्य जारी विचारार्थ घेण्याचे ठरवले तरी त्यामागील उद्देश तपासून पाहताना समोर येणारे वास्तव पूर्ण वेगळे असल्याचे दिसून येईल. तरुण सुशिक्षित मुलींना फसवून लग्न करून किंवा लैंगिक अत्याचार करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याच्या घटना, सर तन से जुदा ही घोषणा आणि उदयपूरमध्ये २०२२ मध्ये घडलेली घटना अशा विविध गोष्टींचा उद्रेक या अशा वक्तव्यांच्या मुळाशी आहे याचा सहज अंदाज येतो. असे असतानाही, ज्या मुख्य घटनेवर पुढील प्रतिक्रिया येतात ती मूळ घटना सोयीस्करपणे बाजूला सारली जाते आणि त्यावरील प्रतिक्रिया हीच मुख्य समस्या असल्याचे भासवून समाजमनाची दिशाभूल करण्याचे हे प्रयत्न निंदनीय आहेत.     

अगदी २००२ मध्ये स्थापना झाल्यापासून cjp ने वेचकपणे हिंदू समर्थक घटना, प्रतिक्रिया आणि वक्तव्ये उचलून त्यांना हिंसा किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न असा रंग देण्याचे प्रयत्न चालवले आहेत. मात्र या प्रत्येक प्रतिक्रियेच्या मुळाशी असणारे मूळ कारण विचारात घेणे त्यांना एकदाही आवश्यक वाटलेले नाही. लव्ह जिहाद या संकल्पनेचा उल्लेख करणे हे त्यांना द्वेषकारक वाटते, मात्र त्यापायी हकनाक बळी गेलेल्या कित्येक निष्पाप आणि कोवळ्या हिंदू तरुणी आणि त्यांचे उद्ध्वस्त आयुष्य, कोलमडलेली कुटुंबे यांच्या मानवाधिकारची चिंता करावी असे cjp ला वाटत नाही. धर्माच्या नावाखाली आजवर झालेल्या अनेक दंगली,  कत्तली यांमध्ये मारल्या गेलेल्या हिंदू तरुणांच्या मृत्यूविरोधातही हिंसाचार म्हणून आवाज उठवावा असे त्यांना वाटत नाही.

सर तन से जुदा ही मूळ घोषणा हिंसेला किंवा धार्मिक द्वेषाला पूरक नसते, मात्र तिचा उल्लेख भाषणात करणे म्हणजे धार्मिक हिंसेला चिथावणी देणे आहे किंवा धमकी देणे आहे असा आरोप हे बिनधास्त करू शकतात. यातच त्यांच्या दुटप्पीपणाची साक्ष पटण्यास प्रत्यवाय नाही.

हेट स्पीच किंवा द्वेषपूर्ण व्यक्तव्यांचे समर्थन करणे योग्य नाहीच. परंतु समाजात निर्माण झालेल्या या धार्मिक अस्वस्थतेचे मूळ शोधण्याचे बाजूला ठेवून किंवा त्या मूळ कारणकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ प्रतिक्रियाच कशी चुकीची आहे अशी भूमिका घेणे सामाजिक स्वास्थ्यासाठी फारसे हितावह नाही.  द्वेषपूर्ण भाषणाविरोधातील कारवाईला विरोध करण्याचा प्रश्न नाही; प्रश्न आहे तो कसोटीचा आणि तिच्या समान वापराचा. समाजातील एखाद्या घटकाविषयी केलेले वक्तव्य कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरत असेल, तर तीच चौकट प्रत्येक वक्तव्याला समानपणे लागू झाली पाहिजे. कारण लोकशाहीत केवळ शब्दांवर कारवाई करून प्रश्न संपत नाहीत; त्या शब्दांमागे निर्माण झालेली अस्वस्थता, त्यांचा संदर्भ आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक प्रश्न यांचाही विचार करावा लागतो. अन्यथा ‘द्वेषपूर्ण भाषण’ रोखण्याच्या प्रयत्नात मुळातील प्रश्नांवर चर्चा करण्याची लोकशाहीची जागाच संकुचित होण्याचा धोका निर्माण होतो.

मैत्रेयी जोशी

अन्य लेख

संबंधित लेख