आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येतं, भारत या भूमीत प्रत्येक ठिकाणी एक वेगळीच गोष्ट दडलेली आहे. एखादा जुना किल्ला असेल, एखादं शांत मंदिर असेल किंवा हिमालयातली एखादी वाट असेल — हे सगळं आपल्या आजूबाजूला, शतकानुशतके तसंच उभं आहे. फक्त ते बघण्याची नजर हवी, आणि ते इतरांना दाखवण्याची इच्छा हवी. सप्टेंबर 2026 मध्ये झालेल्या ‘युद्ध अभ्यास’ या भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सरावानं नेमकं हेच केलं.
हा सराव उत्तराखंडच्या औलीत आणि राजस्थानच्या महाजन भागात एकाच वेळी झाला — एका बाजूला बर्फाळ डोंगर, दुसऱ्या बाजूला तापलेलं वाळवंट. भारत-अमेरिकेचे मिळून जवळपास सातशे सैनिक तीन आठवडे एकत्र होते, तेही भारताच्या दोन अतिशय संवेदनशील सीमांजवळ. लढाईचं प्रशिक्षण, संयुक्त कवायती, हे सगळं नेहमीसारखं झालंच. पण या वेळी त्यापलीकडे जाऊन काहीतरी वेगळं घडलं. या सैनिकांनी बंदुका बाजूला ठेवून काही दिवस भारत अधिक जवळून अनुभवला.

या सरावादरम्यान तीन ठिकाणी स्थलभेट आयोजित केली गेली होती. यासाठी निश्चित झालेल्या स्थानांची निवडच मुळात खूप बोलकी आहे. पहिलं ठिकाण म्हणजे बिकानेरचा जुनागढ किल्ला. इथे फिरताना सैनिकांना राजस्थानच्या राजेशाही इतिहासाची, तिथल्या भव्य वास्तुकलेची ओळख झाली. बदल महाल, राणीवास, जुन्या तोफा — हे सगळं पाहून अमेरिकन जवान अगदी थक्क झाले, असं वृत्तांतांत सांगितलं आहे. मार्गदर्शकांनी त्यांना किल्ल्याचा इतिहास, तिथल्या राजांच्या शौर्यकथा उलगडून सांगितल्या. इतिहासात भारतीय शौर्याचा मूर्तीमंत आविष्कार जिथे झाला त्या राजस्थानची भूमीचा इतिहास त्यांनी समजून घेतला .
दुसरं ठिकाण म्हणजे हिमालयातलं पवित्र बद्रीनाथ मंदिर. इथे मात्र गोष्ट फक्त बघण्याची नव्हती. सैनिक तिथल्या सांस्कृतिक उत्सवात सहभागी झाले, ‘देवभूमी’तल्या जुन्या परंपरा त्यांनी जवळून अनुभवल्या. हा अनुभव किल्ल्याच्या भेटीपेक्षा खूपच वेगळा होता. तिथे इतिहास बघायचा होता, इथे मात्र एका जिवंत श्रद्धेत सामील व्हायचं होतं. आणि तिसरं ठिकाण म्हणजे गोरसों बुग्याल, जिथे कोणतीही वास्तू नाही, कोणतं मंदिरही नाही. फक्त निसर्ग. इथे सैनिकांनी ट्रेकिंग केलं आणि हिमालयाचं रांगडं, निर्भेळ सौंदर्य जवळून पाहिलं.
गंमत म्हणजे ही तिन्ही ठिकाणं भारताचे तीन वेगळे चेहरे दाखवतात. जुनागढ किल्ला इतिहासाचा चेहरा दाखवतो, बद्रीनाथ श्रद्धेचा आणि परंपरेचा, तर गोरसों बुग्याल निसर्गाचा. या तिन्ही जागी फिरताना सैनिकांना एक गोष्ट नक्की कळली असेल — भारत हा एका साच्यात बसणारा देश नाही. इथे इतिहासही तितकाच जिवंत आहे, श्रद्धाही तितकीच खोल आहे, आणि निसर्गही तितकाच भव्य आहे. आणि या तिन्ही गोष्टी एकमेकांना छेद न देता, उलट एकमेकांना पूरकच ठरतात.किंबहुना हीच श्रद्धा आणि हाच समृद्ध भूप्रदेश जिला भारतीय माताभावाने पाहतात त्यांच्या रक्षणासाठीच भारतीय शौर्याचा आविष्कार वर्षानुवर्षे होत आला आहे. शौर्य, भक्ती आणि समृद्धी यांना जोडणारा हा धागा त्या अमेरिकन सैनिकांना जाणवला असेल का?
या एका सरावाच्या निमित्ताने, अवघ्या काही आठवड्यांत, या सैनिकांनी जो भारत पाहिला, तो कदाचित अनेक वर्षं भारतात राहणाऱ्यांनाही इतक्या सलगपणे कधी अनुभवायला मिळाला नसेल.
आणि म्हणूनच ही निवड सगळ्यात वेगळी ठरली आहे. वाळवंट आणि हिमालय, हे दोन अगदी टोकाचे प्रदेश, एकाच सरावात एकत्र आले, आणि दोन्हीकडे वेगळी पण तितकीच समृद्ध संस्कृती सापडली. यातून एक साधी गोष्ट लक्षात येते की भारताची सांस्कृतिक श्रीमंती एका ठिकाणी बंदिस्त नाही, ती प्रत्येक प्रदेशानं आपापल्या पद्धतीनं जपली आहे. आणि हेच टिचे खरे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती म्हणजे फक्त दिल्लीभोवतीचा ताजमहालसदृश परिसर नाही, हे आपल्याला माहीत असतं, पण जगाला हे खरंखुरं किती वेळा दाखवलं जातं? आपल्या नजरेआड, कितीतरी किल्ले, मंदिरं, डोंगर-दऱ्या शतकानुशतके तशाच उभ्या आहेत. प्रश्न फक्त इतकाच असतो, की आपण त्यांच्याकडे किती डोळसपणे पाहतो आणि तितक्याच डोळसपणे जगाला दाखवतो की नाही.

‘युद्ध अभ्यास 2026’ मधली ही तीन ठिकाणांची भेट याच कारणासाठी महत्त्वाची ठरते. जुनागढ, बद्रीनाथ, गोरसों बुग्याल, ही काही नव्यानं बांधलेली आकर्षणं नाहीत, ती गेली कित्येक वर्षे इथेच आपल्या आजूबाजूला होती. आपल्या रोजच्या आयुष्याच्या अगदी जवळ. फक्त यंदा जाणीवपूर्वक निवडून ती जगासमोर आणली गेली. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात येत जाते, की आपण जो आणि जितका भारत दाखवायचं ठरवू, तसा आणि तितकाच जगाला दिसणार आहे. मग तो जितका वैविध्यपूर्ण दाखवला जाईल, तितकीच त्याची खरी ओळखही जगासमोर उलगडत जाईल.
शेवटी एवढंच म्हणता येतं, की किल्ल्याचे दगड, मंदिरातली जिवंत श्रद्धा आणि शांत तरीही भव्य निसर्गात सामावून राहिलेली प्रगाढ शांतता हाच खरा भारत आहे. त्याचे दर्शन घडवून केवळ काही स्थानांमध्ये बंदिस्त केली गेलेली भारतीय संस्कृती यानिमित्ताने मोकळी होत आहे.
-मैत्रेयी जोशी