एक बाजूला मराठी साहित्याचा सुवर्णकाळ ज्यांच्या नावाभोवती रेंगाळतो, ज्यांनी महाराष्ट्राला निर्मळ, सुसंस्कृत आणि सात्त्विक विनोदाची अमूल्य देणगी दिली, त्या भाईंचा—म्हणजेच पु. ल. देशपांडे यांचा १२ जून हा स्मृतिदिन! आणि नेमक्या याच काळात, दुसरीकडे एक मराठी तरुण एका तथाकथित कॉमेडी शोच्या माध्यमातून अश्लीलतेचा, बीभत्सतेचा आणि थिल्लरपणाचा डोस महाराष्ट्राला पाजत आहे. हा केवळ योगायोग नाही, तर आपल्या सांस्कृतिक अधोगतीचा क्लेशदायक असा दस्तऐवज आहे. पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी यांनी ज्या विनोदाला वैचारिक उंची दिली, माणसाच्या जगण्यातील विसंगतीवर बोट ठेवून हसवायला शिकवले, त्याच महाराष्ट्राचे नाव लावणारा प्रणित मोरे नावाचा तरुण आज ‘विनोद’ या शब्दाची नीच पातळी गाठत आहे. अलीकडेच, गुडगाव येथे शूट झालेल्या मोरे याच्या शोमध्ये जे काही बोलले गेले, ज्या पद्धतीने मांडले गेले, ते निषेधार्ह तर आहेच; पण त्याहूनही भयंकर म्हणजे हा प्रकार मनोरंजन म्हणून समाज नावाचा घटक उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानांनी पचवून घेतो आहे! विशेष म्हणजे, त्याच्या शोचे व्हिडिओ यू ट्युबवर पडतात, तेव्हा त्याला ४० ते ५० लाख प्रेक्षक मिळतात. हा समाजाचा दुटप्पीपणाच आहे. एकीकडे, अशा कार्यक्रमांवर टीका करायची आणि दुसरीकडे लाखो लोकांनी हे बीभत्स शो पाहायचे, याला काय अर्थ आहे? या साऱ्या प्रकरणाला अनेक पदर आहेत. हा केवळ एका शोचा किंवा काही कलाकारांचा प्रश्न नाही, तर हा संपूर्ण समाजाच्या बिघडत्या मानसिकतेचा किळसवाणा नमुना आहे.
सुशिक्षित विकृती आणि पैशाचा नंगानाच
या शोमधील सर्वांत धक्कादायक आणि विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे, यात अश्लीलतेचा आणि वाह्यातपणाचा कळस गाठणारे लोक कोण आहेत? समाजातील सुशिक्षित घटक! यामध्ये डॉक्टर पदवी घेतलेली एक मुलगी ज्या पद्धतीने गलिच्छ आणि वाह्यात भाषा वापरत होती, ते पाहून सुसंस्कृतपणाची व्याख्याच बदलून जाते की काय, अशी भीती वाटावी. शिक्षण माणसाला सुसंस्कृत बनवते की अधिक चाणाक्षपणे विकृत बनायला शिकवते, असा प्रश्न पडतो. ज्या डॉक्टरी पेशाला समाजात देवाचे रूप मानले जाते, त्या पेशातील तरुण पिढी जर अशा मंचावर येऊन केवळ चार टाळ्या आणि काही व्ह्यूजसाठी स्वतःची जीभ आणि नैतिकता गहाण ठेवत असेल, तर आपली शिक्षणपद्धती निश्चितच चुकते आहे.
तसेच, त्या मंचावर एका महिलेला बिर्याणी खाऊ घालणारा तो पुरुष आणि त्याच्याभोवती फिरणारे ते अश्लील संवाद… हे सगळे पाहिल्यावर प्रश्न पडतो की, आपण नेमके चाललोय कुठे? विनोदाच्या नावाखाली लैंगिक श्लेष, अश्लील अंगविक्षेप आणि ओंगळवाणी भाषा वापरून जर ‘कॉमेडी’ सिद्ध करायची असेल, तर मग कलेची आणि संस्कृतीची गरजच काय उरली? ही सुशिक्षित विकृती अधिक धोकादायक आहे. कारण हिला स्वतःच्या कृत्याची ना लाज आहे ना खंत; उलट या विकृतीचे ‘ग्लोरिफिकेशन’ केले जात आहे.
प्रगल्भ विनोदाची समृद्ध परंपरा
आजच्या या वाह्यात आणि सवंग विनोदाच्या पार्श्वभूमीवर आपण मागे वळून पाहतो, तेव्हा भारतीय आणि विशेषतः मराठी विनोदाची परंपरा किती विशाल, प्रगल्भ आणि सुसंस्कृत आहे, याची जाणीव होते. विनोद म्हणजे केवळ दोन लैंगिक, विकृत शब्द फेकून प्रेक्षकांना ओशाळवाणे हसविणे नव्हे, तर विनोद म्हणजे मानवी स्वभावातील विसंगतीवर मारलेली हळुवार फुंकर असते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात अशा अनेक विभूती होऊन गेल्या ज्यांनी आपल्या लेखणीने आणि कुंचल्याने समाजमनाचा ठाव घेतला, पण कधीही अश्लीलतेचा आसरा घेतला नाही.
भारतातील व्यंगचित्रकलेचे आणि विनोदाचे भीष्माचार्य आर. के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’चे उदाहरण घ्या. लक्ष्मण यांनी सात दशके राजकारणावर, समाजकारणावर आणि गरिबीवर तीक्ष्ण भाष्य केले. त्यांच्या व्यंगचित्रात कधीही वाह्यात भाषा नव्हती. कुणावर वैयक्तिक चिखलफेक नव्हती. केवळ एका सामान्य माणसाच्या कोटवर ठिगळ लावून आणि त्याच्या चेहऱ्यावरील केविषवाणे भाव दाखवून त्यांनी देशातील विसंगती अनेक दशके वेशीवर टांगली. तीच गोष्ट ‘बिझी बी’ (Busy Bee) म्हणजेच प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक बहराम कॉन्ट्रॅक्टर यांची! त्यांच्या ‘राउंड अँड अबाऊट’ या स्तंभाने मुंबईच्या आणि देशाच्या जगण्यातील विसंगतीवर जो खुसखुशीत आणि निर्विष भाष्य केले, त्याची तोड आजच्या एकाही स्टँड-अप कॉमेडियनला नाही. बिझी बी यांनी आपल्या कुत्र्याच्या, म्हणजेच ‘बोलक्या बॉक्सर’च्या माध्यमातून नागरी समस्यांवर आणि मानवी स्वभावावर जो विनोद केला, ते वाचताना माणूस अंतर्मुख होत असे. हा विनोद बुद्धीला चालना देणारा होता, माणसाला सुसंस्कृत बनवणारा होता, कोणाचीही अब्रू वेशीवर टांगणारा नव्हता.
निर्विष विनोदाची साहित्यिक आणि नाट्यपरंपरा
मराठी साहित्याचा आणि नाटकाचा इतिहास तर अशा निर्मळ विनोदाने रसरसलेला आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी ‘साष्टांग नमस्कार’ किंवा ‘तो मी नव्हेच’ सारख्या नाटकांतून जो विनोद निर्माण केला, तो समाजातील ढोंगीपणावर प्रहार करणारा होता. अत्र्यांची भाषा कडक आणि धारदार असायची, पण त्यात कधीही अश्लीलतेचा बाजार नसायचा. चिं. वि. जोशी यांनी निर्माण केलेली ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ ही दुक्कल मराठी माणसाच्या मनात आजही घर करून आहे. चिमणरावांचे मध्यमवर्गीय जगणे आणि त्यांच्या साधेपणातून निर्माण होणारा विनोद कौटुंबिक आणि आजही घरातल्या सर्व पिढ्यांनी एकत्र बसून वाचावा असा आहे.
मराठी नाटकांच्या सुवर्णकाळात लोकनाट्यांनीही मनोरंजनाचा स्तर राखला. ‘झोपी गेलेला जागा झाला’ किंवा ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या नाटकांतून ‘फार्स’चा (प्रहसनात्मक विनोद) पाया घातला. यात पात्रांची धावपळ असायची, गोंधळ असायची, पण संवाद नेटके आणि कौटुंबिक असायचे. प्रेक्षक नाटकाला सहकुटुंब जात. त्यांना खात्री असे की रंगमंचावर त्यांच्या संस्कृतीचा अपमान होणार नाही आणि मान खाली घालावी लागणार नाही.
चित्रपटांमधील सुवर्णकाळ
साहित्याकडून चित्रपटांकडे वळलो, तर मराठी आणि हिंदी चित्रपटांनी तर निर्विष विनोदाचा मोठा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या त्रिमूर्तीने मराठी चित्रपटाला जी सुसंस्कृती दिली, ती आजही वंदनीय आहे. ‘लाखाची गोष्ट’ किंवा ‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटांमधील विनोद पाहताना मन प्रसन्न होते. राजा गोसावी, शरद तळवलकर आणि धुमाळ आदींच्या अभिनयाने सजलेले अनेक चित्रपट म्हणजे कौटुंबिक मनोरंजनाचा सुवर्णकाळ होता.
मराठीतल्या एकाही विनोदवीराने स्टँड अप कॉमेडीच्या नावाखाली प्रणित मोरेसारखा बीभत्स धिंगाणा कधी घातला नाही. त्याच्या त्या प्रयोगांमधली भाषा शिसारी आणणारी आणि मानवी नात्यातल्या साऱ्या गोडव्याची चिंध्या करणारी असते. आपण इथे जे अश्लील, बीभत्स बोलतो, ते आपले पालक, नातलग, शिक्षक बघत असतील, याची या तरुण-तरुणींना लाज कशी वाटत नाही, याचे नवल वाटते. दादा कोंडके यांचा विनोदही बरेच स्वातंत्र्य घेणारा होता. पण त्यातही बीभत्सता आणि विकृत शारीर उल्लेख नसत. लैंगिक स्वैराचाराचे उघड समर्थन हे या शोचे एक वैशिष्ट्य आहे. यातून तरुणांसाठी काय संदेश जातो?
सोशल मिडियाचा नंगानाच
सध्या सोशल मिडियावर काय वाट्टेल ते बोलायचे, वाट्टेल तसे नाचायचे आणि वाट्टेल ते दाखवायचे, याला ऊत आला आहे. कुणाचे कुणावर काही नियंत्रणच राहिलेले नाही. पूर्वी माध्यमांचा इतका विस्फोट झाला नव्हता. मात्र, तेव्हा मराठी आणि हिंदी सिनेमांनी आपली मर्यादा पाळली होती. मराठीतील अनेक दिग्गजांप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतही ऋषिकेश मुखर्जी यांनी ‘गोलमाल’, ‘चुपके चुपके’, ‘खट्टा मीठा’ या चित्रपटांतून जो ‘मिडल क्लास कॉमेडी’चा ब्रँड निर्माण केला, तो आजही मैलाचा दगड मानला जातो. उत्पल दत्त आणि अमोल पालेकर यांच्यातील संवादफेक, भाषेचा चुकीचा वापर यातून निर्माण होणारा तो सुजाण विनोद आजच्या डिजिटल युगातील लेखकांना का जमत नाही, हाच मोठा प्रश्न आहे. तसे जमले नाही की मग फक्त अश्लीलता, बीभत्स विनोद आणि सतत कमरेखालचे बोलणे.. यातून आपल्या साऱ्या समाजाची वाटचाल कुणीकडे जाते आहे? मोरेच्या बीभत्स शोकडे आणि त्यात वाह्यात बोलणाऱ्या डॉक्टर मुलीकडे आपण पाहतो, तेव्हा असे वाटते की आपल्या सांस्कृतिक वैभवाचे हे वाळवंट कधी झाले? ज्या भूमीत पुलंच्या चितळे मास्तरांनी किंवा अंतू बर्व्यांनी मराठी माणसाला अश्रू पुसता पुसता हसायला शिकवले, त्याच भूमीतले नाव लावणारा एक तरुण आज केवळ चार टाळ्यांसाठी स्वतःची नैतिकता का विकत असावा?
कायद्याची कोंडी आणि पळवाटांचा बाजार
आता प्रश्न असा निर्माण होतो की, अशा विकृत प्रयोगांना कायदेशीर लगाम कसा लावायचा? भारतीय न्याय संहितेत आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यात (IT Act) अश्लीलतेच्या विरोधात कायदे आहेत. परंतु, या स्टँड-अप कॉमेडी शोचे निर्माते आणि कलाकार कायद्याच्या पळवाटा शोधण्यात पटाईत असतात. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ (Freedom of Expression) या पवित्र शब्दाचा ढाल म्हणून वापर केला जातो. ‘आम्ही प्रौढांसाठी (Adults Only) कार्यक्रम करतो,’ अशी पाटी लावून हे लोक स्वतःला कायद्याच्या कचाट्यातून सोडवून घेतात.
परंतु, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, याचे भान कायद्याने यांना करून देण्याची वेळ आली आहे. चित्रपट आणि दूरदर्शन वाहिन्यांसाठी जशी ‘सेन्सॉर बोर्ड्’ असतात, तशीच बंधने डिजिटल मंच, यूट्यूब आणि स्टँड अप कॉमेडीसाठी लागू करण्याची नितांत गरज आहे. आज अशा शोवर कायदेशीर बंधने आणायची असतील, तर केवळ ‘अश्लीलता’ या शब्दाची जुनी व्याख्या पुरेशी नाही. ‘सार्वजनिक नैतिकता’ आणि ‘सांस्कृतिक प्रदूषण’ यांची दखल घेऊन कायद्याची कडक पुनर्रचना करावी लागेल. जोपर्यंत अशा विकृत शोच्या निर्मात्यांना आणि कलाकारांना तुरुंगाची हवा खावी लागत नाही, तोपर्यंत डिजिटल विश्वातील हा उच्छाद थांबणार नाही.
अश्लीलतेचे राष्ट्रीयीकरण
या अश्लीलतेचे मूळ कुठेतरी हिंदीतील ‘कपिल शर्मा शो’सारख्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांमध्ये दडले आहे. या व अशा इतर प्रयोगांनी कौटुंबिक मनोरंजनाचा मुखवटा घालून अश्लीलतेचे आणि द्विअर्थी संवादांचे पद्धतशीर राष्ट्रीयीकरण केले. महिलांच्या शरीरावर विखारी आणि हिणकस टिप्पण्या करणे, नवऱ्याने बायकोला तुच्छ लेखणे, शारीरिक व्यंगावर हसणे आणि दोन अर्थ निघणारे संवाद फेकून प्रेक्षकांना हसवायचा प्रयत्न करणे-हाच पॅटर्न आता सगळीकडे कॉपी केला जात आहे. कपिल शर्माला मिळणारा अफाट टीआरपी आणि पैसा पाहून देशभरातल्या छोट्या-मोठ्या कलाकारांना वाटते की, ‘अश्लीलता’ हाच यशाचा सर्वांत सोपा महामार्ग आहे. या हिंदी शोच्या प्रभावातूनच असंख्य ‘मोरे’ जन्माला येत आहेत. ते उघडपणे संस्कृतीची लक्तरे वेशीवर टांगत आहेत.
विकृतीचा अब्जावधीचा धंदा
या अश्लीलतेच्या मागे एक फार मोठा आर्थिक व्याप आणि विस्तार आहे. ही केवळ एका रात्रीची हौस नाही, तर हा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे.
- डिजिटल व्ह्यूज आणि मॉनिटायझेशन : यूट्यूब, इन्स्टाग्राम रील्स आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर जितकी जास्त खळबळजनक, अश्लील आणि वादग्रस्त क्लिप व्हायरल होईल, तितके जास्त व्ह्यूज मिळतात. या व्ह्यूजच्या जोरावर अल्गोरिदम त्यांना जास्तीत जास्त पैसे कमावून देतो.
- स्पॉन्सरशिप आणि ब्रँड एंडोर्समेंट : तरुणाई ज्या गोष्टींकडे आकर्षित होते, तिथे कंपन्या आपले पैसे लावतात. या शोच्या तिकिटांचे दर हजारांच्या घरात असतात. सुशिक्षित, कॉर्पोरेट आणि उच्चभ्रू वर्गातील तरुण वर्ग अशा शोची तिकिटे अगदी सहज खरेदी करतो.
- अल्गोरिदमची नशा : हा आर्थिक विस्तार इतका मोठा आहे की, कलाकारांना आणि निर्मात्यांना समाजाप्रती असणाऱ्या जबाबदारीची अजिबात चाड उरलेली नाही. त्यांना फक्त ‘एन्गेजमेंट’ आणि ‘क्लिक्स’ हवे आहेत. पैशाच्या या हव्यासापोटी संस्कृतीचा बळी जात आहे.
आत्मपरीक्षणाची गरज
आज पुलंच्या स्मृतीला उजळा देत असताना, मनोरंजनाच्या विश्वातील सर्वांनीच प्रामाणिक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आजचा विनोद माणसाला प्राण्यांच्या पातळीवर नेऊन ठेवत आहे. यावर कडक सामाजिक आणि कायदेशीर पावले उचलली नाहीत, तर येणारी पिढी पुलंचे ‘व्यक्ती आणि वल्ली’ विसरून या मोरे आणि कंपनीच्या वाह्यातपणालाच ‘मराठी संस्कृती’ मानू लागेल. अशा विकृत शोवर सामाजिक बहिष्कार टाकणे, त्यांचे आर्थिक मार्ग (स्पॉन्सर्स) रोखणे आणि डिजिटल विश्वात त्यांना मोठ्या प्रमाणावर ‘रिपोर्ट’ करणे गरजेचे आहे. भाषेची आणि विनोदाची ही नीच पातळीवर चाललेली घसरण जागरूक प्रेक्षकांनी खपवून घेता कामा नये!