Friday, September 11, 2026

बाब एल मांदेब चा पाडाव: आशियाचा तेल पुरवठा पुन्हा एकदा धोक्यात !

Share

इराण समर्थित शिया हौती बंडखोर गट अन्सर अल्ला या गटाने सौदी अरेबिया मधील बाब अल मांदेब या सामुद्रधुनीवर हल्ला करून ते ताब्यात घेतलें आहे. यामुळे मध्य पूर्वेतून अन्य जगाकडे होणारी खनिज तेलाची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. इस्राइल – इराण संघर्षाननंतर होरमुझच्या सामुद्रधुनी मधून होणारी तेलवाहतूक थांबल्यानंतर सौदी अरेबियातून होणारी तेल वाहतूक पर्शियन गल्फ मधील अबकाईक ते लाल समुद्रामध्ये असणाऱ्या सौदीच्या पश्चिम किनाऱ्यावरील यानबू बंदरामधून रेड सी मधील बाब आल मांदेब समुद्रधुनीमार्गे उत्तर अरबी समुद्रातून आशियाई बाजारपेठेमध्ये दाखल होत होती.
मात्र येमेनी बंडखोरांनी बाब आल मांदेब ताब्यात घेतल्यामुळे हा मार्गादेखील आता बंद झाला आहे. याआधी केलेल्या हल्ल्यात सौदीची होरमुझ टाळून जाणारी १२०० किमी लांबीची ईस्ट वेस्ट पाइपलाइन म्हणून ओळखली जाणारी प्रमुख पाईपलाईन ४ ते ५ ठिकाणी जाळून निकामी केली गेली आहे. तर दुसरीकडे जाझान येथील आरामको रिफायनरी जाळून निकामी केली आहे. परिणामी सौदीमधील तेलाचे उत्पादन आणि वाहतूक या दोन्ही गोष्टींवर प्रचंड मोठा आघात झाला असून त्यामुळे आपला तेलाचा व्यापार बसून पुन्हा १९९० च्या पातळीइतका कमी झाल्याचा दावा सौदीने केला आहे. या गोष्टीचा फटका सगळ्या जगाला बसणार आहे.
भारत देखील या तडाख्यातून सुटणार नाही. होरमुझ बंद झाल्यावर येथे दिसलेली इंधन दरवाढ, खनिज तेल आणि त्यासंबंधी उत्पादनांवर अवलंबून असणाऱ्या सर्व उद्योगधंद्यांना बसलेली झळ हे अनुभव लक्षात घेता, त्याहूनही मोठा फटका आता बसण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने इंधनाची थेट दर वाढ आणि कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या खतांची किंमत भरमससाठ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याची झळ महाराष्ट्रातील कृषी व अन्य औद्योगिक क्षेत्रास देखील बसणार आहे. आधीच अपुऱ्या पावसाने त्रस्त झालेल्या बळीराजची संकटे यामुळे अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सरकार कोणती पावले उचलून या समस्येला तोंड देते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

– मैत्रेयी जोशी

अन्य लेख

संबंधित लेख