भारतीय राजकारणाच्या पटलावर अनेक नेते आले आणि गेले. काहींनी आपल्या वक्तृत्वाने भुरळ घातली, तर काहींनी आपल्या कुशल रणनीतीने सत्ता काबीज केली. परंतु, लोकशाहीच्या या अवाढव्य आणि गुंतागुंतीच्या व्यवस्थेत सलग पंचवीस वर्षे एका राज्याचा तसेच देशाचा सर्वोच्च कार्यकारी प्रमुख म्हणून अखंड काम करणारा नेता विरळाच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या या प्रदीर्घ, सलग २५ वर्षांच्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहताना जाणवते की, हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर एका संपूर्ण देशाच्या स्थित्यंतराचाही आहे. २००१ साली गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ ते आज २०२६ मध्ये जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करणे, हा कालखंड भारतीय राजकारणात खऱ्या अर्थाने ‘अतुलनीय आणि अजोड’ असाच म्हणावा लागेल.
एका राजकीय पर्वाचा उदय
ऑक्टोबर २००१ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आले, तेव्हा त्यांच्याकडे प्रशासनाचा किंवा सरकार चालवण्याचा कोणताही पूर्वानुभव नव्हता. पंचायत समितीचीही निवडणूक न लढवलेला एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक आणि भाजपचा संघटक थेट मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसतो, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्या काळात गुजरात भूकंपाच्या धक्क्यातून सावरत होता, पक्षांतर्गत आव्हाने होती आणि प्रशासकीय घडी विस्कटलेली होती. मात्र, मोदींनी पहिल्याच दिवसापासून आपल्या कामाचा धडाका लावला. संकटांचे रूपांतर संधीत करण्याची त्यांची हातोटी तिथेच पहिल्यांदा दिसून आली. एक कठोर प्रशासक, निर्णयक्षम नेता आणि विकासाचा नवा दृष्टिकोन देणारा मुख्यमंत्री अशी आपली प्रतिमा त्यांनी अवघ्या काही महिन्यांतच निर्माण केली. या पहिल्या पावलानेच नवीन राजकीय पर्वाचा उदय झाला. पुढे भारताची राजकीय दिशा कायमची बदलून टाकली.
विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ ते ‘न्यू इंडिया’
सलग १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पायाभूत सुविधा, वीज, पाणी आणि औद्योगिक गुंतवणूक यावर भर दिला. याच काळात ‘गुजरात मॉडेल’ हा शब्द भारतीय राजकारणात परवलीचा बनला. याच मॉडेलच्या भरवशावर आणि विकासाच्या आश्वासनावर त्यांनी २०१४ मध्ये दिल्लीची सत्ता काबीज केली. मुख्यमंत्री ते पंतप्रधान हा प्रवास केवळ निवडणुकीतील विजयाचा नव्हता, तर तो धोरणात्मक विस्ताराचा होता. देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी ‘गुजरात मॉडेल’चे एका व्यापक ‘न्यू इंडिया’मध्ये रूपांतर केले. जनधन योजनेतून कोट्यवधी लोकांना बँकिंग व्यवस्थेत आणणे असो, स्वच्छ भारत अभियानातून घरोघरी शौचालये बांधणे असो, किंवा उज्ज्वला योजनेतून गरिबांच्या चुलीपर्यंत गॅस पोहोचवणे असो; मोदींच्या योजनांचा आवाका विशाल होता. डिजिटल इंडिया, यूपीआयची क्रांती आणि ‘वंदे भारत’ ट्रेनसारखे प्रकल्प यातून त्यांनी आधुनिकतेची कास धरली. तळागाळातील गरिबांचे कल्याण आणि देशाचा भौतिक विकास यांची अचूक सांगड घालण्याचे कसब त्यांच्या या कारकिर्दीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले.
जनसामान्यांशी नाळ आणि संवादाचे कौशल्य
राजकीय यश केवळ योजना राबवून मिळत नाही, तर त्यासाठी जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो. मोदींच्या या २५ वर्षांच्या यशाचे मुख्य गमक त्यांच्या जनसामान्यांशी जोडलेल्या नाळेत आणि त्यांच्या अफाट संवादकौशल्यात दडले आहे. ‘मन की बात’ यांसारख्या कार्यक्रमातून त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला. ते केवळ एक राजकीय नेते राहिले नाहीत, तर देशातील प्रत्येक कुटुंबाचा एक भाग बनले. सरकारी योजनांना त्यांनी ‘जनआंदोलनाचे’ स्वरूप दिले. ‘मी सांगतोय ना, मग ते आपल्या भल्यासाठीच असणार’ हा विश्वास त्यांनी कोट्यवधी देशवासीयांच्या मनात निर्माण केला. पारंपारिक माध्यमांच्या पलीकडे जाऊन सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत त्यांनी युवा वर्गाशी जोडून घेतले. लोकांची नस ओळखण्याची आणि त्यांच्या आकांक्षांना शब्द देण्याची ही कला त्यांना त्यांच्या समकालीन नेत्यांपेक्षा खूप वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.
सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि जागतिक भरारी
नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीचे आणखी एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे त्यांनी भारतीयत्वाबद्दल, इथल्या प्राचीन संस्कृतीबद्दल कधीही न्यूनगंड बाळगला नाही. उलटपक्षी, ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ हा त्यांच्या धोरणांचा गाभा राहिला. अयोध्येतील भव्य राममंदिराचे निर्माण, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथचा जीर्णोद्धार यातून त्यांनी बहुसंख्य हिंदू समाजाच्या श्रद्धांचा सन्मान केला आणि भारताच्या सांस्कृतिक अस्मितेला नवसंजीवनी दिली. मात्र, हे करताना ते केवळ भूतकाळात अडकून पडले नाहीत, तर त्यांनी भारताला जागतिक स्तरावर एक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी वेगाने पावले उचलली. जी-२०चे यशस्वी अध्यक्षपद, योगदिनाचा जागतिक विस्तार, परदेशातील भारतीयांशी संवाद आणि आक्रमक परराष्ट्र धोरण यामुळे भारताचा दबदबा आज जगात वाढला आहे. ‘भारत आता डोळे झुकवून नाही, तर डोळ्यांना डोळे भिडवून बोलतो,’ ही भारतीयांची वाढलेली जाणीव मोदींच्या नेतृत्वाची देणगी आहे.
भारताचा विलक्षण प्रवास
लोकशाहीत सलग २५ वर्षे सत्तेत राहिल्यावर ‘अँटी इन्कम्बन्सी’ (प्रस्थापितविरोधी लाट), थकवा स्वाभाविक असतो. मात्र, मोदी यालाही अपवाद ठरले. वयाची सत्तरी पार केल्यानंतरही त्यांची ऊर्जा, दिवसाचे १८-१८ तास काम करण्याची त्यांची क्षमता आणि प्रचारातील त्यांचा झंझावात थक्क करणारा आहे. त्यांच्यावर टीका झाली नाही असे नाही; नोटबंदी, शेतकरी आंदोलन, किंवा रोजगार अशा अनेक मुद्यांवरून विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक आव्हानातून ते फिनिक्स पक्षासारखे अधिक ताकदीने उभे राहिले. एका चहावाल्याच्या मुलाने देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचणे आणि सलग पाव शतक सत्तेच्या केंद्रस्थानी राहूनही आपली लोकप्रियता अबाधित ठेवणे, हा भारतीय लोकशाहीतला मोठा चमत्कार आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या या प्रवासाचे मूल्यमापन करताना एक गोष्ट जाणवते की, मोदींनी भारताला केवळ नवी राजकीय दिशाच दिली नाही, तर प्रत्येक भारतीयाला ‘आपण देश मोठा, विकसित होण्यासाठी काहीतरी योगदान देऊ शकतो’ हा आत्मविश्वास दिला. सलग २५ वर्षांच्या या तपश्चर्येने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासातला एक चिरंतन अध्याय लिहून ठेवला आहे.