Wednesday, March 11, 2026

विहिंपचा कडक इशारा; हिंदू सणांवरील हल्ले थांबवा, अन्यथा…

Share

नवी दिल्ली : होळीच्या पवित्र सणादिवसाला दिल्लीतील उत्तम नगर परिसरात झालेल्या तरुण खटिक तरुणाचा जिहादी जमावाने केलेल्या मॉब लिंचिंगचा विश्व हिंदू परिषदेने (VHP) तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विहिंपने हिंदू सणांवर होणाऱ्या हल्ल्यांची आकडेवारी जाहीर करत, “हिंदूंना जशास तसे उत्तर देण्यास भाग पाडू नका,” असा कडक इशारा कट्टरपंथी नेत्यांना दिला आहे.

विहिंपचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी एका सात वर्षांच्या मुलीने आपल्या काकांवर पाण्याचे फुगे मारले होते. त्यातील काही थेंब जवळून जाणाऱ्या एका मुस्लिम महिलेच्या कपड्यांवर पडले. या किरकोळ कारणावरून त्या महिलेच्या नातेवाईकांनी आणि सुमारे २५-३० जणांच्या जमावाने तरुणाच्या पालकांवर आणि काकांवर हल्ला केला. तरुण खटिक याला तलवारी, दगड आणि लाठ्यांनी अमानुषपणे मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

‘हा योगायोग नाही, तर कट’
डॉ. जैन यांनी या घटनेवर प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, “होळी हा रंगांचा सण आहे हे त्या महिलेला माहीत नव्हते का? अवघ्या काही मिनिटांत शस्त्रधारी जमाव तिथे कसा गोळा झाला? हा पूर्वनियोजित कट आहे.” या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या महिलेला अद्याप अटक न झाल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला असून तिच्या तात्काळ अटकेची मागणी केली आहे.

गेल्या १० वर्षांतील हल्ल्यांचा धक्कादायक आकडा

दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. जैन म्हणाले की, हिंदू सण आणि मिरवणुकांवर होणारे हल्ले हे काही वेगळ्या घटना नाहीत. त्यांनी दावा केला की, या वर्षीच्या होळीच्या दरम्यान देशभरात ११ पेक्षा जास्त हल्ले झाले आहेत आणि गेल्या १० वर्षांत होळीच्या दिवशी झालेल्या हल्ल्यांच्या ४२ हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यांनी पुढे असा आरोप केला की, गेल्या १० वर्षांत हिंदू सण आणि मिरवणुकांवर २४० हून अधिक हिंसक हल्ले झाले आहेत, ज्यात हिंदूंना घेरून मारल्याच्या घटनांचा समावेश आहे.

विहिंपने असदुद्दीन ओवैसी, मौलाना अर्शद मदनी आणि त्यांच्या ‘सेक्युलर’ मित्रपक्षांना ताकीद दिली आहे. “हिंदू समाजाला जशास तसे उत्तर देण्यास प्रवृत्त करू नका. मद्रास उच्च न्यायालयाने रामस्वामी उदयार प्रकरणात म्हटल्याप्रमाणे, जर एक गट दुसऱ्याच्या सणांत अडथळा आणत असेल, तर त्यांनी स्वतः अल्पसंख्याक असलेल्या ठिकाणी त्यांचे सण कसे साजरे होतील, याचाही विचार करावा,” असे डॉ. जैन म्हणाले.

तरुण खटिक हा अनुसूचित जाती (SC) समुदायातील होता. “जे नेते स्वतःला दलित आणि उपेक्षितांचे कैवारी म्हणवतात, ते राहुल गांधींसारखे नेते तरुणच्या हत्येवर गप्प का?” असा सवाल विहिंपने उपस्थित केला आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या प्रमुख मागण्या:

विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणातील दोषींवर आणि सर्व कट रचणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात असे कृत्य करण्यास कोणीही धजावणार नाही. यासोबतच, हिंसाचार भडकवणाऱ्या धार्मिक नेत्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि कट्टरता पसरवणाऱ्या मदरशांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. हिंदूंविरुद्ध वाढणारा द्वेष आणि हिंसाचाराच्या घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी दिल्ली तसेच इतर राज्य सरकारांनी विशेष ‘तपास आयोग’ स्थापन करावा; जेणेकरून गुन्हेगार शिक्षेपासून वाचण्याची जी कारणे आहेत ती समोर येतील आणि पीडितांना न्याय मिळेल, असे विहिंपने स्पष्ट केले आहे.

विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी स्पष्ट केले की, हिंदू समाजाच्या रक्षणासाठी संघटना घटनात्मक मार्गाने सर्व पावले उचलण्यास तयार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख