२५ जून १९७५…
५० वर्षांपूर्वी भारत राज्याच्या राणीने ते राज्य फसवणूक करून बळकावले आहे असा निवाडा राज्याच्या न्यायाधीश रामशास्त्री प्रभुण्यांनी दिला आणि मध्यरात्री राणीने आपल्या राज्यातील सगळ्या वाघ सिंहांना पकडून पिंजऱ्यात कोंडायला सुरुवात केली. अगदी त्यांच्यावर डरकाळी फोडायलाच नव्हे तर गुरगुरायलाही बंदी घातली. रस्त्यावरचे मोकाट कुत्रे, लाल माकडे आणि हिरवे साप यांची सुद्धा धरपकड सुरू झाली.
पण पिंजऱ्यात कोंडण्यापूर्वी वाघ आणि सिंह जोरजोराने डरकाळ्या फोडत असत. त्यांच्या डरकाळ्यांमुळे राज्याचे प्रजाजन खूप आनंदी होत असत पण त्यांना टाळ्या वाजवायला देखील राणीने बंदी केली होती. एवढ्या सगळ्या प्राण्यांसाठी पिंजरे कमी पडू लागले म्हणून राणीने सगळ्या प्राण्यांना एकत्र पिंजऱ्यांमध्ये एकत्र कोंबायला सुरुवात केली. पिंजऱ्यात गेल्यावर मात्र वाघ आणि सिंहांच्या गर्जना बाहेर ऐकू येणे बंद झाले. पण गर्जना होत राहणे आणि त्या प्रजाजनांना ऐकू जाणे खूप आवश्यक होते. पण गर्जना करणार कोण? पिंजऱ्यात सिंह आणि बाकीचे प्राणी खूप निराश झाले. पण वाघ त्या सगळ्यांना हिम्मत देत म्हणाला. काळजी करू नका… आमच्याच कुळातला एक वाघ मुंबापुरी नगरीत राहतो. त्याचे बरेच बछडे आहेत. त्या सगळ्यांनी एकावेळी डरकाळ्या फोडल्या तर राणी निश्चित घाबरेल. कदाचित आपल्याला मोकळी देखील सोडेल. सगळ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.
इकडे राणीने एक भला मोठा पिंजरा आणि चार-पाच रिंग मास्तर मुंबापुरीच्या वाघाला पिंजऱ्यात कोंडायला त्याच्या गुहेकडे पाठवले. वाघाने तो पिंजरा लांबूनच बघितला आणि त्याच्या डोळ्यासमोर दिवसा तारे चमकले. पिंजऱ्यात राहायचं म्हणजे जिवंतपणी मरण… राणी तो पिंजरा जंगलात कुठेही नेऊन ठेवेल. कदाचित पिंजऱ्यात आपण एकटे असू. राणी देईल ते खायचं. पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात येरझाऱ्या घालायच्या. मुंबापुरीचे तर लांबूनही दर्शन होणार नाही. बछड्यांना घेऊन राणी कुठे जाईल त्याचा नेम नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राणी आपल्याला पिंजऱ्यातून कधी सोडेल याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता. कदाचित आयुष्यभर देखील पिंजऱ्यात राहावं लागेल. या नुसत्या कल्पनेनेच मुंबईचा वाघ गळपटला.
आणि त्याने जोरात आरोळी ठोकली… म्यांव म्यांव… राज्याला शिस्त लागण्यासाठी या सगळ्या प्राण्यांना पिंजऱ्यात कोंडलेच पाहिजे… महाराणीचा विजय असो… म्यांव म्यांव…
रिंग मास्तर पिंजरा घेऊन गुहेच्या जवळ आले आणि एकदम त्यांच्या लक्षात आले की… आपण ज्याला मुंबापुरीचा वाघ समजून पकडायला आलो होतो प्रत्यक्षात ती तर वाघाची मावशी आहे… त्यांनी तिथूनच राणीला सांगावा धाडला… वाघाची
मावशी महाराणीचा विजय असो म्हणून आरोळ्या मारते आहे…
राणी खुदकन हसली आणि तिने चतुराई करून मुंबापुरीच्या वाघाच्या मावशीला पकडू नका… म्हणून आदेश दिला… पिंजरा आणि सगळे रिंग मास्तर हात हलवत परत गेले…
वाघाच्या मावशीने सुटकेचा निःश्वास सोडला… तो निःश्वास पिंजऱ्यात बंद असलेल्या वाघ सिंह आणि बाकी सगळ्या प्राण्यांना स्पष्टपणे ऐकू गेला… वाघाने लाजेने मान खाली घातली… आज त्याला पहिल्यांदा कळले की ज्याला आपण आपल्याच कुळातील मुंबापुरीचा वाघ समजत होतो… प्रत्यक्षात ती आपली म्यांव म्यांव करणारी मावशी आहे…
पुढे १९ महिन्यांनी वाघ सिंह आणि सगळे प्राणी पिंजऱ्यातून मुक्त झाले… प्रजाजनांनी एकजुटीने राणीला सिंहासनावरून उतरवले…
मात्र पुढे अनेक वर्षे… मुंबापुरीची वाघाची मावशी राणीच्या पायात कृतज्ञतेने घुटमळत राहिली…