Wednesday, March 25, 2026

जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र या; सांगलीत ३ एप्रिलला रंगणार ‘विराट हिंदु धर्म संमेलन’

Share

सांगली : “सांगलीतील खणभाग, नळभाग, फौजदार गल्ली आणि राजवाडा परिसरात ३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले ‘विराट हिंदु धर्म संमेलन’ ऐतिहासिक ठरायला हवे. या भागातील समस्त हिंदूंनी आपली जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून पूर्ण शक्तीने या संमेलनात सहभागी व्हावे,” असे आवाहन ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले.

या विराट संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. या वेळी नितीन शिंदे यांनी संमेलनाचे महत्त्व विषद करताना हिंदूंच्या संघटनावर भर दिला. या संमेलनात पू. नीळकंठ शिवयोगी शिवाचार्य धारेश्वर महाराज आणि अधिवक्ता गुरुराज रसाळ यांचे ओजस्वी विचार ऐकण्याची सुवर्णसंधी सांगलीकरांना मिळणार आहे.

बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगली नगर कार्यवाह अ‍ॅड. माधवराव कुलकर्णी आणि शंतनू लिमये यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले. या विराट संमेलनासाठी सकल हिंदु समाज, हिंदु एकता आंदोलन, वारकरी संप्रदाय, भजनी मंडळे, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव, कार्यकर्ते प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, श्रीधर मिस्त्री, सायली पवार यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर होणारे हे संमेलन सांगलीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख