थायलंडमध्ये सुरू असलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात सुमारे दोन हजार वर्षे जुनी सोन्याची अंगठी सापडली असून, त्यावरील ब्राह्मी लिपीतील कोरीव लेखामुळे इतिहास संशोधकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. बँकॉकजवळील फेचाबुरी प्रांतातील डॉन याई थॉंग या ठिकाणी मानवी सांगाड्यांसोबत सापडलेल्या या अंगठीवरील ‘पुसरखितस’ हा शब्द भारतीय ज्योतिषातील पुष्य नक्षत्राशी संबंधित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एका छोट्याशा दागिन्याने भारत आणि आग्नेय आशियामधील प्राचीन सांस्कृतिक संबंधांवर नव्याने प्रकाश टाकला आहे.
पुरातत्त्वीय शोधांमध्ये एखादी वस्तू सापडते, ती संग्रहालयात ठेवली जाते आणि बातमी तिथेच संपते. पण ही अंगठी वेगळी आहे. तिच्यावरील काही कोरलेली अक्षरे आपल्याला तब्बल दोन हजार वर्षे मागे घेऊन जातात. त्या काळात भारतातून केवळ मसाले, मौल्यवान वस्तू किंवा व्यापारी जहाजेच समुद्रमार्गे जात नव्हती; भारतीय भाषा, लिपी, श्रद्धा, खगोलशास्त्र आणि संस्कृतीचाही प्रवास सुरू होता.
डॉन याई थॉंग येथे आतापर्यंत आठ मानवी सांगाडे, त्यांच्यासोबत मातीची भांडी, कांस्य वस्तू आणि सोन्याचे दागिने सापडले आहेत. त्यापैकी एका सांगाड्याजवळ आढळलेल्या या अंगठीवरील ब्राह्मी लिपी हा या संपूर्ण उत्खननातील सर्वात महत्त्वाचा शोध मानला जात आहे. कारण ब्राह्मी ही केवळ भारतातील प्राचीन लिपी नव्हती; पुढे आग्नेय आशियातील अनेक लिपींच्या विकासाचा ती पाया ठरली.

भारत आणि आग्नेय आशियातील संबंधांची कहाणी युद्धांची नाही, तर संवादाची आहे. भारतीय व्यापारी, बौद्ध भिक्षू, ब्राह्मण विद्वान आणि समुद्री प्रवासी शतकानुशतके या प्रदेशात ये-जा करत होते. त्यांच्यासोबत व्यापाराबरोबरच भारतीय विचार, धार्मिक परंपरा, कला आणि खगोलशास्त्रही पोहोचले. त्यामुळेच आजही थायलंडच्या ‘रामाकियन’ महाकाव्यात रामायणाचे प्रतिबिंब दिसते, राजदरबारातील काही विधींमध्ये भारतीय परंपरांचा प्रभाव जाणवतो आणि अनेक प्राचीन शिलालेखांमध्ये ब्राह्मीचा वारसा आढळतो.

विशेष म्हणजे, हा सांस्कृतिक प्रभाव कोणत्याही साम्राज्य विस्तारातून निर्माण झाला नव्हता. भारताने या प्रदेशावर सत्ता गाजवली नाही; उलट ज्ञान, व्यापार आणि परस्पर आदर यांच्या बळावर भारतीय संस्कृतीने येथे आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे थायलंडमध्ये सापडलेली ही अंगठी केवळ एक पुरातत्त्वीय अवशेष नाही; ती भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’चा दोन हजार वर्षांपूर्वीचाही पुरावा आहे.
थायलंडच्या एका शांत भातशेतीतून बाहेर आलेली ही सोन्याची अंगठी जगाला पुन्हा एकदा सांगते की, भारताचे आग्नेय आशियाशी असलेले नाते हे नकाशांवर आखलेल्या सीमांपेक्षा कितीतरी जुने, व्यापक आणि संस्कृतीच्या धाग्यांनी विणलेले आहे. कधी कधी इतिहासाची सर्वात मोठी गोष्ट एखाद्या छोट्याशा सोन्याच्या अंगठीतही दडलेली असते.
– राजेश कोरडे